मी, पुस्तके आणि जीवन

 



एक राजयोगी मी अनुभवलेला - स्वामी विवेकानंद 


  आठवत नाही त्या दिवशी काय तारीख होती परंतु तो दिन माझ्या भाग्याचा होता. २००५ च्या उन्हाळी सुट्टीला मी माझ्या आजोळी होतो. दुपारची जेवणं संपवून सर्व जण ओसरीत पहुडले होते. साधारण साठी पार झालेली माझी आजी कोणती तरी जुनी पुस्तके हळुवार पणे वाचत होती. अश्या वेळी मी देखील त्या जुन्या वाळवी लागलेल्या पुस्तकांच्या रद्दीतून काही खास मिळेल का म्हणून शोधू लागलो. एक पान हाती आले ज्यावर लिहले होते "गीता वाचन करण्या परी फ़ुटबाँल खेळून तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाऊ शकता, तुम्ही जितक्या  वेगाने त्या फ़ुटबाँल ला किक मारू लागत तसे तुमचे शरीर चांगले सुदृढ  होईल मग तुम्हाला गीता अधिक चांगली कळेल. तुमच्यातील रक्त थोडे शक्तिशाली झाले मग तुम्ही भगवान श्रीकृष्ण ची महती आणि अर्जुन चं  श्रेष्ठत्व समजू शकता" हे बोल होते पु. स्वामी विवेकानंद यांचे. दहावी च्या परीक्षेसाठी रामकृष्ण मिशन ची स्थापन कोणी केली? उत्तर- स्वामी विवेकानंद; या महान व्यक्तिमत्व बाबत माझी इतकीचं  काय ती माहिती. परंतु असे विधान हे स्वामी विवेकानंद याचं  आहे म्हणून मोठ्या परिश्रमाने पुस्तकाच्या गठ्यात सगळीकडे पसरलेली त्या पुस्तकांची मिळतील तेवढी पाने एकत्र केली आणि झपाटल्या सारखं ते पुस्तक वाचून पूर्ण केलं. अचानक पणे माझ्या जीवनात त्या दिवशी त्यांनी प्रवेश केला. 

  २००६ च्या हिवाळ्यात मी स्वामी विवेकानंद ग्रँथावली भाग १-१० वाचून संपवले होते. मी म्हणजे त्यांच्या विचाराने पुरता कंपायमान झालो होतो. मासेमारी करणाऱ्या माझ्या कुटूंबात अचानक पणे मी शाकाहारी झालो होतो. विचार कृती ला आकार देत होते. इन्स्य्क्लोपीडिया ब्रिटिंनीका चे सगळे अंक स्वामीजींनी वाचून मुखोदगत केले होते म्हणून मी देखील रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत याचे अखंड वाचन सुरु केलं. पण माझी ती काय बिशाद स्वामीजी बरोबर शर्यत लावायची जवळपास चार महिने हा क्रम  अखंड चालू राहिला पण मी विश्व्कोशाचे फक्त ४ खंड फक्त वाचू शकलो. पण एक मात्र निश्चित यांमुळेच माझं वाचन हे वेगवान आणि अव्हातपणे आज पर्यंत चालू राहिले. 

  २००७ मध्ये मी फक्त अभ्यास करायचा आहे म्हणून कित्येक संशोधन पत्रिका माझ्या डोळ्याखालून भराभर वाचून काढल्या. बोर्डाचा परीक्षेचा अभ्यास सोडून रोज फ़ुटबाँल आणि अवांतर वाचन यांमुळे मी त्या वर्षी बोर्ड परीक्षेत नापास झालो. परंतु मला त्याची काहीच तमा नव्हती. मी पेढे वाटून माझं अपयश साजरं केलं. मी त्या वेळी काय कमावलं हे बहुधा माझ्या अंतस्थ सतत असणाऱ्या स्वामीजींना फक्त माहित असेल. मी प्रचंड आशावादी आणि ध्येय नजरेसमोर ठेऊन पुढे वाटचाल करू लागलो. एका पुस्तकांसोबत सुरु झालेला माझा प्रवास १२ वा रस्ता खार, मुबंई येथील रामकृष्ण मिशन पर्यंत मला घेऊन गेला. प्रचंड ऊर्जा, ध्यान आणि वाचन यांमुळे चक्क पुस्तक वाचताना स्वामी विवेकानंद यांना मी वाचतो कमी आणि त्यांच्या  सानिध्यात बसून चक्क मी त्यांना ऐकतो आहे अशी जाणीव होत असे. 

