वामन अवतार आणि बळी राजा
 


सागरी मत्स्य संपत्तिची वामन कथा - भाग १ 

  भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध असलेली दशावतार संकल्पना आणि कथा माहीत नसेल असे व्यक्तिमत्व कोणी अभावानेच असेल. या दशावतारात एक अवतार फार लोभस आहे पण जेव्हा ते आपली परिसीमा गाठते तेव्हा त्याची व्याप्ती मात्र अमर्याद होत जाते. वामन अवतार म्हणजे वरकरणी पाहता एक छोटं बालक रूप पण जेव्हा हाच वामन रूप धारी भगवंत बळी राजाकडे तीन पाऊले जमीन मागतो तेव्हा सुरवातीला नाजूक आणि इवलेसे भासणारी पाऊले तिन्ही लोक व्यापतात. 
    पाचवे अवतार बळीच्या द्वाराला जासी 
       भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळी नेसी    
  आरती गाताना आपण हे पद नेहमी गातो परंतु या अवताराची तशी सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी नाही. असो या लेखाच्या माध्यमांतून मत्सव्यवस्थापन आणि नियोजन शाखेतील एक व्यापक शास्त्रीय गोष्ट आपणांस समजावून सांगताना या वामन रुपाची कृतज्ञता पूर्वक आठवण करणे इथे खूप उपयुक्त आहे. 
  ज्याप्रमाणे सुरवातीला खूप लहान भासणारी तीन वामन पाऊले संपूर्ण विश्व व्यापतात अगदी त्याच प्रमाणे काही गोष्टी या सुरवातीला फार शुल्लक आणि छोट्या वाटल्या तरी काही कालावधीनंतर त्या फार व्यापक आणि अमर्याद स्वरूप धारण करतात.   
  मासेमारी करून जगातील खूप छोटा समाज घटक हा जगभरातील फार मोठ्या समाजघटकाची अन्नपूर्ति करतो. परंतु ही मासेमारी करताना आज आधुनिक पद्धतीने वापरली जाणारी यंत्र, तंत्र आणि  व्यापारी नीती व औद्योगिकीकरण यामुळें मासेमारी हा एखादया समाजघटकाची शान वा मान न राहता अमर्याद  व्यापार नीती चं धोरण बनलं आहे. मासेमारी करण्याची पद्धत पारंपरिक असो वा आधुनिक परंतु मासेमारी करताना काही गोष्टी या सर्वसामाईक असतात. ज्या मत्स प्रजाती ला ध्यानात घेऊन आपण मासेमारी करतो त्याला Target catch वा आपण ध्येय निश्चित  प्रजाती ला अनुरूप मासेमारी म्हणू शकतो. परंतु हे करताना काही मासे वा इतर सागरी जीव हे गरज नसताना जाणीव पूर्वक वा अजाणीवपूर्वक पकडले जातात या सर्व सागरी जीवांना fisheries bycatch वा ध्येय निश्चित नसलेल्या मत्स वा सागरी प्रजाती म्हणू शकतो. fisheries traget catch आणि fisheries bycatch या दोन शब्दांना योग्य पर्यायी शब्द तूर्तास मला अजून सापडला नाही आहे. परंतु ध्येय निश्चित करून पकडलेल्या मत्स प्रजाती आणि निश्चित ध्येय म्हणून ज्यांचा अंतर्भाव नाही केला गेला आहे पण जे पकडले गेलेत अशा मत्स प्रजाती यांना अनुक्रमे आपण target catch आणि bycatch म्हणू शकतो. 
  वर उल्लेख केल्या गेलेल्या गोष्टीतून जी गोष्ट आपणांस अधिक चांगल्या रित्या समजून घेणं गरजेचं आहे ती म्हणजे मासे पकडताना जे मासे आपलं निश्चित ध्येय वा पकडायचे नाही आहेत असे मत्स प्रजाती अर्थात bycatch होय. मुरवस्की या मत्स शास्त्रज्ञांच्या एका संशोधन पत्रिकेत ही गोष्ट छान अशा वाक्यातून अधोरेखित होते ती अशी 'Yesterday’s bycatch may be tomorrow’s target catch' सोप्या शब्दात जे मासे आपणांस मासे पकडताना पकडायचे नसतात परंतु आपण जे पकडतो ते मासेच येणाऱ्या काळात पोट भरण्यासाठी आणि आपली रोजी चालवण्यासाठी उपयुक्त ठरणारे असतात. 



