गणपती बाप्पा - एक सांस्कृतिक प्रतीक निसर्ग संवर्धकाचं 



  आज दिनांक २२/०८/२०२० अर्थात भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच  आपली लाडकी श्रीगणेश चतुर्थी. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून जे कोरोना रुपी संकट उभ्या जगतावर चालून आले आहे त्या दुःखा पासून जणू आपणांस हे दुःखहर्ता हे नामाभिमान पूर्ण करण्यासाठी बाप्पा आपल्या घरी आला आहे. आपण कितीही निसर्गावर मात करू अशी भाषा बोलली आणि प्रगती केली तरी आज आपणांस कळून चुकलं आहे कि निसर्ग हाच खरा गुरु आहे. एक छोटासा, डोळ्यांनी हि न दिसणारा विषाणू उभी मानव जातीची गती बंद करू शकतो यावरून आपण या निसर्गा समोर किती खुजे आहोत हे आपणांस समजून चुकले आहे. 
  आपण समुद्राला मागे सारून त्यात मुबंई आणि यांसारखी कित्येक महानगरे उभारली, जंगल आणि डोंगर  पोखरून महामार्ग आणि स्मार्ट सिटी वसवल्यात. नदीवर मोठाले धरण बांधून कित्येक गाव आणि जैवविविधता संपन्न अधिवास नष्ट केले. निसर्ग हे सर्व निमूटपणे कित्येक शतके सहन करत होता. पण २०१० पासून तो आपली भूमिका मांडायला लागला. निसर्ग आपली मत व्यक्त करतो तेव्हा आपण हवालदिल होत याच उत्तम उदाहरण म्हणे १० दिवसापूर्वी मुंबई मध्ये झालेला प्रचंड पाऊस आणि समुद्र किनारा आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली समानता. अचानक जोरदार सतत पडणारा पाऊस तर कुठे पाणी-पाणी करत त्रासणारे शेतकरी आणि पिके. आपल्याला विकास हवा आहे मग आता तर त्या साठी कोणत्या हि थराला जाऊन आपण निसर्गावर बुलडोझर फिरवत आहोत.२०व्या शतकाच्या आरंभा आधी दोन हजार वर्ष जगातील तापमानात आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत काही खास फरक नाही पडला होता.परंतु २०व्या शतकाच्या सुरवातीपासून माणूस विकास कामे आणि प्रगती यांसाठी मोठ्या प्रमाणात निसर्गाला चिरडवून आपला मार्ग तयार करू लागला त्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे प्रचंड वेगाने वाढत जाणारे जागतिक तापमान(टायटस, जे.जी आणि इतर संशोधक., २००९ ).जर आपण या तापमान वाढीचा दृश्य परिणामातील एक बाब म्हणजे जगभरातील समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली सरासरी वाढ पाहीली तर १८८०-२०१३ या कालावधीत ती ०.०६ इंच प्रति वर्ष इतकी दिसून येते. म्हणजेच वर्ष १९९३ पासून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत जगभरात ०.११ - ०.१४ इतकी वेगवान वाढ झाली आहे(चर्च, जे.ए. आणि इतर संशोधक २०११, नोवा २०१६). आणखी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे हा वेग वर्षाला दुपट्टीने भरेल इतका आहे(चित्र क्रमांक १ ).

चित्र क्रमांक १- जागतिक सरासरी प्रमाणात  समुद्राच्या पातळीत झालेली वाढ 


   असो सांगायचं म्हटलं तर अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यांनी आपण हे सिद्ध करू शकतो कि माणूस म्हणून आपण जे काही प्रगती आणि विकास कामे केली त्याचा मोबदल्यात निसर्गाला आपण किती प्रमाणात हानी पोहचवली आहे. कोविड-१९ हा विषाणू आज जगभरात धुमाकूळ घालत आहे परंतु जर आज त्याच्या मागे असलेल्या संभाव्य धोके पहिले तर काही बाबी या खास कारणीभूत ठरल्या आहेत जसे कि मोठ्या प्रमणात होत असलेली जंगल तोड आणि भूमी वापराचे बदलते स्वरूप, मोठ्या प्रमाणात होत असणारी शेती आणि प्राणिजन्य संसाधनाचा वापर, वातावरण बदल, बेकायदेशीर होणारी वन्य जीवांची तस्करी आणि हाताळणी, शेती आणि इतर संबंधी बाबी यांमधून होत जाणारी रोगप्रतिकारक सूक्ष्मजीवांची पैदास(युनो १९९२,युनो १९९४)चित्र क्रमांक २.  

