भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग २

 लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन 

(Delphinus capensis)





जगभरात डेल्फीनीडे वा सोप्या शब्दात बोलायचं तर डॉल्फिन या कुळात (Family) ३७ प्रजाती असल्याची सागरी अभ्यासक मंडळी ने नोंद केली आहे. यातील १५ डॉल्फिन प्रजाती आपल्या भारतीय सागरी क्षेत्रात विचरण करतात असा आतापर्यंत च्या सागरी निरीक्षण दरम्यान आपणांस दिसून आलं आहे. या लेख मालिकेच्या माध्यमातून आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करू. 

  आज आपण ज्या डॉल्फिन प्रजाती ला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच नाव आहे लॉन्ग-बिक कॉमन डॉल्फिन यांस आपण ‘लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन’ असं संबोधू. याचं शास्त्रीय नाव Delphinus capensis असं आहे. या डॉल्फिन प्राजतीचं वजन साधारण ७२-२२६ किलो, लांबी ६-८.५ फुट तर सरासरी ४० वर्ष इतकं त्याच आयुर्मान असतं. शरीराच्या लांबी बद्दल एक महत्वाची विशेष बाब म्हणजे या प्रजातीतील नर डॉल्फिन हे मादी डॉल्फिन च्या तुलनेने निदान ५% लांब असतात. इतर डॉल्फिन प्रजाती सोबत जर आपण या प्राजाती ची तुलना करता यांची चोच थोडी लांब असते ज्यात ४७-६७ छोटे परंतु टोकदार दात प्रत्येकी वरच्या आणि खालच्या जबड्यात असतात. 

  समुद्रात जर आपण कधी मासेमारी वा इतर कारणामुळे असाल तर हे डॉल्फिन त्याच्या खास अश्या रंग संगती आणि डोक्याची रचना यांमुळे आपण सहजतेने ओळखू शकतो. फिक्कट पिवळ्या रंगाची एक पट्टी जणू त्याच्या डोळ्यापासून ते वर असलेल्या मोठ्या पर/पंख पर्यन्त मधल्या भागात दिसून येते, हीच फिक्कट पिवळी पट्टी शरीराच्या मधल्या भागापासून पुढे थोडी गडद रंगाची होत शेपटी पर्यन्त जाते. त्याच बरोबर एक गडद काळया रंगाची पट्टी जणू त्याच्या डोळ्याकडून समोर घातली आहे अशी रंग छटा आपणांस दिसून येते. वेगवेगळ्या सागरी प्रदेशानुरूप या रंग संगती मध्ये काही तफावत जाणवते. एवढ नक्की की आपण जर प्रदीर्घ काळ जर सागरी सस्तन प्राण्यांच निरीक्षण करू लागलात तर हा फरक लगेच दिसून येईल. 

  हि डॉल्फिन प्रजाती बहुधा मोठ्या समूहामध्ये (१००-३००) विचरण करताना दिसून येते. कधी कधी मात्र या पेक्षा कमी डॉल्फिन आपणांस दिसू शकतात. मांदेली, तारली, माकुल इत्यादि मत्स्य प्रजाती यांचा समावेश त्याच्या खाद्या मध्ये होतो. त्यामुळे जेथे या मत्स्य प्रजाती मुबलकतेने आढळून येतात तेथे लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन दिसण्याची आधिक शक्यता आहे. त्याच बरोबर समुद्र किनाऱ्यापासून साधारण ५०-१०० सागरी मैल इतक्या अंतरापर्यंत ह्या प्रजाती विचरण करत असतात. बहुधा उथळ समुद्र किनारे आणि तेथे असलेली अन्नाची मुबलकता हा त्याचा आवडता आधिवास आहे. आपल्या सर्वसाधारण ४० वर्षाच्या जीवनात या डॉल्फिन प्रजाती वयाच्या १० वर्षांतर पिल्लं जन्माला घालतात. साधारण १०-११ महीने डॉल्फिन ची पिल्ले आपल्या आईच्या पोटात वढतात आणि मग बाहेर येतात. सुरवातीला त्याची लांबी २.५-३ फुट इतकीच असते जि वाढून  जवळपास ६.५ फुट इतकी होते. तरती वावरी ची जाळी, किनारी धरण पद्धतीने उभे केलेली जाळी व पर्स-साईन आणि ट्रालिंग पद्धतीची मासेमारी या प्रकारात या डॉल्फिन प्रजाती अडकून जखमी वा मृत होतात. त्याच बरोबर समुद्रात जेव्हा हानिकारक शेवाळ मोठ्या प्रमानात असते त्य वेळी देखील या प्रजाती ला धोका असतो.    

