समुद्र संवर्धन लेख मालिका - १

 जागतिक  मत्स्य  स्थलांतर दिन





  अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हे आपण नक्कीच शाळेत शिकलो आहोत. परंतु माणूस सोडून इतर सजीवांना वस्त्र हि बाब अपवाद वगळता अन्न आणि निवारा या गोष्टीसाठी मात्र सतत शोध घ्यावा लागतो. फक्त जमिनीवर राहून आपलं सम्पूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या 'भूचर' सजीवांना पर्यायाने या मूलभूत गरजांची परिपूर्तता करण्यासाठी तसे बरेच पर्याय असतात. परंतु उभयचर अर्थात जमीन आणि पाणी यांमध्ये रहाणारे जीव आणि निव्वळ पाण्यामध्ये राहणारे 'जलचर' यांना मात्र तुलनेने फार कमी पर्याय असतात. 
  प्रजनन, वाढ, अन्नाची मुबलकता आणि कमीत कमी शिकारी यांसाठी जगभरात गोड्या आणि खाऱ्या पाण्यात आढळणारे मासे हे स्थलांतर करत असतात. दोन ठिकांमधील अंतर, स्थलांतराची दिशा, स्थलांतरित प्रदेशातील पाणवठ्याचा प्रकार आणि जीवनातील कोणत्या वेळी हे मासे स्थलांतर करतात यांवर मत्स्य स्थलांतराचे शास्त्रीय वर्गीकरण करण्यात आले आहे. नदी, तलाव आणि समुद्रकिनारी वेगाने निर्मित होणारी विकास कार्ये भले हि आपल्याला 'स्मार्ट सिटी' वा 'मुबंई - शांघाय' स्वप्ने दाखवत असली मात्र कुठे तरी यांनी हा वेगाने वाहणारा शुद्ध जलप्रवाह सध्या अडखळत, वळणे घेत गाव आणि शहराची मलिनता सोबत घेऊन संथ होत आहे. स्टेफनी डीनेट आणि इतर संशोधक यांनी २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या शोध निबंधानुसार जगभरात गोड्या पाण्यात आढळणाऱ्या मत्स्य प्रजातीच्या संख्येमध्ये जवळपास १९७०-२०१६ या कालावधीत शेकडा ७६% इतकी घट नोंदवली गेली आहे. जगभरात 'मत्स्य स्थलांतर' या बाबत जनजागृती घडावी, नवसंशोधन करण्यासाठी प्रेरणा निर्माण म्हणून २१ मे हा दिवस 'जागतिक मत्स्य स्थलांतर दिन (World Fish Migration Day)' म्हणून साजरा करण्यात येतो. 
  मासे स्थलांतरण का करतात? उत्तर आहे मासे हे आपल्या जीवनकाळाच्या विभिन्न  विशिष्ट अवस्थेत आपल्या सभोवतालच्या पाण्याचा प्रवाह आणि त्याचा वेग, पाण्याची खोली आणि तापमान, पाण्यात उपलब्ध असलेली पोषक मूल्ये आणि अन्नसाठा यांवर अवलंबून असतात. या सगळ्या बाबीच्या परिपूर्तता करण्यासाठी मासे स्थलांतर म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात.
मत्स्य स्थलांतराचे प्रकार किती आणि कोणते? उत्तर आहे मत्स्य स्थलांतराचे मुख्य दोन प्रकार आहेत. 
  पहिला प्रकार म्हणजे  पोटामोड्रोमस (Potamodromous) सोप्या शब्दात बोलायचं म्हणजे या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ होतो 'नदीचे रस्ते' अर्थात या पद्धतीचे मत्स्य स्थलांतरा अंतर्गत मासे हे नदी, ओढे इत्यादी गोड्या पाण्यातच स्थलांतर करत असतात. प्रामुख्याने हे स्थलांतरण नदीच्या खालच्या भागातून तिच्या उगमाच्या दिशेने होत असते. 
  मत्स्य स्थलांतराचा दुसरा मुख्य प्रकार म्हणजे डायड्रॉमस (Diadromous) ज्याचे तीन उपप्रकारात वर्गीकरण करण्यात आलं आहे. या प्रकारातील मुख्य बाब म्हणजे या अंतर्गत मासे हे गोड्या आणि खाऱ्या पाण्यात विशिष्ठ वेळी स्थलांतरण करतात. अॅनाड्रॉमस या उपप्रकारात मासे हे प्रजनन कालावधीत खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्याच्या दिशेने स्थलांतर करतात. म्हणजे या प्रकारात मासे सुरवातीला गोड्या पाण्यात असतात व उर्वरित जीवन खाऱ्या पाण्यात राहतात. अटलांटिक साल्मोन किंवा आपल्या येथे ज्यास रावस म्हणतात या मत्स्य प्रजातीचा यात समावेश होतो. याचं अगदी उलट म्हणजे अधिकांश जीवन काळ गोड्या पाण्यात आणि  प्रजनन काळ खाऱ्या पाण्यात व्यतीत करतात अश्या प्रकारच्या मत्स्य स्थलांतराला कॅटाड्रोमस (Catadromous) असं म्हणतात. मत्स्य स्थलांतराचा विशेष असा उपप्रकार म्हणजे अँफिडरमॉस (Amphidramous) ज्यात मासे हि कोणत्या विशिष्ठ अश्या अधिवासात वास्तव्यास नसतात तर आपल्या गरजेप्रमाणे सतत आपली जागा बदलत असतात.  
