भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ४

 

इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस





  २०२१ च्या एप्रिल महिन्यात मी त्यांना प्रत्यक्षात पहिल्यांदा पहिला. अचानक काही छोटी काळी आकृती पाण्यात गुपचूप गडप झाली असं  मला दिसलं. हातात कॅमेरा आणि गळ्यात माझी लाडकी दुर्बीण होतीच , मी लगेच पुन्हा तयारी करून सज्ज झालो आणि मला त्याला माझ्या कॅमेरात  काही वेळाने टिपता आलं. जेफरसन आणि इतर संशोधक सहकारी यांच्या 'मरीन मॅमल ऑफ द वर्ल्ड' पुस्तकात वाचलेलं वर्णन आणि चित्रे याना पुन्हा आठवलं आणि मी नक्की केलं कि होय मी फिनलेस पॉरपॉइज (पोर्पोइस)  पाहिला. वेंगुर्ला बंदरापासून साधारण ५०० मीटर अंतरावर मी हि नोंद केली. सागरी सस्तन प्राणी सर्वेक्षण मोहिमेत आम्ही टीम CMFRI ने केलेली त्या वर्षाची हि पहिली नोंद. 

  जगभरात फोसीनिडे कुळात ज्याचा समावेश होतो अश्या सात जातीचे पॉरपॉइज समुद्रात विचरण करतात. साधारण २. ५ मीटर पेक्षा यांची लांबी कमी असते. या सर्व जातीचे पॉरपॉइज बहुधा उथळ किनारी सागरी क्षेत्रात वावरत असतात याला अपवाद म्हणजे डॅल्स पोर्पोइस आणि डोळ्याभोवती चष्म्या सारखी दिसणारी काळी वर्तुळे असलेले स्पेकट्याक्लेटेड पॉरपॉइज. या दोन्ही जातीचे पॉरपॉइज भारतीय सागरी क्षेत्रात आढळत नाहीत.  

 ह्या दोन जातीचे पॉरपॉइज वगळता हार्बर पॉरपॉइज हि जगभरात सगळ्यात जास्त प्रमाणत दिसणारी पॉरपॉइज आहेत.  विशेष बाब म्हणजे यांचा आकार हा जगातील लहान सागरी सस्तन प्राणी मध्ये एक आहे. जवळपास १. ९ मीटर सर्वसाधारणपणे लांब. शरीराच्या बरोबर मधल्या भागाच्या थोड्या मागे यांस एक त्रिकोणी आकाराचा पृष्ठीय ( वरच्या बाजूला) पर असतो. ज्याचा वरील भाग गडद राखाडी आहे आणि त्याच्या खालील बाजूस  फिकट पांढऱ्या रंगाची पोटापर्यंत असतो. हार्बर पोर्पोइसेस (Harbor Porpoises) हे उत्तरी गोलार्धातील समशीतोष्ण ते उपध्रुवीय पाण्यात आढळणारे सस्तन प्राणी आहेत. हे सहसा किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात आढळतात, तरी कधीकधी ते खोल समुद्रातही प्रवास करतात. उत्तर प्रशांत महासागरात, हार्बर पोर्पोइसेस (Harbor Porpoises) मध्य कॅलिफोर्निया आणि जपानच्या उत्तर होन्शूपासून ते दक्षिण ब्युफोर्ट आणि चुक्ची समुद्रापर्यंत आढळतात. तर उत्तर अटलांटिक महासागरात, ते युनायटेड स्टेट्सच्या आग्नेय भागापासून पश्चिमेकडे दक्षिण बॅफिन बेटापर्यंत  आणि पूर्वेकडे सेनेगल, पश्चिम आफ्रिका ते नोवाया झेमल्यापर्यंत पसरलेले आहेत. याशिवाय, ते दक्षिणपूर्व आणि पश्चिम ग्रीनलँड, आइसलँड आणि फेरो बेटांभोवतीही आढळतात. हे सस्तन प्राणी थंड आणि समशीतोष्ण पाण्यात राहण्यास प्राधान्य देतात, ज्यामुळे त्यांचे विस्तारित आधिवास हे त्यांच्या अनोख्या जैविक गरजांशी जुळते. 

