परशुरामाची भूमी आणि कासव संवर्धनाची विकास गाथा 

  हि गोष्ट तेव्हा सुरु होते जेव्हा मी सप्टेंबर २०१९ मध्ये माझ्या दोन वर्षाच्या संशोधन भूमिकेतून बाहेर पडलो होतो आणि घरी असलेल्या पारंपारिक मासेमारी   व्यवसायाकडे वळायचं ठरवलं. पण म्हणतात ना कि काही गोष्टी या आपल्या साठी जणू परमेश्वरी योजना म्हणून आखून ठेवल्या असतात आणि ते आपल्या सोबत घडायला लागतं आपल्या कल्पनेपलीकडे. काही दिवस मुंबई च्या समुद्री किनारी मासेमारी आणि भटकंती करून झाले होते आणि एक दिवशी एक ईमेल  माझ्या मेल बॉक्स मध्ये पडतो. काय आपल्या समुद्री कासव संशोधनात सहभागी व्हायची इच्छा आहे? काय आपण यासाठी काम करू इच्छित आहात?  वेळ न दवडता माझ्या मनाने उत्तर दिलं हो, मला यांसाठी जायला हवं. या संशोधनाचं केंद्र होत परशुरामाची भूमी 'कोकण' चा सागरी किनारा.  मी याला माझा होकार दर्शक ईमेल पाठवलं आणि काही दिवसात माझी या संशोधन गटात निवड झाली. 
  दि ३१/१०/२०१९ ला रात्री च्या वेळी लाल परीने माझा प्रवास मुंबई सेंट्रल स्थानकातून सुरु झाला. मुंबई-दापोली- हर्णे- पाजपंढरी-आंजर्ले असा होता माझ्या प्रवासाचा क्रम. अंधारात सुरु झालेला प्रवास सकाळी नारळी पोफळी च्या सानिध्याने आंजर्ले ला पोहचून पुरा झाला. प्रा. अमोल हंडोरे सरांच्या नेतृत्वाने आमच्या संशोधन मोहिमेला सुरवात झाली. समुद्र किनारी असलेली वाळू आणि या किनाऱ्यावर होत असलेलं पर्यटन, समुद्र किनारी आढळणारा कचरा, प्रजनन काळात इथे येणाऱ्या ऑल्विव रिडले कासवाच्या माद्या, अंडी घालण्यासाठी योग्य जागा, आणि यात अडथळे ठरणाऱ्या बाबी, मासेमारी समाज आणि त्याची या कासव संवर्धनात असलेली भूमिका, समुद्री किनारी आढळणारी जैव विविधता आणि त्याला परिणाम करणारे रासायनिक आणि भोतिक घटक असे विविध प्रश्न डोक्यात घेऊन आम्ही या संशोधनाला सुरवात केली. 
    सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ, आंजर्ले कासव मित्र गट, महाराष्ट्र वन विभाग- कासव संवर्धन विभाग आणि त्याने नेमलेले कासव मित्र, मँग्रो फाऊंडेशन, या विविध संघटना  या भागात हातात हात घालून कासव संवर्धनाची कामे करत आहेत. प्रत्येक संघटना आणि त्यातील प्रत्येक व्यक्ती एक ध्येय घेऊन यात सहभागी आहेत हे पाहून खूप छान वाटलं. परंतु शेवटी व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती या नियमा प्रमाणे जो तो आपल्या परीने यात आपली भूमिका बजावतो आहे. सुरवातीचे काही दिवस योजना आखणे आणि त्या प्रमाने काम वाटणे यात गेली परंतु नंतर मात्र या गोष्टी वेगाने मार्गी लागल्या. 
  शास्त्रीय पद्धतीने संशोधन करणे हि एक गोष्ट असते पण त्याच बरोबर या संशोधनाचा अंतिम ध्येय म्हणजे त्या प्रजातीचं रक्षण करणे आणि संवर्धनची बीजे स्थानिक लोक समहूयात पेरणे व तेथील अधिवासाचे संवर्धन करणे या बाबी देखील तिक्याच महत्वाच्या. या प्रक्रियेत बऱ्याच गोष्टी आणि व्यक्ती मी उलगडल्या त्यातील काही पुढीलप्रमाणे. 