  का रं दादा आज काय साथ होती डोली ला? काय नं दोन पाटके होती साथ पण नुसता कुटा आणि पाला होता आज.  दर किमी ला पाणी आणि वाणी बदलत असते तशीच माझं गाव जे  मुरुड तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये  आहे तिकडे समुद्र किनारी आणि मावऱ्याचा जेथे बाजार भरतो तिकडे हा आणि असा संवाद मी बालपणापासून ऐकतो. फरक फक्त एवढंच पडला आहे कि माझ्या बालपणी म्हणजे १९९०-२००० पर्यंत साथ अर्थात टार्गेट कॅच ही  एकूण जास्त असायची आणि कुटा म्हणजे बायकॅच ही तुलनात्मक रित्या कमी असायची. आजच्या घडीला म्हणजे साधारण २०१०-२०२० या काळात कुटा जास्त आणि साथ कमी आणि जोडीला मोठ्या प्रमाणात प्लँस्टिक आणि कचरा डोलीला मोठ्या प्रमाणात सापडतो. या लेखाच्या सुरवातीला मी जे वामन अवताराची गोष्ट सांगितली ती हेच प्रमाण आपण लक्षात घ्यावे आणि हा बदल समजून घ्यावा यासाठीच . 
  १९९० ते २००० या दहा वर्षात आणि त्या आधी आपल्या इथे भारतात आणि विशेषता महाराष्ट्रात मासेमारी ही एक पारंपारिक व्यवसाय आणि काही मासेमारी समाज जसे कि ( कोळी, आगरी, वैती, मांगेला, वाघरी ई. ) 
समाजघटक करत होते. ही मासेमारी मुख्यतः दैनंदिन गरजेची गोष्टी ची परिपूर्तता व्हावी आणि जीवन सुखकर व्हावं यासाठी होत होती. यांमुळे मासेमारी समाज आणि या समाजातील प्रत्येक घटक हा समाधानी आणि आनंदी जीवन जगत होता. परंतु १९९० नंतर हळूहळू मासेमारी ही एक परंपरा न राहता व्यापारी आणि विदेश नीती चं हत्यार झाली. औद्योगिक मासेमारी आणि त्यासाठी ट्रॉलर बांधणे यासाठी सरकारी सबसिडी ची योजना मोठ्या प्रमाणात अंमलात आणली गेली. बोट बांधणे आणि जाळी विकत घेणे, फिश फायंडिंग मशीन आणि आधुनिक जी. पी. यस  मशीन यासाठी सबसिडी लाखात मिळू लागली मग, कोणी या सबसिडीने आपले धंदे मोठे केले तर कोणी घरातली विवाह उरकून घेतली तर कोणी बंगले बांधले. जे मासे पूर्वी अनुभवाने पकडणे शक्य होते ते आता यंत्रांच्या माध्यमातून पकडणे कोणालाही शक्य झाले. फिश फायंडिंग मशीन आणि छोट्या असाची जाळी यामुळे समुद्रात अशी एक जागा उरली नाही जेथे मासे लपु शकत होते. मग काय आधुनिकता आणि व्यापार नीती यांमुळे जे पूर्वी पकडणे शक्य नव्हते तितक्या मोठ्या प्रमाणत मासे पकडणे  शक्य झाले. मासे पकडण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या आणि सहकारी संस्था एकत्र येऊ लागल्या यातून मासे पकडणे ही पोटाची भूक भागवणे इतकं मर्यादित न राहता समुद्राचा पोट फाडून जेवढं शक्य आहे तितका समुद्र रिता करता येणं शक्य आहे असे प्रयत्न चालू झाले. आणि यातूनच सुरवातीला छोटी दिसणारी bycatch वा कुटा यांचे प्रमाण हळू हळू मोठं विक्राळ रूप धारण करू लागले. 
   खाली मी एक माहिती स्तंभालेखाच्या माध्यमातून मांडली आहे ज्यात जगभरातील विशेष असे मासे पकडणाऱ्या देशाची माहिती आहे. एकूण मासे किती प्रमाणत पकडले गेले आणि त्यातील शेकडा किती प्रमाणात हे  मासे हे कुटा वा bycatch स्वरूपात आहेत त्याचा तपशील मांडला आहे. 