बर्मिस्टरचा पोर्पोइस (Burmeister's Porpoise) हा सागरी सस्तन प्राणी हरमन बर्मिस्टर या जर्मन प्राणिशास्त्रज्ञाच्या नावावरून ओळखला जातो, ज्यांनी १८६५ मध्ये या प्रजातीचे वर्णन आणि संशोधन केले होते. हा पोर्पोइस दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यांवर, विशेषतः आर्जेंटिना, ब्राझील, चिली आणि पेरू येथील थंड आणि समशीतोष्ण पाण्यात आढळतो. बर्मिस्टरचा पोर्पोइस (Burmeister's Porpoise) हा दक्षिण चिलेमध्ये खेकडे पकडण्याचा चारा किंवा गळ म्हणून  वापरण्यासाठी बंदुकीच्या गोळ्या आणि हार्पून्सच्या मदतीने मारला जातो. तसेच, पेरू देशाच्या आजूबाजूला सागरी क्षेत्रात हा मासेमारी करताना बऱ्याच वेळा अडकला जातो. या प्राण्यांचा जाणूनबुजून शार्क किंवा मोरी मासा चा चारा किंवा गळ म्हणून किंवा मानवी उपभोगासाठीही शिकार केली जाते. ही प्रथा बर्मिस्टरच्या पोर्पोइसच्या लोकसंख्येसाठी धोका निर्माण करते आणि त्यांच्या अस्तित्वाला धोकाच निर्माण करते. 

वाकिता (Vaquita) हे जगातील सर्वात धोक्यात असलेले सागरी सस्तन प्राणी आहे. १९९६ मध्ये आंतरराष्ट्रीय प्रकृति संरक्षण संघटने (IUCN) च्या अहवालात प्रथम या प्रजातीला 'गंभीरपणे संकटग्रस्त' म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून, वाकिता पर्यावरणीय स्थिरतेचे प्रतीक बनले आहे. हे छोटे आकाराचे पोर्पोइस मेक्सिकोच्या कॅलिफोर्निया आखातात आढळतात, परंतु अलीकडच्या काही दशकांत त्यांची संख्या भयावहरीत्या कमी झाली आहे. मुख्यतः अवैध मासेमारी आणि गिलनेट जाळ्यांमध्ये अडकणे यामुळे वाकिताच्या अस्तित्वावर मोठा धोका निर्माण झाला आहे. सी शेपर्ड या जगविख्यात सागरी सांशोधन करणाऱ्या संस्थेने २०२३-२४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जगभरात निव्व्ल १०-१३ वाकिता  पोर्पोइस शिल्कक असल्याचे नमूद केले आहे. असंवेदनशील मासेमारी पद्धती आणि संशोधन याचा परस्पर सहभाग यात असलेला अभाव एखाद्यी जाती कशी नष्ट करू शकते याच हे दुर्देवी उदाहरण.   

नॅरो-रिज्ड फिनलेस पोर्पोइस (Narrow-Ridged Finless Porpoise) ची यांगत्झी उपप्रजाती (Yangtze subspecies) ही तिच्या नैसर्गिक आवासात दुसऱ्या एका सागरी सस्तन प्राण्यासह, बाईजी डॉल्फिन (Baiji Dolphin) बरोबर राहत होती. परंतु, २००६ मध्ये बाईजी डॉल्फिनच्या अस्तित्वाचा नाश झाल्यानंतर, ही फिनलेस पोर्पोइस आता यांगत्झी नदीतील एकमेव सागरी सस्तन प्राणी राहिली आहे. नॅरो-रिज्ड फिनलेस पोर्पोइस (Narrow-Ridged Finless Porpoise) ही प्रजाती अगदी अलीकडे, २००८ मध्ये, इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस (Indo-Pacific Finless Porpoise) पासून वर्गीकरणात वेगळी करण्यात आली. या प्रजातीच्या दोन उपप्रजाती आहेत:

१. N.a. asiaorientalis - ही उपप्रजाती यांगत्झी नदीच्या लोकसंख्येसाठी ओळखली जाते.

२. N.a. sunameri - ही उपप्रजाती, जिला पूर्व आशियाई फिनलेस पोर्पोइस (East Asian Finless Porpoise) म्हणून ओळखले जाते, पूर्व आशियाच्या किनाऱ्यांवर आढळते.


इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस (Indo-Pacific Finless Porpoise) या प्रजातीला जुने नाव "फिनलेस ब्लॅक पोर्पोइस" (Finless Black Porpoise) असे म्हटले जात असे. असे मानले जाते की हे नाव या प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचा रंग गडद होतो यावरून पडले आहे. ही प्रजाती इंडो-पॅसिफिक प्रदेशातील किनाऱ्यांवर आणि गोड्या पाण्यात आढळते. या पोर्पोइसमध्ये पंख/ पाठीवर पर  नसल्यामुळे ते त्यांच्या इतर सागरी सस्तन प्राण्यांपेक्षा वेगळे दिसतात. त्यांचा रंग सहसा निळसर-राखाडी असतो आणि ते सहसा एकटे किंवा छोट्या गटांमध्ये आढळतात. भारतीय सागरी क्षेत्रात आपल्याला फक्त याच जातीचे पोर्पोइस दिसून येतात.  इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस (Indo-Pacific Finless Porpoise) चे आवास क्षेत्र पश्चिमेकडे पर्शियन आखातापासून सुरू होते आणि आशियाच्या किनाऱ्याला लागून पूर्वेकडे वाढते. हे क्षेत्र उत्तर हिंदी महासागराच्या किनाऱ्यांवरून सुमात्रा, जावा, बोर्निओ, कंबोडिया, व्हिएतनाम आणि दक्षिण चीनपर्यंत पसरलेले आहे. या प्रजातीला सहसा किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात आणि काहीवेळा गोड्या पाण्यातही आढळते. त्यांचे हे विस्तृत आवास क्षेत्र त्यांच्या अनुकूलनक्षमतेचे प्रतीक आहे, परंतु त्याचबरोबर प्रदूषण, मासेमारी आणि नैसर्गिक आवासाचा नाश यांसारख्या धोक्यांमुळे त्यांच्या अस्तित्वासाठी आव्हाने निर्माण होत आहेत. या प्रजातीच्या संरक्षणासाठी त्यांच्या आधिवास क्षेत्रातील पर्यावरणीय स्थिती सुधारणे आवश्यक आहे.

इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस (Indo-Pacific Finless Porpoise) चे शारीरिक वर्णन आणि ओळखण्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. पाठीवरील पंख/पर  नसणे, या प्रजातीमध्ये पाठीवर पंख (Dorsal Fin) नसते. त्याऐवजी, त्यांच्या पाठीवर एक रुंद डोर्सल रिज (Dorsal Ridge) असते. डोर्सल रिज: ही रिज सुमारे ३.५ ते १२.० सेंटीमीटर रुंद असते आणि त्यावर १० ते २५ च्या संख्येने ट्यूबरकल्स (उंचवटे) असतात. त्यांचा रंग सहसा निळसर-राखाडी असतो, जो त्यांना पाण्यात लपून राहण्यास मदत करतो. याच शारीरिक आकार , रंग यांमुळे याना सर्वेक्षण करताना पाहणे किंवा त्याचा फोटो काढणे हे अधिक आव्हानत्मक ठरते. 

 इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस (Indo-Pacific Finless Porpoise) हे सहसा मासेमारी करणाऱ्या बोटी पासून  दूर राहणारे आणि लाजाळू स्वभावाचे असतात. इतर पोर्पोइस किंवा डॉल्फिन  प्रजातींप्रमाणे, त्यांच्यात पाण्यात उडी मारणे, बोटी सोबत किंवा आजू-बाजूला वेगाने प्रवास करणे असं वर्तन दिसत नाही. हे प्राणी एकटे, जोड्यांमध्ये किंवा सुमारे २० पर्यंतच्या छोट्या गटांमध्ये आढळतात. 