  कासव संर्धनात जर अगदी महत्वाची भूमिका कोण निभावत असेल तर वन विभागाकडून नेमलेले त्या-त्या गावातील स्थानिक कासव मित्र. आंजर्ले, पालनदे, सालदुरे, मुरुड, कर्दे, लाडघर, कोळथरे, दाभोळ अशी एका बाजूला तर केळशी, वेळास अशी दुसऱ्या बाजूला असलेली सागर किनारी वसलेली कासवांची गावे आणि तेथील कासव मित्र म्हणजे एक मोठी संवर्धनची पुष्पमाळ. भगवान परशुरामाच्या या कोकण भूमीला जणू या संवर्धनच्या अथक परिश्रमाने हि सगळी कासव मित्र मंडळी एक तेज प्रदान करत आहेत. ऐन थंडी च्या काळात बोचऱ्या थंडीची पर्वा न करता ही मंडळी पहाटे आणि रात्री या किनाऱ्यावर गस्ती घालून किनाऱ्यावर येणाऱ्या प्रत्यक कासवाच्या मादीवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवत असताता. समुद्री किनारी फिरणारे भटके कुत्रे आणि चुकीच्या पद्धतीने पपर्यटन करणारे पर्यटक या सर्व गोष्टी पासून हि सर्व कासव मित्र मंडळी आपली कामगिरी चोख बजावतात.  या सर्व प्रयत्नात जी गोष्ट मला विशेष जाणवली ती म्हणजे यामधील बहुसंख्य कासव मित्रांचे शिक्षण जरी विशिष्ट शाखेत झाले नसले तरी त्याची कामगीरी मात्र अतिशय उत्तम अशी असते. अल्प मोबदला आणि आपली दैनंदिन काम सांभाळून हि सर्व मंडळी निष्ठेनं आपली कर्तव्य बजावत आहेत. 
  वाळूच्या किनाऱ्याचा चढ-उतार, वाळूचा पोत, कणांचा आकार, या वाळूत असलेली पाण्याची आद्रता आणि तापमान या आणि अश्याच आणखी कित्येक गोष्टी या खूप महत्वच्या असतात. या सर्व बाबींचा अभ्यास करणे आणि त्या बद्दल नोंदी करणे हि अतिशय महत्वपूर्ण परंतु किचकट आणि संयमाची परीक्षा पाहणारी गोष्ट असते. या सर्व प्रक्रियेत संशोधक म्हणून जर आपण आपली भुमीका निभावत असलो तरी स्थानिक पातळीवर हि कासव मित्र मंडळी योग्य भूमिका बजावतात. 
  ज्या समुद्री किनारी आपला जन्म झाला त्या समुद्र किनारी मादी वयात आल्यावर अंडी घालायला येते हि अद्भुत अशी निसर्ग किमया आहे. या गोष्टीमागे असलेली कारण-मीमांसा वैज्ञानिक जगतात आता शोधली गेली आहे परंतु तरीही एका लहान बालका समान जिज्ञासा मला या गोष्टीचं गूढ मात्र कायम मनात ठेवत असते. मादी जेव्हा अंडी घालायला या आईच्या किनाऱ्यावर येते तेव्हा ती खुप सऱ्या गोष्टी पाहून तीच विशिष्ठ जागा निवडते. वाळूचा तापमान हा आणखी एक गंमतीदार परिणामकारक घटक.  अधिक तापमान असेल तर मादी आणि कमी तापमान असेल तर नर, त्याच बरोबर घरट्याच्या मध्यभागी मादी आणि परिघावर नर कासव जन्माला येतात. जीवविकास शास्त्राच्या नियमाने विकास कर्यात काम करणारी पोषक रसायने आणि जीवउत्प्रेरके हि ठराविक तापमानात आपली परिणामकारकता प्रकट करत असतात. 
  समुद्र किनारी जर चुकून अंडी देण्याचा जागी खडक वा कठीण अशी रेती वा वाळू लागली तर मादी आपली दिशा आणि वेग बदलते वा अंडी देण्याची आपली जन्मजात जागा बदलते. किनाऱ्यांवर आढळणारी मार वेळ आणि चुकीचा पद्धतीने लागवड केलेली सुरुची लागवड हि पर्यटकांना आकर्षीत करू शकते परंतु या गोष्टी कासव संवर्धनात मात्र अडथळे ठरू शकतात. सागरी किनारे असलेल्या गावात आता एक गोष्ट आपण हमखास पाहू शकतो ती म्हणजे समुद्र किनारी दगड वा सिमेंट चे टेट्रा पॉड टाकून बनवेली रक्षक भिंत. पुरेशा संवर्धन धोरणाचा अभ्यास न करता या गोष्टी आज सर्वत्र केल्या गेल्या आहेत वा  चालू आहेत. या गोष्टी मानवी समाजाला निश्चित क्षणिक फायदा देत असतील परंतु या मुळे आपण या निसर्ग चक्रात आपला हस्तक्षेप करत आहोत. 
  या सर्व काळात काही व्यक्ती ना भेटणं आणि त्यांना ऐकणं हि खूप मोठी भाग्याची गोष्ट होती माझ्यासाठी त्यातील काही व्यक्ती आणि संघटना यांबद्दल मी कायम ऋणी असेल. कासव संवर्धनची विकास यात्रा इथे सपंली नाही, परंतु या लेखाची लांबी जास्त वाढली तर माझी लिहून व्यक्त होण्याची व एक वाचक म्हणून वाचण्याची गोडी कमी होईल. या लेख मालिकेचा पुढील भागात मला गवसलेली आणखी कासव संर्वधनाचे माणिक मोती आपल्या समोर सादर करेल. 


