
अनुभूती अद्भुत सृजनाची - कैलास मंदिर आणि औरंगाबाद काही गोष्टी अश्या असतात ज्या बद्दल आपण कितीही बोललो तरी अनुभवाशिवाय ती गोष्टी कशी हि समजू शकतच नाही. असा एक अनुभव 'याची देही याची डोळा' वेरूळ ची जैन लेणी आणि कैलास मंदिर पाहणे. खूप वेळा काही गोष्टी आपण न ठरवता अनुभवतो तसाच हा प्रवास अनुभव. साधारण वर्षभर काम केल्याचा क्षीण कमी करण्यासाठी आणि मैत्रीची गोडी वाढवणायासाठी केलेला सुंदर प्रवास. शुक्रवारी कामाचे तास संपून रात्रीच जेवण उरकल्यावर आम्ही सर्व दोस्त एक खाजगी गाडी करून औरंगाबाद साठी मार्गस्थ झालो. आठ तास लागतील असा अंदाज होता परंतु मुबंई पासून सुरु झालेला पाऊस आणि खराब रस्ता या कारणाने हा प्रवास १२ तास खर्च करून पूर्ण केला. सकाळची पोटपुजा करून तडक दौलताबाद चा किल्ला गाठला. १२ व्या शतकात बांधलेला हा एक अजस्त्र किल्ला यादव राजवटीची याद ताजी करतो. यादव राजवटीतील भिल्लमा-२ पासून सुरु झालेला प्रवास १५ व्या शतकापर्यंत विजापूरच्या आदिलशाही पर्यंत पोहचतो. पुढे १७ शतक उजडेपर्यंत मुघल बादशहा औरंगजेब चे वास्तव देखील अनुभवणारी हि वास्तू. १९५१ मध्ये...