जागतिक  मत्स्य  स्थलांतर दिन का साजरा करावा? उत्तर आहे मानवी जीवन आणि सभोवतालची जलचर विशेषता मत्स्य प्रजाती याचा पूरक सबंध समजून घेण्यासाठी. नदी आणि इतर गोड्या पाण्याचे पाणवठे यांची तुलना आपण पृथ्वीवरील एकूण क्षेत्रफळाशी केली तर हे सारे गोड्या पाण्याचे अधिवास फक्त तुलनेने शेकडा १% एवढीच जगभरात जागा व्यापतात. जेथे जवळपास गोड्या पाण्यातील १८,००० मत्स्य प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत. आज जवळपास आपल्या आजूबाजूला नदीवर बांध बांधणे, बंधारे, धरणे आणि शेती साठी कालवे यांसाठी नदीचा प्रवाह सातत्याने अडवला जात आहे. मानवी समाज उन्नती साठी जलविद्युत निर्मित प्रकल्प, पाणवठे याची उपयुक्तता न टाळता येणासारखी आहे. त्याच बरोबर पूर स्थिती नियंत्रण करण्यासाठी विशिष्ठ ठिकाणी बंधारे बांधणे हे देखील योग्य आहे. परंतु हि सगळी विकास कामे करताना आपण नदीचं नदी पण किंवा तिची प्रवाहीतता देखील कायम ठेवली पाहिजे. 
  नदी, खाडी आणि समुद्र हि निव्वळ पाणी आहे अशी कोणती निर्जीव बाब नाही तर तो एक चॆतन्यदायी जीवन प्रवाह आहे. या सगळ्या अधिवासात आढळणाऱ्या मत्स्य प्रजाती देखील तितक्याच तीव्रतेने मानवी जीवनावर प्रत्यक्ष वा अप्रतक्ष्य रित्या परिणाम पोहचवणाऱ्या असतात. पावसाळ्यात आणि पावसापूर्वी नदीकिनारी आणि ओढे यामध्ये आढळणारे 'मळीचे मासे' आपल्या मधून बऱ्याच जणांनी चाखले असतील. सर्वसामान्य मंडळी मध्ये आपल्या चवीसाठी प्रसिद्ध असलेले ह्या मत्स्य प्रजाती देखील विशिष्ट हंगामांत होणाऱ्या मत्स्य स्थलांतराचं एक उदाहरण आहे. कोकण किनार पट्टीमध्ये पावसाळ्यामध्ये खाडी आणि किनारी येणाऱ्या 'वलग्निच्या शिंगाळ्या' हे देखील आपल्या येथील मत्स्य स्थलांतराचा एक उत्तम उदाहरण आहे. नदी वर उभी राहणारी धरणे आणि विकास कामे यामध्ये मत्स्य प्रजाती च्या स्थलांतर मार्गात अडथळे टाळण्याचे विभिन्न पर्यायी मार्ग आपल्या देशात निर्माण करण्यात आले आहेत तरी देखील या बद्दल आणखी संशोधन होण्याची नितांत गरज नक्कीच आहे.         


लेखन : -

प्रदिप नामदेव चोगले 

२१ मे २०२२

मोबाईल _ ९०२९१४५१७७

pradipnc93@gmail.com



संदर्भ : - 

१.  Deinet, S., Scott-Gatty, K., Rotton, H., Twardek, W. M., Marconi, V., McRae, L., ... & Berkhuysen, A. (2020). The living planet index (LPI) for migratory freshwater fish: Technical report.

२. Su, G., Logez, M., Xu, J., Tao, S., Villéger, S., & Brosse, S. (2021). Human impacts on global freshwater fish biodiversity. Science, 371(6531), 835-838.

३. da Silva Romão, F. A. (2018). Assessment and development of vertical slot fishways for Iberian cyprinids (Doctoral dissertation, INSTITUTO SUPERIOR TÉCNICO).

४. Status of fish migration and passes with special reference to India Manas IG. Das  &  M. A. Hassan. 2008. 


 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५