  त्यांना उथळ किनारी पाणी  आवडते, विशेषतः नदी मुख आणि  आणि कांदळवन असलेले  चिखलाचे परिसर. त्यांना मऊ किंवा वालुकामय तळाशी असलेले क्षेत्र विशेष आवडते. सुदैवाने २०२१ ते २०२५ पर्यंत मला व्यक्तिगत रित्या विविध सागरी संशोधन सर्वेक्षण मोहिमेमध्ये यांचं बऱ्याच वेळा दर्शन झालं. पालघर च्या झाई पासून सिंधीदुर्गाच्या वेंगुर्ल्या पर्यंत किनारी भागात बऱ्याच वेळा हे दिसतात. विविध नावाने मच्छिमारी समाज याना ओळखतो. पालघर मधील वेती आणि मांगेला समाजातील मच्छिमार बांधव याला बुलिया असं संबोधतात तर पालघर मधील मांची मच्छिमार समुह याला कुत्ता मासा किंवा बलगा असं म्हणून ओळखतो. रायगड, मुंबई आणि रत्नागिरी ते पुढे सिंधुदुर्ग पर्यंत बहुसंख्य मच्छिमार समाज याला बलगा किंवा बुलिया किंवा बुल्गा म्हणून ओळखतो.  

इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस (Indo-Pacific Finless Porpoise) हे मांसाहारी प्राणी आहेत आणि त्यांचा आहार प्रामुख्याने लहान मासे, स्क्विड आणि क्रस्टेशियन्स (कठिण कवच असलेले  प्राणी) यावर अवलंबून असतो. त्यांचे हे आहार त्यांना किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात सहज उपलब्ध होते. इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस (Indo-Pacific Finless Porpoise) हे प्राणी थेट मोठ्या प्रमाणावर मारले जात नसल्याचे नोंदवले आहे, परंतु त्यांच्या संपूर्ण आवास क्षेत्रात मासेमारीच्या साधनांमध्ये अपघाताने सापडून त्यांचा मृत्यू होतो. गिलनेट्स (Gillnets) हे त्यांच्या अस्तित्वासाठी सर्वात गंभीर धोके मानले जातात, कारण ते जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये वापरले जातात. या पोर्पोइस गिलनेट्स, ट्रॉल्स, बीच सीन्स (धरण जाळ) , सेट नेट्स, स्टो नेट्स आणि सापळ्यांमध्ये अडकून मरतात, ज्यामुळे त्यांच्या लोकसंख्येस धोका निर्माण होतो. हे प्राणी सहसा मासेमारीच्या साधनांमध्ये अडकून बळी पडतात, ज्यामुळे त्यांच्या अस्तित्वासाठी धोके वाढत आहेत. 

महाराष्ट्र बाबत विशेष येथे बोलायचं झालं तर पालघर, रायगड आणि रत्नागिरी सागरी क्षेत्रात ह्या जातीचे पोर्पोइस मोठ्या प्रमाणत वर्षभर मासेमारी जाळ्यात अडकले जातात. सुदैवाने येथील कुठलाच मच्छिमार समाज याची जाणीवपूर्वक शिकार करत नाही तर देवाचं प्रतीक म्हणून बऱ्याच ठिकाणी त्याला पुजलं जात किंवा अंतर राखलं जात. महाराष्ट्र राज्य मरीन मॅमल स्ट्रेन्डिंग नेटवर्क बऱ्याच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कांदळवन कक्ष आणि मॅन्ग्रोव फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सोबतीने राज्यात इतर संशोधक, पत्रकार ,  मच्छिमार आणि संस्था यांच्या मदतीने या बद्दल तीव्र प्रतिसाद देतो. ज्यामुळे जर राज्यात कुठेही या बद्दल काही माहिती मिळाली तर लगेच सकारत्मक पाऊले उचलली जात आहेत.  