  एक प्रसंग मला आठवतो आहे स्वामीजींच्या जीवनातील जेव्हा स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या काही पश्चात शिष्य मंडळी एका उपवनात भ्रमंती करत असतात. अश्या वेळी कोणी कसलं ध्यान करावं याची चर्चा होत असते. यापैकी एक शिष्या त्यावेळी स्वामीजींना विचारते कि तुम्ही कश्यावर ध्यान केंद्रित करणार आहात? स्वामी जी उत्तर देतात मी तर सिंहाच्या हृदयाचे ध्यान करणार आहे. प्रचंड ऊर्जा आणि ध्येय आत्मसात करण्यासाठी. मी हे वाचलं नि पुरता स्तब्ध झालो. असाच  एक प्रसंग ज्या वेळी स्वामीजी रस्त्यावर एका मजुराची चिलीम भरून देत असतात आणि त्या व्यक्ती ला प्रभू स्वरूप पाहून सेवा भाव काय यांची आपल्याला शिकवण देतात. 

  आज देखील कित्येक मंडळी आध्यात्मिक क्षेत्रात भिन्न-भिन्न मत मांडत असतात परंतु संत उक्ती नुसार 'बोले तॆसा चाले त्यांची वंदावी पाऊले' अनुसार आपले विचार आणि साजेसे जीवन जगून स्वामी विवेकानंद यांनी सगळ्या जगताला मार्गदर्शक केल आहे. इलॉन मस्क आणि टेसला मोटर यांची सध्या जगभरात खूप चर्चा आहे. पण आपणांस माहीत असायला पाहिजे अशी गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंद आणि थोर शास्त्रज्ञ निकोलस टेसला यांची भेट. अध्यात्म आणि विज्ञान यांची गुंफण करणारी हि भेट होती. ध्यान, वैदिक गणिते ,सिद्धांत आणि ऊर्जा याबद्दल असेलेली भारतीय विचार धारा व स्वतः स्वामी विवेकानंद यांची वीज आणि ऊर्जा या बाबत असलेली आवड पाहून टेस्ला अतिशय चक्कीत झाले होते. 

 अश्या या चॆतन्यदायी, चिरतरुण स्वामी विवेकानंद याचे जीवन आपण समजून घेऊ शकलो तर कित्येक रहस्य आपण आपलीशी करू. राष्ट्रीय युवा दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती च्या आपणांस खूप साऱ्या शुभेच्छा 

              उठा जागे व्हा, आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.  

                                        - स्वामी विवेकानंद 








लेखन 

- प्रदीप नामदेव चोगले 

pradipnc93@gmail.com

१२/०१/२०२२ , केरळ 


-----------------------------------------------------------------------------------सन्दर्भ ग्रन्थ 

१) स्वामी विवेकानंद ग्रंथावली खंड १-१०, रामकृष्ण मिशन प्रकाशन 

२) शक्तीदायी विचार, स्वामी विवेकानंद, श्रीरामकृष्ण-विवेकानंद साहित्य,  

    रामकृष्ण मिशन प्रकाशन


 संदर्भ चित्र : https://www.facebook.com/IndiaInSerbia/photos/release-of-joint-postage-stamp-on-swami-vivekananda-and-nikola-tesla/2464439603572154/

------------------------------------------------------------

आपल्याला हा लेख आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र आणि परिवारबरोबर शेर करायला विसरू नक्की. आपल्या प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये नक्की नोंदवा 






 














Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५