 वर दर्शवलेल्या आलेखात एक्स अक्षावर विविध देश नोंदलेले आहेत आणि वाय अक्षावर पकडलेल्या एकूण मत्स साठ्यापैकी जी मत्स संपदा bycatch वा कुटा या गटात मोडेल त्याची नोंद केली गेली आहे. 
  Bycatch वा आपण ज्याला कुटा म्हणतो ती गोष्ट शास्त्रीय पद्धतीने समजून घेणं खूप गरजेचे आहे. त्याच कारण आपण,साधारण जे मासे आपणांस गरजेचे नाही आहेत वा छोटे मोठे मासे आणि त्यांची पिल्ले आणि अंडी असे कुटा या प्रकारात मोडतात परंतु जेव्हा ही गोष्ट आपण एखाद्या देशाच्या एकूण मत्स संपदेच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा त्याची योग्य व्याख्या करणे गरजेचे असते.Bycatch is catch that is either unused or unmanaged अर्थात जे मासे आपण पकडल्यावर उपयोगी नाही म्हणून गृहीत ठरवतो व असे मासे जे योग्य नियोजन अभावी चुकून पकडले जातात त्याला Bycatch वा कुटा असे आपण म्हणू शकतो. 
  वर आलेखात दाखवल्या प्रमाणे बांगलादेश ह्या आपल्या शेजारील राष्ट्रात एकूण मासे पकडले जातात त्यातील शेकडा ९५.७% मासे हे या कुटा वा Bycatch प्रकारात मोडले जातात. जर ह्या प्रमाणाची व्याप्ती आपण लक्षात घेतली तर आपण समजू शकतो की किती मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंम्पत्ती चं नियोजन शून्यतेमुळे नुकसान करत आहोत. एकूण पकडलेल्या मत्स्य साठ्या पैकी जर ९०% हुन अधिक मासे हे खाण्यायोग्य आकारापेक्षा लहान आहेत किंवा आपण ज्यांना भविष्यात उपयोगात आणू शकतो अशा मोठ्या सागरी मत्स प्रजातींचे पिल्ले वा अंडी असतील तर आपलं भविष्य किती अंधारात आहे. या उलट जर या आलेखात आपण सर्वात शेवटी कॅनडा या प्रगत राष्ट्राकडे पहिले तर हे प्रमाण शेकडा ८.१% इतकं नगण्य आहे. योग्य पद्धतीचं मत्स साठे पकडणे याबद्दल प्रशिक्षण तसेच नियमांची योग्य अमंलबजावणी व मत्स संवर्धन पूरक शासकीय मत्स धोरण यामुळे हे तिकडे शक्य झालं आहे. 
  जर या आलेखात आपण आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या येथील हे प्रमाण देखील चिंताजनक आहे. शेकडा ५६.३% हे प्रमाण आपल्या इथे नोंदवले गेले आहे. म्हणजे आपण सर्व मिळून या देशात जितके मासे पकडतो त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक मासे आपण फुकट घालवत आहोत. मासेमारी व्यवसायात आता काही उरलं नाही अशी ओरड जी सध्या आपण ऐकतो त्यातील एक न दिसणारी बाब म्हणजे ही गोष्ट. आपण ज्या कोणत्याहि मासे पकडण्याच्या पद्धतीने मासे पकडतो मग ते डोल, रापण, धरण असो कि पर्स नेट असो जाळ्याचा शेवटी आपलं जो आस असतो म्हणजे जाळ्याचा आकार हा साधारण त्या ठराविक राज्य आणि जिल्हा यांच्या नुसार निर्धरित केल्या प्रमाणे असायला हवा. जसे कि कोणत्याही यांत्रिक पद्धतीने मासेमारी करणारी ट्रालर जी ठाणे, बृहमुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्हाच्या अंतर्गत येणाऱ्या सागरी मासेमारी भागात आहे त्यांनी ३५ मिमी पेक्षा कमी आस असलेले मासेमारीचे जाळे वापरू नये. रत्नागिरी जिल्हा सागरी क्षेत्रासाठी हि मर्यादा २५ मिमी पेक्षा कमी नसावी अशी आहे (राजेश के.  एम . 2013) विशिष्ठ प्रदेशातील सागरी भूभाग आणि समुद्रा च्या अंतर्गत असणाऱ्या रचनेवरून हि मापे निश्चित केली गेली आहेत.   
       असं झालं तरच जाळ्यात अडकणारे छोटे मासे आणि इतर निरोपद्रवी जीव म्हणजे कासवे आणि सस्तन प्राणी यांची सुटका करणं शक्य आहे. जाळ्याची आस जर छोटी असेल तर आपल्याला एकूण मासे किंवा कोळिभाषेत 'साथ' हि जास्त मिळेल परंतु याने आपला फायदा न होता दीर्घकालीन तोटाच होतो. 
( क्रमश ) 

