समुद्र संवर्धन लेख मालिका - ४

 समृद्ध कोकण आणि धगधगता विकास




  कधी-कधी काही गोष्टी आपण ज्या अनुभवतो त्या बाबत जर सजगतेने विचार केला तर नक्कीच आपल्या मधील बहुतेकांना आपण फार नशीबवान आहोत याची प्रचिती नक्कीच येईल. फेब्रुवारी २०२३ चा महिना हा माझ्यासाठी याच प्रमाणे अगदी भरभरून अनुभवाचं गाठोडं देऊन गेला. जवळपास ८५०-१००० किमी इतकं अंतर, २३ दिवस आणि शेकडो माणसाच्या गाठी-भेटी, प्रदीर्घ चर्चा, कोकणचा समृद्ध समुद्र किनारा आणि रीती-भाती सोबतीला मनपसंत चवदार जेवण यांनी या संशोधन सफरीची मज्जा गडद केली. इतक्या सुंदर आठवणींना मात्र कधी-कधी  किनार लाभली भेसूर सत्याची. कोकण सुंदर आहे परंतु म्हणूनच आज ते विकास प्रकल्पाच्या आणि चुकीच्या पर्यटन धोरणांचा बळी ठरत आहे. अजून तरी आपण पुष्कळ काही करू शकतो या निसर्ग समृद्ध कोकणातील संस्कृती आणि जैवविविधता टिकवण्यासाठी. पण आज करण्याची गोष्ट उद्यावर टाकली तर मात्र हे चित्र बदलून जाईल. मग मात्र आपल्या दिसतील या कोकणात सर्वत्र  समुद्र किनारी साचलेला कचरा आणि पर्यटनाच्या नावाखाली जगोजागी उभे होत जाणारी हॉटेल व्यवस्था, मोठं मोठी तेलशुद्धी  प्रकल्प आणि अजस्त्र पोर्ट सोबतीला ज्याचं गावपण संपल असेल अशी वेडीवाकडी वस्ती. 
  उत्तम रस्ते, जागतिक दर्जाची शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था, गावापासून जवळ रोजगाराची साधने आणि निसर्ग पूरक कोकणी जीवनशैली असलेला विकास आज मला आणि माझ्या सारख्या इतर कोकण ज्याचं हृदय आहे अश्या माणसांना हवा हवासा वाटतो. पण विकास कामांची हि तडजोड जर आपली निसर्गासोबतची नाळ तोडून होत असेल तर बहुधा तो विकास  मला काहीसा नकोसा वाटतो वा जबरदस्ती लादलेला जाणवतो. 

  मुबंई पासून लांज्या पर्यंत मी अतिशय रंजक प्रवास केला. या दरम्यान दिवेआगर, भरतखोल, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, बाणकोट, वेळास, केळशी, उंटबर, आडे, पाडले, आंजर्ले, मुर्डी, पाज-पंढरी, हर्णे, साळदुरे, कर्डे, लाढघर, बुरोंडी, चण्डिकानगर, कोलथरे, दाभोळ, धोपावे, नावाबन्दर, वेलदुर, अंजनवेल, गुहागर, असगोळी, तवसाल, जयगड, उंडी, मालगुंड, गणपतीपुळे, आरे-वारे, रत्नागिरी, भाटे, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, कशेळी, देवघळी, आंबोलगड, मुसाकाझी, साखरी-नाटे, जैतापूर, राजापूर, लांजा, दापोली अश्या जवळपास पन्नास गावांना भेटी दिल्या. 

  कधी तरी कुठे  हि सहज धावती भेट दिली तर काही ठिकाण मात्र अर्जवून पूर्ण योजनेनिशी भेटी दिल्या. यातील जवळपास ३१ समुद्र किनारी वसलेली गावे ही पूर्णता किंवा थोड्या बहुत प्रमाणात समुद्री कासवे विशेषता ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची अंडी वा घरटी देण्याची ठिकाणे आहेत. सुंदर अशी वाळूची किनारे, वाळूचा पोत, वाळूच्या कणांची रचना आणि आकार, किनाऱ्याची रचना आणि जाडी, भरती-ओहोटी च्या सीमारेषा आणि नैसर्गिक प्रेरणा या आणि इतर बऱ्याच संवेदनशील बाबी  जर अनुकूल असतील तरच समुद्री कासवे अश्या सागर किनारी अंडी द्यायला किंवा घरटी करायला येत असतात. जवळपास ३० हुन  अधिक अशी किनारे जर आपल्या जवळपास असतील तर आपण अंदाज लावू शकतो की आपली किनारी वसलेली गावे किती समृद्ध निसर्गाची प्रतिके आहेत. हा आकडा पुष्कळ कमी आहे कारण यात अजून कोकणातील बऱ्याच किनाऱ्याचा समावेश नाही करण्यात आला आहे. 

