जेव्हा पक्षी गाणं गाणे बंद करतात -२


  या पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती कशी झाली आणि कधी झाली ही गोष्ट अतिशय रंजक, गुंतागुंतीची पण तितकीच उद्बोधक अशी आहे. कित्येक संशोधन पत्रिका आणि सिद्धांत या आधारावर आपण सांगू शकतो की साधारण ४.२ अब्ज वर्षा पूर्वी


पृथ्वीची निर्मिती आणि जीव उत्क्रांती
 

पृथ्वीची निर्मिती झाली असावी, सुरवातीला एका तप्त वायूंचा गोळा अश्या अवस्थेतून हळू हळू थंड होत ती सघन होत गेली. लाखो वर्षांच्या प्रक्रियेनंतर आज आपण जी आपली पृथ्वी आज पाहतो ती झाली. आणि आज देखील आपणांस जाणवेल वा कधी- कधी जाणवणार नाही असे छोटे मोठे बदल येथे सतत घडतच आहेत. जीवरसायन विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर आपण सांगू शकतो की आज जे काही या ग्रहावर आहे ते म्हणजे येथे असलेल्या काही रासायनिक आणि जैविक घटकांमधील घडत जाणारी अत्यंत हळुवार आणि गुंतागुंतीची प्रक्रियेचा परिपाक आहे. आज आपण ज्यांना सजीव असे म्हणतो वा ज्या गोष्टींना निर्जीव असे म्हणतो त्यात जर कोणता मूलभूत फरक असेल तर ते अर्थातच त्यात असलेल्या विविध मूलद्रवांच्या अणू मधील प्रकार आणि संख्येमधील फरक इतकंच असेल.
   पक्षी गाणं गाणे का बंद करतात? या लेख मालिकेच्या दुसऱ्या भागात जेव्हा आपण या प्रश्नाला उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणांस या निळ्या ग्रहावरील उत्पत्ती आणि तिचा गुंता समजुन घेतल्या शिवाय पूढे सरकता येत नाही. पक्षी, प्राणी, वनस्पती आणि त्या सोबत आपण माणसं आणि हा निसर्ग म्हणजे या जीवरासायनिक अभिक्रियेचे चं अविष्कार आहोत.
  या ग्रहावरील जीवनाचा इतिहास म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याच सोपं उत्तर मी असं सांगू शकतो की येथे असणाऱ्या विविध जैविक आणि अजैविक घटकांमधील होत असलेली परस्पर प्रक्रिया होय. निसर्गात कित्येक लाखो वर्षाच्या क्रमिक विकासातून आज आपण जे काही पाहतो तितकी जैविक विविधता निर्माण झाली आहे वा होत आहे. पण या अत्यंत हळुवार आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेला याच प्रक्रियेतून निर्माण झालेला एक जीव ' माणूस ' अत्यंत वेगाने बदलू पाहत आहे.
  लाखो वर्षाच्या उत्क्रांतीतून  ज्या  जैवविविधतेची निर्मिती झाली आणि जे संतुलन येथे निर्माण झालं आहे ते गेल्या एका शतकात माणूस म्हणून आपण गेल्या शतका पासून अत्यंत वेगाने बिघडवत आहोत. आपण एक प्रजाती म्हणून जर स्वतःकडे पाहिलं तर आपण सोडून इतर सजीव सृष्टीतील असंख्य जीवांना मारक अशा गोष्टी करत आहोत. यातील सर्वात मोठी अशी कोणती गोष्ट सर्वात घातक असेल तर ती म्हणजे जाणीवपूर्वक पद्धतीने वा कधी कधी नकळत हि जी जीवसृष्टी आणि यांस परिपोषक करणाऱ्या परिसंस्थेला प्रदूषित करत आहोत. समुद्र, नद्या, खड्या, तलाव, जंगलं, गवताळ प्रदेश, ध्रुवीय प्रदेश अश्या असंख्य अधिवासात आपण हानिकारक प्रदूषके अव्याहत पणे सोडत आहोत.
  निसर्ग नेहमी जेव्हा एका गोष्टीचा वापर करतो वा कोणत्याही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होणार उत्पादक गोष्ट ही अत्यंत सरळ वा पुन्हा वापरता येणारी अशी करतो. परंतु माणूस निसर्गातील सरळ साध्या गोष्टीवर प्रक्रिया करून अत्यंत गुंतागुंतीची आणि पुनर्वापर न करता येईल अशा गोष्टीची मोठ्या प्रमाणत निर्मिती करतो आणि याचा परिपाक म्हणजे होत जाणार प्रदूषण. हि गोष्ट आपण अत्यंत सरळ साध्य उदाहरणाने समजून घेऊ शकतो जसे की निसर्गात फुलांमध्ये असलेली शर्करा मधमाश्या एकत्र करतात आणि निसर्गात त्याच परिवर्तन मधाच्या रुपात करतात. यात पहिली आणि दुसरी दोन्ही गोष्टी पुन्हा वापरता येण्यायोग्य असतात. याउलट माणूस रबराच्या झाडावरील खोडावर त्यातील चीक जमा करून त्यावर प्रक्रिया करतो आणि उत्तम अशा रबर मध्ये परिवर्तन करतो. आता हे रबर आपल्यासाठी खूप उपयोगी आहे यात शंका नाही परंतु याच पद्धतीने आपण सर्व गोष्टी निसर्गात जे सोडतो ते पुनर्वापर करण्या योग्य नसतं.

                 -  लेखन
                 -  प्रदिप नामदेव चोगले
                     pradipnc93@gmail.com
                     -९०२९१४५१७७




संदर्भ :-
‌~ The Sea Around Us by Rachel Carson

‌~ Silent Spring by Rachel Carson

‌~ Under the Sea Wind: A Naturalist's Picture of Ocean Life (1941) by  Rachel Carson

‌~ Always, Rachel: The Letters of Rachel Carson and Dorothy Freeman, 1952-1964 (Concord Library)

 ~ https://pin.it/%2BLS%2BsQo
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५