  या सुंदर अश्या डॉल्फिन प्रजाती आपल्या मासेमारी करताना जाळ्यात अडकू नयेत असे जर आपणास वाटत असेल तर काही सोप्या गोष्टी खालील प्रमाणे  आपण करू शकतो. 

१.डॉल्फिन पाण्यात पोहताना दिसत असतील तर जाणीवपूर्वक रीत्या आपली मासेमारी बोट त्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे. जमलं तर आपलं वेग कमी करणे साधारण ≤६ सागरी मैल प्रती तास या पेक्षा तो अधिक नसावा. 

२.डॉल्फिन समुद्रात दिसत असतील तर त्यांना काही खाऊ घालू नका. 

३.डॉल्फिन जर मासेमारी जाळ्यात अडकले असेल तर त्याची योग्य काळजी घेऊन सुटका करणे किंवा सबंधित आधिकारी वर्गाला या सबंधी माहिती देणे 

४.जर कोणी डॉल्फिन आणि इतर सागरी सस्तन प्राणी यांना त्रास देत असेल तर ती बाब निदर्शनात आणून देणे. 

५.भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२, अंतर्गत ह्या प्रजाती ला कोणत्या ही स्वरूपात त्रास देणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याचबरोबर सागरी सस्तन प्राणी संरक्षण कायदा (MMPA act,USA) अंतर्गत या प्रजाती ला संरक्षण देण्यात आलं आहे. 

एक मासेमारी बांधव म्हणून त्याचबरोबर समुद्र संवर्धन करणाऱ्या भूमिकेतून आपण नक्की या प्रजाती ला समजून घेऊन तिच रक्षण केलं पाहिजे. सागरी अधिवासत अन्न साखळी मध्ये या प्रजाती महत्वपूर्ण भूमिका बजावतात ज्यामुले त्याच्या अधिवास आणि संख्ये मध्ये जर काही नकारात्मक बदल झाला तर त्याचे दूरगामी परिणाम मासेमारी, समुद्र पर्यटन आणि सपूर्ण मानवी जीवनावर कमी अधिक प्रमाणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दिसून येऊ शकतात. 

  जास्तीत जास्त लोकापर्यंत विशेषता सागरी मासेमारी समाज आणि किनारपट्टी क्षेत्रात राहणारे नागरीक व लहान बालक यांपर्यंत आपण हे पोहचवण्याचा प्रयत्न करू. आपणास हा लेख कसा वाटला हे आपली प्रतिक्रिया देऊन व्यक्त करा. अपांसास जर असे डॉल्फिन समुद्र किनारी वा समुद्रात जिवंत/मृत अवस्थेत दिसले तर त्या सबंधी अधिक माहिती आपण मला माझ्या मोबाईल (9029145177)  वा ई-मेल(pradipnc93@gmail.com) च्या माध्यमातून कळवा. समुद्र संवर्धन ही एक सामाजिक भूमिका आहे त्यामुळे आपल योगदान यात मोलाची मदत करू शकते. स्थानिक वन अधिकारी आणि सागरी पोलिस यांना काही बेकायदेशीर घडत असेल तर लगेच कळवा ही विनंती. 

टीप: - सदर लेख मालिका मी माझी समुद्र आणि मासेमारी प्रती असलेली कृतज्ञता भावना म्हणून व्यक्त करत आहे आणि लिहीत आहे.     

-लेखन

प्रदिप नामदेव चोगले 

२९/०९/२०२२  


संदर्भ: - 
•छायाचित्र लांब-चोचीच सामान्य डॉल्फिन (https://www.fisheries.noaa.gov/species/long-beaked-common-dolphin#:~:text=Long%2Dbeaked%20common%20dolphins%20can,and%20on%20the%20continental%20shelf.)

•Ratheesh Kumar, R., Rahul, R., Kuberan, G., Chogale, P. N., & Vivekanandan, E. (2022). Taxonomy of Marine Mammals.

•Ramesh, M. K. (1999). The Wildlife Protection Act, 1972 of India: An Agenda for Reform. Asia Pac. J. Envtl. L., 4, 271.

•Roman, J., Altman, I., Dunphy‐Daly, M. M., Campbell, C., Jasny, M., & Read, A. J. (2013). The Marine Mammal Protection Act at 40: status, recovery, and future of US marine mammals. Annals of the New York Academy of Sciences, 1286(1), 29-49.

Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५