लेखन
प्रदिप नामदेव चोगले 
pradipnc93@gmail.com
Mob - ९०२९१४५१७७





टीप :- 
साथ = Target catch 
कुटा =  Bycatch 
डोल = Type of fishing net

  वरील  लेखामध्ये असलेली सांख्यिकीय माहिती आणि आकडे खाली दिलेल्या संशोधन पत्रिकेतील लेखा मधून घेतली आहे. आधुनिक आणि सुधारित संशोधना नुसार यात वेळेबरोबर बदल होऊ शकतो.  


आपणांस हा लेख आवडल्यास तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नोंदवावी. या लेखाचा पुढील भाग मी काही दिवसातच आपल्या समोर घेऊन येईल.  






संदर्भ सूची :- 
१. Murawski SA. The challenges of finding solutions in multispecies fisheries. In: Schoning RW, Jacobson RW, Alverson DL, Gentle TG and Auyong J. editors. Proceedings of the National Industry Bycatch Workshop, February 4–6, 1992, Newport, Oregon. Seattle, Washington: Natural Resources Consultants, Inc.; 1992. p. 35-45

२.  Kelleher K. Discards in the world’s marine fisheries: An update. Rome: Food and Agriculture Organisation of the United Nations, FAO; 2005, 131pp.

३.  Luther G, Appana Sastry Y.  Occurrence of spawners, juveniles and young fish in relation to the fishery seasons of some major fishery resources of India—a preliminary study, Marine Fisheries Information Service, T & E. Series No. 122. August-September, 1993. 

४.  Biju Kumar A, Deepthi GR.  Trawling and bycatch: implications on marine ecosystem. Current Science 2006; 90(7): 922-931. 

५. Bhathal B. Historical reconstruction of Indian marine fisheries catches, 19502000, as a basis for testing the Marine Trophic Index.  Fisheries Centre Research Reports 13(5).  Fisheries Centre, University of British Columbia, 2005. 

६. Central Marine Fisheries Research Institute.  Pelagic Fisheries Division http://www.cmfri.com/cmfri_pfd.html (2006). 

७. Wood FF, Brown JH, MacLean MH, Rajendran I. Feeds for artisanal shrimp culture in India—their development and evaluation. Madras: Bay of Bengal Programme (1992). 

८.  Chandrapal GD. Status of trash fish utilization and fish feed requirements in aquaculture –India.  Paper presented at the “Regional Workshop on Low Value and ‘Trash Fish’ in the Asia-Pacific Region” Hanoi, Viet-Nam 7-9 June, 2005.

९. Davies, R. W. D., Cripps, S. J., Nickson, A., & Porter, G. (2009). Defining and estimating global marine fisheries bycatch. Marine Policy33(4), 661-672.

१०. Rajesh, K. M. (2013). Fisheries legislation in India

11. Image source - वामन अवतार आणि बळी राजा 
image source: - https://www.bhubaneswarbuzz.com/updates/festivals/vamana-janma-lord-vishnu-incarnates-human-vamana-avatar












Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५