चित्र क्रमांक २.- कोविड-१९ सारखे रोग पसरण्याची संभाव्य कारणे 


   वरील साऱ्या बाबी विचारत घेतल्या आणि सगळी गोष्ट वाचली कि एकच गोष्ट आपणस कळते कि मनुष्य म्हणून आपण किती हि प्रगती केली तरी आपण देखील एक प्राणी आहोत याच भान नाही हरपायला पाहिजे. 
   आज या शुभ दिनी बुद्धीची देवता म्हणून गणपती बाप्पा आपल्या घरी आले आहेत तर या निसर्गाला वाचवण्यासाठी त्याला समजून घेण्यासाठी गणराया हे खूप उत्तम प्रतीक आहेत. मनुष्याची काय बरोबर काय चूक हे निवड करण्याची क्षमता हि त्याला इतर पशूंपेक्षा वेगळी करते तर गजवंदनाचे शीर हे उपजत बुद्धिमतेचे प्रतीक आहे. म्हणजे काय तर मन आणि बुद्धी यांचा योग्य संगम आपण जुळवून आणला तर खऱ्या अर्थाने आपण निसर्ग संवर्धक म्हणून जबाबदारी निभावू शकतो. बाप्पाचे मोठे सुपासारखे  कान हे आपणांस शिकवण देतात कि जसं सूप फोलपटे बाहेर टाकतं आणि चांगलं धान्य आत ठेवत त्या प्रमाणे वाईल्ड लाईफ किंवा कॉन्झर्वेशन म्हणून भूमिका निभावताना सगळं काही सगळ्या बरोबर ऐकून घ्यायचं, मग ती बाजू विकासकाची असो वा विरोधकांची अंतिम निर्णय मात्र बुद्धीला पटेल आणि हृदय पण ज्याची समंती देईल अश्या योग्य कृतीची असावी. बाप्पाचं मोठं पोट आणि चिमुकले डोळे हे पण प्रतीक आहेत आपल्यासाठी.  ते म्हणजे निसर्ग संवर्धनाचे काम करताना खूप साऱ्या लोकांबरोबर आणि संघटनांबरोबर काम करत असतो अश्या वेळी साऱ्याचे गुण दोष पोटात साठवायचे ते सतत बाहेर नाही काढायचे तरच संघटन मजबूत होईल आणि निसर्ग संवर्धन आणि अभ्यास सर्वांपर्यंत पोहचेल. बाप्पा उंदरावर बसून येतो, उंदीर म्हणजे असा जीव जो सगळ्या घरात प्रवेश करतो वा करू शकतो. त्याच प्रमाणे निसर्ग संवर्धक म्हणून धुरा सांभाळताना आपण देखील आपला खोठा गर्व आणि अहंकार बाजूला सारून घराघरात जाऊन झोपडी-झोपडीत आणि खोपडी-खोपडीत सहजतेने शिरून निसर्ग संवर्धनाचे विचार पोहचवले पाहिजे. बाप्पा चे सगळ्यात सुंदर आकर्षक शरीर वैशिष्ट म्हणजे त्यांची सोंड. जंगलात हत्ती काही खाण्या आधी जे काही त्याच्या समोर आहे ते आपल्या सोंडेने सर्वत्र आजूबाजूला फवारतो. इकॉलॉजी च्या भाषेत ती एक अम्ब्रेला प्रजाती आहे, म्हणजे असा जीव ज्याच्या अस्तित्वाखाली बरेच जीव आपलं जीवन चालवतात. निसर्ग संवर्धक म्हणून देखील आपली भूमिका अशी असली पाहिजे ' जे जे आपणांसी ठावे ते ते इतरांसि सांगावे शहाणे करून टाकावे सकळ जण' अर्थात आपण जमा केलेली माहिती आणि ज्ञान आपण इतरापर्यंत पोहचवले पाहिजे. बाप्पा ला जे दंत आहेत त्याच्या मध्ये एक दात अर्धा आणि एक पूर्ण आहे. माझे आजोबा सांगायचे कि पूर्ण दात हे श्रद्धेचं प्रतीक आहे आणि अर्धा दात हे बुद्धीच प्रतीक आहे. त्याच प्रमाणे आपण देखील निसर्ग संवर्धकाचा काम करत असताना आपली बुद्धी कुठे तरी कधी कमी पडली तरी चालेल परंतु निसर्गाप्रती असलेलं प्रेम आणि कणव मात्र तिळमात्र कमी नाही झाली पाहिजे. आपल्या देशात 'चिपको आंदोलन' हे प्रतीक होत कि निसर्ग वाचवण्यासाठी खूप मोठ्या डिग्री आणि संशोधक कार्याच्या अनुभवाची गरज नाही तर खरी प्रेरणा असते अंतरी दडलेली निसर्गा प्रति प्रेम आणि श्रद्धेची भावना यांची. बाप्पा चं आणखी एक नामाभिमान आहे 'गणपती' अर्थात गणाचा पती म्हणजे जो उत्तम संघटक आहे ज्याला योग्य पद्धतीने नेतृत्व देता येत अशी व्यक्ती हि मोठी मोठी कामे सहजतेने सध्या करू शकते. आज आपण जगभरात हेच चित्र पाहतोय कि संशोधक उत्तम संशोधण  करत आहेत, संवर्धक संवर्धन करत आहेत परंतु जेव्हा गोष्ट एक ध्येय आणि एक विचार घेऊन काम करण्याची येते तेव्हा मात्र गोष्ट उभी राहते कि क्रेडिट कोण घेणार याची. म्हणजे एक गोष्ट बाप्पा ला आठवून आपण समजून घेतली पाहिजे कि उत्तम संवर्धन करण्यासाठी सगळ्या संघटना आणि सहकार्यांना एकत्र करू शकेल असं संघटन आपण केलं पहिजे. 
   बाप्पा चा आवडता आणि हो मला हि आवडणारा प्रसाद म्हणजे 'मोदक' हे मोदक देखील आपणांस छान गोष्ट सूचित करतात. ज्या प्रमाणे मोदक बनवण्यासाठी पुष्कळ वेळ आणि संयम लागतो तसेच ते झाल्यावर ते बाहेरून जरी काही खास रंगाचे नसेल तरी त्याची गोडी मात्र चाखताच मनी आनंद देऊन जाते. त्याच प्रमाणे लोक निसर्ग संवर्धकाला विचारतात कि 'झाडे लावा झाडे जगवा' याने काय होईल, सगळेच कचरा एकत्र टाकतात मग 'ओला कचरा सुका कचरा' मी वेगळा टाकला तर काय फरक पडतो. सर्वच जग प्लँस्टिक बॉटल पाणी पिण्यासाठी वापरतात मग मी का स्टील वा धातूची एकच बॉटल पुन्हा पुन्हा वापरू. निसर्ग जपवणूक करणाऱ्या बाबी आपण जेव्हा पाळायला सुरवात करतो तेव्हा प्रचंड संयम लागतो परंतु 'शुद्ध बीजपोटो फळे रसाळ गोमटी' या नियमाप्रमाणे आपलं एक पर्यावरण पूरक जीवनशैलीच पाऊल येत्या काळात 'मोदक' प्रमाणे जीवन आनंद  द्विगुणतीत करेल. 


