भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ६
अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल : संकटातील एक अद्भुत प्रजाती भाग २
आता या लेखांमध्ये आपण अरबी समुद्री हम्पबॅक व्हेल्सचा भारतीय सागरी क्षेत्रात होत असलेल्या संशोधन कार्याचा मागोवा घेऊ या.
पॉमिला सी आणि इतर संशोधक मंडळी यांच्या 2014 मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, अरबी समुद्रात हम्पबॅक व्हेल्सचा एक अत्यंत विशेष गट आढळला आहे - हे व्हेल्स इतर प्रवासी व्हेल्सप्रमाणे स्थलांतर करत नाहीत तर याच समुद्रात सुमारे ७०,००० वर्षे त्या अडकून पडल्या आहेत. (Pomilla et al., 2014) या व्हेल्सच्या जनुकीय अभ्यासावरून असे लक्षात आले आहे की, त्यांचे मूळ दक्षिण हिंदी महासागरातील असावे, पण ते अरबी समुद्रात अडकून त्याचे एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण समूह तयार झाले आहे. त्यांच्या जनुकांमध्ये अत्यंत कमी विविधता आढळली आहे, जी त्यांच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकते. याशिवाय, त्यांच्या डीएनएमध्ये प्राचीन आणि अलीकडील काळातील लोकसंख्येच्या घटनेची खुणाही सापडली आहे.
पॅसिव अकौस्टिक मॉनिटरिंग (PAM) ही एक अंडरवॉटर 'स्पाय नेटवर्क' सारखी आहे, जी जलचर जीवांच्या नैसर्गिक आवाजांचा अभ्यास करण्यासाठी हायड्रोफोन्स नावाचे विशेष वॉटरप्रूफ मायक्रोफोन्स वापरते. संशोधक मंडळी ही उपकरणे नेत्राणी बेट (कर्नाटक) आणि गोवा यासारख्या प्रमुख ठिकाणी बोटीतून किंवा समुद्रतळी बसवतात, जेथे अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेलचा वावर असते. बॅटरी किंवा सोलरपॅनल द्वारे चालणारी ही हायड्रोफोन्स 24/7 रेकॉर्डिंग करतात - व्हेल्सचे गाणे (150-540 Hz, कमी स्वरातील संगीतासारखे), जहाजांचा आवाज, मासे क्लिक करण्याचा आवाज आणि समुद्राच्या पृष्ठभागावर पाऊस पडण्याचा आवाजसुद्धा कॅप्चर/रेकॉर्ड करतात. आठवडे किंवा महिन्यांनंतर ही उपकरणे परत पाण्यातून बाहेर काढली जातात, आणि हजारो तासांच्या ऑडिओचे विश्लेषण केले जाते: संगणक प्रोग्राम प्रथम जहाजांचा आवाज वेगळा करतात, नंतर व्हेल्सचे आवाज रंगीत स्पेक्ट्रोग्राममध्ये (आवाजाचे आलेख) रूपांतरित करतात. संशोधक कान आणि डोळ्यांनी हे आवाज तपासतात, आणि अरबी समुद्रातील व्हेल्सच्या गाण्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण "फ्रेजेस" आणि "थीम्स" ओळखतात. ही नॉन-इन्वेसिव्ह म्हणजे या संरक्षित प्रजाती ला हात न लावता संशोधन करण्याची रीत, फायदेशीर पद्धत अनेक आश्चर्ये उजेडात आणली आहे. जसे की ओमन आणि भारतातील व्हेल्सचे गाणे जुळत असल्याचे सिद्ध करणे, जे आंतरराष्ट्रीय प्रवास सिद्ध करते. तसेच, वर्तनाविषयी माहिती मिळते (जास्त गाणे म्हणजे प्रजनन काळ; कमी आवाज धोक्याची इशारा देते). मजेदार माहिती? हंपबॅक व्हेल्सचे गाणे 30 किमी अंतरापर्यंत पाण्यात ऐकू येते, नर दरवर्षी नवीन "गाण्याचे ट्रेंड" कॉपी करतात, आणि अरबी समुद्रातील व्हेल्स पॅसिफिक व्हेल्सपेक्षा सोपी गाणी गातात.