वर्ष २०२४ मध्ये केतकी जोग आणि इतर संशोधक चमू ने प्रकाशित केलेल्या संधोधन लेखा अनुसार राज्यात सिंधुदुर्ग मध्ये सागरी क्षेत्रात ४० पेक्षा अधिक वेळा या इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस ची नोंद केली आहे. २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन पत्रात, इशा आणि तिच्या संघाने इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस (Indo-Pacific Finless Porpoise) या सागरी सस्तन प्राण्यांच्या संरक्षणासाठी केलेल्या अभ्यासाचा परिचय दिला आहे. हे प्राणी भारताच्या किनाऱ्याजवळील पाण्यात आढळतात, परंतु त्यांच्या लोकसंख्येचे मूल्यांकन आणि दीर्घकालीन निरीक्षण हे पारंपरिक दृश्य सर्वेक्षण पद्धतींमुळे आव्हानात्मक ठरते. या मर्यादा ओलांडण्यासाठी, संशोधकांनी सिंधुदुर्ग किनाऱ्यावर ३७६ चौरस किलोमीटर क्षेत्रात ध्वनिक (acoustic) आणि दृश्य (visual) सर्वेक्षण पद्धतींचा एकत्रित वापर केला. अभ्यासात आढळले की, ध्वनिक पद्धतीने फिनलेस पोर्पोइसचा शोध घेण्याचा दर (०.१२ गट/किमी) दृश्य पद्धतीपेक्षा (०.०३ गट/किमी) लक्षणीयरीत्या जास्त होता. याशिवाय, किनाऱ्यापासूनचे अंतर आणि पाण्याची खोली हे घटक ध्वनिक शोधासाठी महत्त्वाचे ठरले. हे निष्कर्ष सांगतात की, या प्रजातीच्या सर्वेक्षणासाठी ध्वनिक आणि दृश्य पद्धतींमधील प्रजाती-विशिष्ट फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. हा अभ्यास फिनलेस पोर्पोइसच्या संरक्षणासाठी नवीन मार्गदर्शन प्रदान करतो.

शेवटी ह्या लपून छपून आपलं अस्तित्व टिकवणाऱ्या प्राण्या बद्दल आपण एवढं करू शकतो कि जबाबदारीने मासेमारी करणे आणि या बद्दल एक सामान्य व्यक्ती म्हणून अधिक माहिती मिळवत राहणे आणि एक संशोधक म्हणून परंपारिक पद्धती बरोबर इतर नवीन संशोधन पद्धिती चा वापर करून त्यांना संवर्धनात आपली भूमिका निभावणे. 


लेखन

प्रदिप नामदेव चोगले 

मोबाईल: - 9029145177

pradipnc93@gamil.com 

दि 22/03/2025 


टीप: - आपली प्रतिक्रिया खाली कमेन्ट मध्ये नक्की नोंदवा. हा लेख आणि माझा प्रयत्न आवडल्यास आपण याची लिंक आपल्या मित्र-परिवार सोबत वितरित करा. 


अधिक माहितीसाठी संदर्भ: -  

  • Jog, K., Sule, M., Bopardikar, I., Patankar, V., & Sutaria, D. (2018). Living with dolphins: Local ecological knowledge and perceptions of small cetaceans along the Sindhudurg coastline of Maharashtra, India. Marine Mammal Science, 34(2), 488-498.
  • Jog, K., Sutaria, D., Grech, A., Jones, R., Sule, M., Bopardikar, I., & Marsh, H. (2024). Risks associated with the spatial overlap between humpback dolphins and fisheries in Sindhudurg, Maharashtra, India. Endangered Species Research, 53, 35-47.
  • Bopardikar, I., Harris, D., Robin, V. V., & Klinck, H. (2024). Comparing visual and acoustic detectability of two coastal cetacean species off Sindhudurg, India, to better inform integrated survey protocol.
  • Dudhat, S., Pande, A., Nair, A., Mondal, I., Srinivasan, M., & Sivakumar, K. (2022). Spatio-temporal analysis identifies marine mammal stranding hotspots along the Indian coastline. Scientific reports, 12(1), 4128.
  • Jefferson, T. A., Webber, M. A., & Pitman, R. L. (2011). Marine mammals of the world: a comprehensive guide to their identification. Elsevier.
  • https://porpoise.org
  • https://seashepherd.org/vaquita
  • प्रदिप चोगले _फिल्ड डायरी वर्ष २०२०-२३ (व्यक्तिगत नोंदी , अप्रकाशित ) 







Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५