लेखन - 
प्रदिप नामदेव चोगले 
pradipnc93@gmail.com
mob- 9029145177









ऋणनिर्देश :- 

१. प्रा. अमोल हंडोरे सर, के.जी. डी. एम महाविद्याल, निफाड, नाशिक 
२. तृषान्त भाटकर, सुरुची भोजनालय, आंजर्ले 
३. मँग्रो फाऊंडेशन आयोजित कासव मित्र कार्यशाळा, आंजर्ले 
४. सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ, चिपळूण 
५. समस्त कासव मित्र 
६. या संशोधन प्रकल्पात सहभागी असलेले माझे इतर सहकारी मित्र 
७. भूषण रघुवीर, पाजपंढरी 
८. समस्त ग्रामस्थ ( आंजर्ले, पालनदे, सालदुरे, मुरुड, कर्दे, लाडघर, कोळथरे, दाभोळ, केळशी, वेळास ) 




टीप :- हा लेख कसा वाटला यांची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. हा लेख आपणस आवडला असेल तर आपल्या मित्र आणि परिवार सोबत शेर करायला विसरू नका. काही सूचना असल्यास खाली नोंदवा वा वर दिलेल्या भ्रमणध्वनी वर सपंर्क साधा. 








अधिक माहितीसाठी वाचा :- 
१. Kurian, A. (2013). Marine turtles along the Indian Coast, Distribution, Status, Threats and Management Implications. Report to the WWF, India, 23.

२. Standora, E. A., & Spotila, J. R. (1985). Temperature dependent sex determination in sea turtles. Copeia, 711-722.

३. Honarvar, S., O’Connor, M. P., & Spotila, J. R. (2008). Density-dependent effects on hatching success of the olive ridley turtle, Lepidochelys olivacea. Oecologia157(2), 221-230.

४. López-Castro, M. C., Carmona, R., & Nichols, W. J. (2004). Nesting characteristics of the olive ridley turtle (Lepidochelys olivacea) in Cabo Pulmo, southern Baja California. Marine Biology145(4), 811-820.

५. चित्र ;- 

   









































  
  














Comments

  1. This very nice observation and experience. Keep it up as conservator activity. Hat off you and your team.

    Dr. Ramnath

    ReplyDelete
  2. Great work! Is there any way, by which we can engage common people who want to contribute and children to make them more aware?

    ReplyDelete
    Replies
    1. yes, there is so many ways in which any one can give valuable contribution in marine conservation along the coastline. please share your mobile number and email id with me so I can shared one google form with you. based on your your skill and intrest we will developed upcoming activity with citizen and school children. Thank you for your intrest and valuable input .

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५