निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ४

                               सातपटी - मुरबे आणि पापलेट 



  मार्च महिन्याच्या १४ तारखेला आम्ही आमचा प्रवास सुरू केला तो अर्थात केंद्रीय समुद्री मत्सकी संशोधन संस्था कोचीन कडून महाराष्ट्राच्या दिशेन. वर्ष २०१२ मध्ये ‘भारतीय समुद्री परीक्षेत्रा अंतर्गत आढळणारे सागरी सस्तन प्राणी’ या प्रकाशित झालेल्या पुस्तका अनुसार भारतीय समुद्री क्षेत्रात सत्तावीस विविध सागरी सस्तन प्राणी असण्याची नोंद करण्यात आली आहे. या उपलब्ध संशोधन माहितीची शिदोरी घेऊन सध्या भारतीय परीक्षेत्रात आढळणारे सागरी सस्तन प्राणी याची एकूण प्रजाती विविधता आणि विपुलता समजून घेणे हाच उद्देश ठेऊन आम्ही महाराष्ट्राकडे प्रयाण केले. सुमारे ७२० किमी सागरी किनारा महाराष्ट्राला लाभला आहे या समुद्री किनाऱ्य अंतर्गत विविधतेने संपूर्ण अशी बंदरे आणि कोळीवाडे या किनाऱ्य वर डोलाने उभे आहेत.

  या सागरी संशोधन सफरी अंतर्गत जे काही संशोधन होईल ते आपण सारेच काही कालावधी च्या अंतराने विविध संशोधन शोधपत्रिकेच्या लेख मालिकेच्या स्वरूपात वाचू शकता. परंतु या मोहिमे अंतर्गत मी पाहिलेला महाराष्ट्र तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अवघड संशोधन कक्षेत बसणाऱ्या गोष्टी मला जेवढ्या प्रमाणात शक्य असेल तेवढ्या प्रमाणात सहज करण्याचा मी प्रयत्न करेल. ही लेख मालिका लिहिण्याचा माझ्या उद्देश फक्त एवढाच असेल की या माझ्या मातीत राहणाऱ्या बंधु-भगिनिना याची जाणीव झाली पाहिजे की निसर्ग आणि दर्या राज्यात आता कोणते बदल होत आहेत. अश्या कोणत्या पद्धती आहेत ज्या आपल्या वाडावडिलांकडून आल्या असून देखील आज ही त्या तितक्याच परिणामकारक आहेत आणि अश्या काय बाबी आहेत ज्यात आपण बदल करू शकतो. या लेख मालिकेच्या उद्देश आणि स्वरूप समजून झाल्या नंतर आपण आता वळुया आपल्या मुख्य लेख प्रवाहाच्या दिशेने. 

  साधारण १५०० किमी प्रवास करून पहिला मुक्काम झाला तो ‘सातपटी’ या पालघर जिल्हयात स्थित असलेल्या गावामध्ये. दोन वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी आणि तिचे काही विद्यार्थी असे आम्ही सारे या गावात गेलो होतो. सातपटी गावाची संपन्न ‘मासेमारी समाज सोसायटी’ आणि भव्य असा कोल्ड स्टोरेज आणि बर्फ कारखाना हे असे सबल पुरावे आहेत या गावात मासेमारी किती मोठ्या प्रमाणात होत आहे याची. २०१९-२०२१ या वर्षात जी गोष्ट बदलली नाही ती म्हणजे या गावात असलेली मोठी क्रिकेट ची क्रीडांगणे, होली च्या उत्सवानिमित असलेली पारंपरिक सजावट, मासेमारी करणाऱ्या महिलांची लगबग, बंदरावर सतत होणारी मसेमारी होड्याची वर्दळ. एक समस्या त्या वेळी देखील मी पहिली होती आणि आज देखील ती तशीच आहे क्वचित जरा वाढली असेल ती म्हणजे सातपटी आणि मुरबे या गावाच्या मध्ये असलेल्या सागरी क्षेत्रात सचलेली गाळ आणि चिखल याचे ढिगारे. माझ्या काही मित्र मंडळी सोबत त्या वेळी देखील चर्चा घडली आणि आज देखील या बाबत विचारणा करत असताना एकच गोष्ट प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे या समस्या दूर करण्याची राजकीय दिरंगाई आणि स्थानिक गट. वर्ष २०१२ प्रकाशित झालेल्या मत्सकी सर्वेक्षण अहवाल  (CMFRI, K. (2012). Marine Fisheries Census 2010 Part II. 9 Maharashtra) अनुसार या गावातील एकूण मासेमारी वर अवलंबून असलेली लोकसंख्या आणि मासेमारी ची आकडेवारी ही अशी आहे. एकूण मासेमारी करणारे कुटुंब २६३९, एकूण मासेमारी समाजाची स्थानिक लोकसंख्या १२५३२, यांत्रिक मासेमारी बोटी ची संख्या ११०, पारंपरिक बोटी ११, गिलेनट आधारित मासेमारी करणारे १४८, डोलनेट १९ तसेच एकूण मासेमारी करणाऱ्या बोटी २९५. महाराष्ट्रातील या कोळीवाड्यात पापलेट या मत्स्य खवये च्या आवडीच्या मास्याची सगळ्यात जास्त उलाढाल होत असते. आज किलो मागे याची किंमत किती हा आकडा ठरवण्यासाठी येथे पकडण्यात आलेले मासे महत्वपूर्ण भूमिका बजावतात.




  या सातपटी गावासमोर असलेले दुसर गाव म्हणजे ‘मुरबे’ हे होय. आकाराने तुलनात्मक रित्या छोटे पण तरीही मासेमारी बाबत संपन्न. गावाच्या सीमेवर असलेली छोट्या-मोठ्या जेट्टी जणू हात जोडून आपल्याला आमंत्रण करत असतात. बंदरावर असलेल्या रस्त्याच्या किनारी छोटे मावरा सुकवायचे खळे हवेत एक मंद सुवास सोडत असतात. आख्या रस्ता जणू सुक्या बोंबील आणि वाकटी च्या तोरणाने सजवलेला असतो. गावाच्या उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणात कोळंबी पालन मत्स शेती चे प्रयोग जोर धरून आहेत. आख्या किनारा कांदळवनाणे समृद्ध आहे. अवेसईनीय मरीना या प्रजातीची खारी पाणथळ क्षेत्रातील वनस्पति येथे विपुलतेने दिसून येते. या सगळ्या निसर्गपूरक बाबी सोबत अश्या ही काही गोष्टी आहेत ज्या मला संवेदनशील वाटल्या. या गोष्टीत प्रामुख्याने अंतर्भाव होतो ..(क्रमश) 

  पुढील भाग लवकरच या लेख मालिकेच्या पाचव्या भागात ..


- लेखन

  एक सागरपुत्र

प्रदिप नामदेव चोगले 

मोबाईल ९०२९१४५१७७ 

pradipnc93@gmail.com


टीप: - सागरी सस्तन प्राणी आणि समुद्री कासवे यांच्या संशोधन आणि सर्वेक्षण दरम्यान एका वेगळ्या पद्धतीने मी महाराष्ट्र अनुभवला. या सफरी च्या वेळी मी अनुभवलेले हे काही अनुभव. हा लेख आपल्यास आवडल्यास नक्कीच आपल्या परिचित मंडळी मध्ये शेर करा. आपण आपल्या प्रतिक्रिया खाली कमेन्ट मध्ये नोंदवू शकता.  





  





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५