  वर ज्या गावाचा उल्लेख केला गेला आहे त्या सर्वच गाव-खेड्यात मासे हे एक अन्नातील प्रमुख घटक आहे. सर्वच ठिकाणी मासेमारी ही विविध प्रकारे होत असते तरी यातील १८ अशी सागर किनारी वसलेली गावे आहेत जी जवळपास पूर्णवेळ मासेमारीवर आपलं उदरनिर्वाह चालवतात. समुद्रात विचरण करणारे असंख्य सागरी जीव ज्यात मासे आणि इतर सजीवांचा समावेश होतो पण विशेषता यातील संपूर्ण किनार पट्टीवर आपणांस बहुधा अजस्त्र समुद्री सस्तन प्राणी जसे की डॉल्फिन आणि देवमासे यांचे दर्शन देखील होते. समुद्री पाण्यातील उपलब्ध पोषण तत्वे, सागरी वनस्पती, समुद्री प्रवाळ, समुद्री प्लवक जीव आणि पाण्याची खोली आणि इतर अनेक गोष्टी जर माफक प्रमाणात असतील तरच असे सागरी सस्तन प्राणी बहुधा अश्या सागरी अधिवासात विचरण करतात. आजकाल कोकणच्या सर्वदूर हॉटेल व्यवसाय क्षेत्रात सगळे जण डॉल्फिन सहल समाविष्ट करतात त्या वरून आपणांस अंदाज येईल की ही सागरी अधिवास क्षेत्रे किती सुपीक आणि संपन्न आहेत यांची. 

  या सगळ्या सुंदर, झक्कास आणि संपन्न गोष्टी बरोबर काही गोष्टी मात्र माझ्या सजग आणि संवेदनशील मनाला फार व्यथित करून जातात. साखरे-नाटे मध्ये असलेला 'शहीद तबरेज सायेकर चॊक' म्हणजे कोकण ची समृद्ध सागरी मासेमारी आणि पारंपरिक जीवनशैली ला प्रस्थापित विकास प्रकल्प यांनी दिलेली टक्कर वाटते. त्याच बरोबर मागच्या महिन्यात घडलेली पत्रकार 'शशिकांत वारसे आणि बारसु प्रकल्प' या बाबतची बातमी म्हणजे निसर्ग राखण्याची जबर किंमत काय असू शकते याची एक झलक वाटते. 

  समुद्र ज्याला आवडतो असा मी एक समुद्रावर प्रेम करणारा विदयार्थी आहे. ज्या समुद्रशास्त्र विषयात मी काही औपचारिक शिक्षण घेतलं त्या आधारे मी या समुद्र आणि त्यासोबत इतर संलग्न बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच मला असं वाटत की आपण जितक्या स्पष्टपणे निसर्ग समजून घेऊ आणि इतरांना त्या बद्दल सांगू तितका निसर्ग ठेवा आपण पुढच्या पिढीला देऊन जाऊ. या लेखाच्या शेवटी मी समर्थ रामदास स्वामीचं एक वचन सांगू इच्छितो ज्यांनी आपण ही विचार धारा पुढे नेऊ शकतो वा आपणांस तशी प्रेरणा नक्की मिळेल. 

   आपणासी जे जे ठावे, ते ते दुसऱ्यासी सांगावे ।      
    शहाणे करून सोडावे । सकळ जन । ।



-लेखन

 प्रदिप नामदेव चोगले

   मुंबई / दिनांक ९ मार्च २०२३/ १२.३५ 


टीप- सदर लेख जर आपणांस आवडला तर नक्कीच आपली प्रतिक्रिया   कमेंट स्वरूपात खाली देऊ शकता. 



   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५