- लेखन
प्रदिप नामदेव चोगले (सागरपुत्र)  
pradipnc93@gmail.com
mob. 9029145177 





    

टीप :- गणपती बाप्पा हे माझ्या साठी आणि इतर सगळ्या साठी उपास्य दैवत आहे. बाप्पा च रूप आणि त्या मागे असलेली धार्मिक, अध्यात्मिक वा सांस्कृतिक कारणे बरेच वेगळी असतील. यातील बरेच बाबी माझ्या विचारांची फारकत असलेल्या असतील परंतु, हा लेख लिहिताना एकच भावना माझ्या मनात होती कि बाप्पा बद्दल जे मी लहान वयापासून आजतागायत ऐकलं, वाचलं आणि पाहिलं या गोष्टीला निसर्ग संवर्धना बरोबर जोडनं  वा जोडण्याचा प्रयत्न केला. 
    भारतीय संस्कृतीत अनेक सण आणि उत्सव आहेत त्यातील एक म्हणजे गणपती बाप्पा चं आगमन ज्यात आपल्या घरी होत तो सण. सध्या मी निसर्ग संशोधनाच्या भूमिकेत वावरत असताना निसर्ग पाहतोय, अभ्यासतोय त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. अश्या वेळी आज वाटलं कि बाप्पा ना समोर ठेऊन काही निसर्ग संवर्धनची ऋचा लिहावी त्याचा हा प्रयत्न. 


संदर्भ :- 
  1.  Titus, J.G., E.K. Anderson, D.R. Cahoon, S. Gill, R.E. Thieler, and J.S. Williams. 2009. Coastal sensitivity to sea-level rise: A focus on the Mid-Atlantic region. U.S. Climate Change Science Program and the Subcommittee on Global Change Research. https://downloads.globalchange.gov/sap/sap4-1/sap4-1-final-report-all.pdf. 
  2. CSIRO (Commonwealth Scientific and Industrial Research Organisation). 2015 update to data originally published in: Church, J.A., and N.J. White. 2011. Sea-level rise from the late 19th to the early 21st century. Surv. Geophys. 32:585–602. www.cmar.csiro.au/sealevel/sl_data_cmar.html.
  3. NOAA (National Oceanic and Atmospheric Administration). 2016. Laboratory for Satellite Altimetry: Sea level rise. Accessed June 2016. www.star.nesdis.noaa.gov/sod/lsa/SeaLevelRise/LSA_SLR_timeseries_global.php.
  4. UNITED NATIONS FRAMEWORK CONVENTION ON CLIMATE CHANGE, FCCC/INFORMAL/84 GE.05-62220 (E) 200705, 1992
  5. INTERGOVERNMENTAL NEGOTIATING COMMITTEE FOR THE ELABORATION OF AN INTERNATIONAL CONVENTION TO COMBAT DESERTIFICATION IN THOSE COUNTRIES EXPERIENCING SERIOUS DROUGHT AND/OR DESERTIFICATION, PARTICULARLY IN AFRICA, A/AC.241/27 12 September 1994, UNITED NATIONS
  6. https://www.decadeonrestoration.org/
  7. संस्कृती पूजन, Published by Sat Vichar Darshan,  पांडुरंग शास्त्री आठवले
  8. भारतीय संस्कृती,  ई-बुक, साने गुरुजी
  9. गणपती बाप्पा चित्र (https://i.pinimg.com/564x/6f/38/87/6f3887c66c425b597874e0e2c8c7b3e7.jpg)








        










Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५