समुद्र संवर्धन लेख मालिका - २

 दर्याला आयलाय फुल 





  जर तुम्ही पावसाच्या सरी कोकण किनारी येणाच्या आधी म्हणजे साधारण एप्रिल-मे मध्ये किनारी भेट दिली तर निळ्या फुलांसारखे काही तरी किनारी तरंगताना पाहू शकता. जीवशास्त्रीय वैज्ञानिक भाषेत याला Porpita porpita (पोरपिटा पोरपिटा) असे नामाभिमान आहे. पाऊस लवकरच येणार आहे याचं एक संकेत म्हणून पूर्वापार कोकणातील मासेमारी (कोळी) बांधव याची खूणगाठ बांधून आहेत. साधारण गेल्या चार-पाच वर्षापासून आपले मासेमारी बांधव ज्या जेली फिश च्या वाढत्या संकटाने हैरान झाले आहेत त्या प्राण्याच्या गटात किंवा वैज्ञानिक भाषेत ज्यास संघ (Phylum) असे म्हणतात त्यात यांचा समावेश होतो. परंतु या मधील मूलभूत फरक म्हणजे जेली फिश हा एक अखंड जीव असतो तर 'समुद्र  फुल' (पोरपिटा याचे स्थानिक भाषेतील नाव )म्हणजे असंख्य प्राण्याची एक वसाहत असते जी वर फोटोमध्ये दखवलेल्या प्रमाणे मधल्या वर्तुळाकार पोकळ चकती ला जोडली गेलेली असते.  

   पारंपारिक मासेमारी करणारे बांधव आपल्या वडिलोपार्जित असलेल्या अनुभव आणि ज्ञान यांच्या जोरावर बऱ्याच अंशी आज देखील आपले अंदाज बांधत मच्छिमारी करत आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान, वाहण्याची दिशा, पाण्याची गढुळता, पाण्यात तरंगणारे सागरी वनस्पती आणि प्राणी यांचा सबंध स्थानिक मच्छिमार मत्स्य साठ्याची उपलब्धता याबरोबर लावत असतात. साधारण २०००-२०१५ पर्यंत माझ्या व्यक्तिगत आणि मुरुड-अलिबाग किनारी भागातील सागरी मासेमारी करणाऱ्या इतर मच्छिमार बांधवांचा या समुद्र फुलाच्या आगमनाबरोबर पाऊस लवकर येईल याचा अंदाज बरोबर येत होता. परंतु मागील दहा वर्षांपासून हा अंदाज काहीसा चुकत आहे. या मागे बरीच कारणे असतील परंतु 'जागतिक हवामान बदल' या संकल्पनेशी याचा नक्कीच कुठे तरी सबंध आहे.      

  वर्ष २०१० मध्ये गुजरात वेरावल, २०१२ मध्ये रत्नागिरी-राजापूर मध्ये आणि २०१९ मध्ये ओडिसा किनारी भागात या प्राण्याची नोंद वैज्ञानिक मंडळीने नोंदवली आहे. किनाऱ्याच्या दिशेने येणारे मान्सून काळातील वेगवान वारे या जीवना किनारी लोटत असतात असाच या शोधनिबंधाचा निष्कर्ष आहे. २०१६ मध्ये पी. उमामागेशवरी आणि इतर संशोधक गटांनी 'समुद्र फुल' वर काही प्रयोग केले ज्या मध्ये असे निरीक्षण नोंदवले गेले कि या मध्ये बुरुशीजन्य आणि जिवाणूजन्य घटकांचा नाश करणारे काही घटक आढळून येतात ज्याचा वापर आपण येत्या काळात नक्कीच करू शकतो. 

 प्रत्येक किनारी भाग हा वेगवेगळ्या खास अश्या भॊगोलिक ठिकाणी आहे त्यामुळे हे जीव दिसण्याचा कालावधी देखील विशिष्ठ जागे प्रमाणे वेगवेगळा असू शकतो. आपणस हा जीव आपल्या सागर किनारी कधी दिसला आणि किती प्रमाणात दिसला याची नोंद जर आपण नोंदवली किंवा हि माहित माझ्या पर्यंत पोहचवली तर नक्कीच आपण समुद्र आणि त्यातील असे सुंदर जीव आणखी सखोलतेने समजू शकतो. जर हा जीव आपणांस दिसला तर शक्य असेल तर नक्कीच आपण याचा फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता परंतु याला हात लावणे टाळा. याला हात लावल्यास आपल्याला त्वचेवर खाज किंवा पुरळ येऊ शकते तसेच हा जीव देखील चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला तर दुखावला जाऊ शकतो. 

लेखन

- प्रदिप नामदेव चोगले 

मुरुड, महाराष्ट्र

एप्रिल २०२२ 

pradipnc93@gmail.com

mob_ 9029145177



टिप : - आपणांस हा लेख आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र मंडळी मध्ये शेअर करायला विसरू नका. आपली प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्कीच नोंदवा    


   


  


 

    


संदर्भ : - 


  •  Sahu B K, Baliarsingh S K et al. (2020). Mass beach stranding of blue button jellies (Porpita porpita, Linnaeus, 1758) along Odisha coast during summer season. Indian J Mar Sci., Vol. 49 (06), pp. 1093-1096. 
  • Apte D, Bhave V, et al. (2012). A preliminary report on diversity of coastal ecosystems of Maharashtra, part 3: ecologically sensitive coastal areas of Ratnagiri, Rajapur, and Vijaydurga. Mumbai J. Bombay Nat. Hist. Soc., 173 pp.
  • CMFRI. (July-September 2010). Unusual occurrence of Porpita porpita in Aadri beach, Gujrat. CMFRI Neswletter 126, 1-23.
  • Shah, N. S. Y. (2021). Mass Beach Stranding of Blue Button Jellyfishes, Porpita porpita (Linnaeus 1758) from the Coast of Mandvi, Kutch, India during August, 2021. Journal of Marine Science| Volume, 3(04).
  • Umamageswari, P., Dineshkumar, R., Jayasingam, P., & Sampathkumar, P. (2016). Antimicrobial activities of jellyfish, Porpita porpita from Southeast Coast of India. Pharm. Biotechnol. Microbiol, 2016, 1-4.


            







      Comments

      1. खूपच छान माहिती🙏

        ReplyDelete
        Replies
        1. धन्यवाद ताई, तुझी सकारात्मक प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.

          Delete

      Post a Comment

      Popular posts from this blog

      निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५