डॉ. श्याम कुमार मधुसूदन आणि इतर संशोधन सहकारी यांनी 2019 मध्ये प्रकाशित केलेल्या शोधनिबंध अनुसार अरबी समुद्रातील भारतीय किनाऱ्याजवळ, हंपबॅक व्हेल्सचे मंत्रमुग्ध करणारे गाणे ऐकण्यात किंबहुना रेकॉर्ड करण्यात आले आहे. ही व्हेल (Megaptera novaeangliae) जगभरात प्रसिद्ध असली तरी, उत्तर हिंदी महासागरातील त्यांच्या वागणुकीविषयी फारच कमी माहिती उपलब्ध आहे. संशोधकांनी 'पॅसिव अकौस्टिक मॉनिटरिंग' (PAM) तंत्राचा वापर करून गोव्याच्या किनाऱ्याजवळ या व्हेल्सच्या गाण्याची नोंद घेतली आहे. फक्त नर हंपबॅक व्हेल्स गाणे म्हणतात असे संशोधनातून (Darling, 1983; Glockner & Venus, 1983) समजले आहे. हे गाणे सहसा प्रजनन काळात जोडीदार आकर्षित करण्यासाठी वापरले जाते. प्रत्येक प्रदेशातील नर एकसारखेच गाणे म्हणतात, पण हे गाणे प्रत्येक हंगामात बदलत जाते (Payne et al., 1983). इतर हंपबॅक व्हेल्स प्रवासी असतात, पण अरबी समुद्रातील व्हेल्स इथेच राहतात (Mikhalev, 1997). या अभ्यासात ५४२४ आवाज युनिट्सचे विश्लेषण करून ९ वेगवेगळ्या प्रकारचे गाण्याचे नमुने ओळखले गेले. या व्हेल्सच्या गाण्याचा आवाज (moans, squeals, rumbles) इतर समुद्रांतील व्हेल्सपेक्षा वेगळा आहे. पण जहाजांचा आवाज, मासेमारीचे जाळे आणि प्रदूषण यामुळे हे अद्वितीय जीव धोक्यात आहेत.
माया एल. डिसूझा आणि त्याचे संशोधक सहकारी टीम यांनी 2023 मध्ये या व्हेल बद्दल अभूतपूर्व शोध निबंध प्रकाशित केला. त्या अनुसार 'संकटग्रस्त' घोषित केलेल्या अरबी समुद्रातील हंपबॅक व्हेल्स (Megaptera novaeangliae) भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ऑक्टोबर ते मार्च दरम्यान दिसतात. या आश्चर्यकारक सागरी प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी 2019 मध्ये पॅसिव अकौस्टिक मॉनिटरिंग (PAM) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. कर्नाटकच्या नेत्राणी बेटाजवळ झालेल्या संशोधनात नर व्हेल्सच्या 2,641 आवाज युनिट्सचे विश्लेषण करून त्यांच्या गाण्याचे रहस्य उलगडले गेले - ज्याची वारंवारता 150 ते 540 Hz आणि कालावधी 1.19 ते 5.5 सेकंद इतकी आढळली. हे गाणे केवळ मनोरंजनासाठी नसून वेगवेगळ्या व्हेल समूहांची ओळख करून देण्यासाठीही महत्त्वाचे आहे.
भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर हंपबॅक व्हेल्स (ASHW) च्या संशोधनात महत्त्वाची प्रगती होत आहे, असे 'अरबियन सी व्हेल नेटवर्क'च्या अलीकडील अहवालात (Minton et al., 2023) नमूद केले आहे. भारतातील संशोधक आणि वनविभाग यांच्या सहकार्याने महत्वाची संशोधन पावले उचलली जात आहे. विविध प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम यांची आयोजन. जसे की 2019 सप्टेंबर मध्ये गोवा वनविभाग आणि 'इंडिया मरीन मॅमल रिसर्च अँड कझर्व्हेशन नेटवर्क' यांनी रेंजर्स आणि वन कर्मचारी यांसाठी 'समुद्री जैवविविधता आणि संवर्धन' यावर प्रशिक्षण आयोजित केले. यात हंपबॅक व्हेल्स आणि समुद्री सस्तन प्राण्यांच्या स्ट्रँडिंग प्रतिसादावर भर होता. तसेच 2019 ऑक्टोबर मध्ये कर्नाटक वनविभागानेही तत्सम प्रशिक्षण आयोजित केले, ज्यामध्ये नेत्राणी बेटाजवळील व्हेल्सच्या आवाजाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. सोबतच ध्वनिमुद्रण आणि संशोधन देखील चालू आहे. नेत्राणी बेट, कर्नाटक येथे 2019 नोव्हेंबरमध्ये येथे 'साउंडट्रॅप' स्थापन करण्यात आले, ज्यामुळे हंपबॅक व्हेल्सचे गाणे रेकॉर्ड करण्यात यश मिळाले. हे ठिकाण डॉ. दिपानी सुतारिया आणि इतर संशोधक सहकारी यांच्या 2017, 2018 मधील अभ्यासानुसार व्हेल्सचे हे महत्त्वाचे ठिकाण आहे. कन्याकुमारी, तमिळनाडू मध्ये देखील 2020 मध्ये दुसरे साउंडट्रॅप ठेवण्याची योजना होती, कारण ओमानमध्ये चिन्हांकित केलेली एक मादी व्हेल (OM02-008) येथे आढळली होती. मात्र, COVID-19 मुळे हे काम सध्या स्थगित आहे. आणखी विशेष म्हणजे ओमानपासून भारतापर्यंतचा प्रवास करणाऱ्या व्हेल चा प्रवास सध्या उलगडला जात आहे. नेत्राणी बेटाजवळ दिसलेल्या एका व्हेलची ओळख ओमानच्या ASHW डेटाबेसमधील 'OM11-010' अशी झाली. ही व्हेल 2011 मध्ये ओमानमध्ये चिन्हांकित करण्यात आली होती आणि तिच्या शरीरावरील जखमांमुळे ती सहज ओळखली गेली. हे दर्शवते की अरबी समुद्र आणि भारतीय समुद्रातील व्हेल्स एकमेकांशी संबंधित असू शकतात.
सध्या भारतीय वन्यजीव संस्था, या बद्दल एक मोठा संशोधन प्रकल्प राबवत आहे. गेल्या वर्षी याच शोध कार्यादरम्यान संशोधक मंडळी यांना रायगड जिल्हयातील रेवदंडा समुद्री किनारी तसेच रत्नागिरी जिल्हयातील हर्णे-पाज समुद्र किनारी ही व्हेल विचरण करत असते अशी माहिती मसेमारी करणाऱ्या मंडळी सोबतच्या मुलाखती दरम्यान मिळाली आहे.
लेखन
प्रदिप नामदेव चोगले
मोबाईल: - 9029145177
pradipnc93@gamil.com
दि 27/04/2025
रेवदंडा , महाराष्ट्र
टीप: - आपली प्रतिक्रिया खाली कमेन्ट मध्ये नक्की नोंदवा. हा लेख आणि माझा प्रयत्न आवडल्यास आपण याची लिंक आपल्या मित्र-परिवार सोबत वितरित करा.
अधिक माहितीसाठी संदर्भ: -
• Pomilla, C., Amaral, A. R., Collins, T., Minton, G., Findlay, K., Leslie, M. S., ... & Rosenbaum, H. (2014). The world's most isolated and distinct whale population? Humpback whales of the Arabian Sea. PLoS One, 9(12), e114162.
• Madhusudhana, S. K., Chakraborty, B., & Latha, G. (2019). Humpback whale singing activity off the Goan coast in the Eastern Arabian Sea. Bioacoustics, 28(4), 329-344.
• Minton, G., Anderson, R. C., Baldwin, R., Bohadi, Y., Cerchio, S., Collins, T., ... & Willson, A. (2023). Progress report from the Arabian Sea Whale Network. IWC SC D, 68.
• D'Souza, M. L., Bopardikar, I., Sutaria, D., & Klinck, H. (2023). Arabian Sea Humpback Whale (Megaptera novaeangliae) Singing Activity off Netrani Island, India. Aquatic Mammals, 49(3), 223-235.
Comments
Post a Comment