समुद्र संवर्धन लेख मालिका - ५

मासेमारी आणि सागरी प्राणी :  सहसबंध कि संघर्ष  


  way of life (जीवनशैली), way of thinking (विचारशैली) and way of workship (उपासनाशैली) या त्रयीतुन  संस्कृती उभी राहते. यातील प्रत्येक पैलु हा त्या संस्कृती अनुरुप जीवन जगणाऱ्या मानवी समाजाला प्रभावित करत असतो. महाराष्ट्राच्या सागर किनारी राहणाऱ्या व मासेमारी करून आपली उपजीविका करणारा मच्छिमार समाज याला अपवाद नाही. म्हणूनच पालघर मधील वैती, मांगेला, मांची मच्छिमार  समाज; ठाणे-मुंबई-रायगड येथील कोळी, आगरी मच्छिमार समाज, रत्नागिरी-सिन्धुदुर्ग येथील कोळी, गाबीत मच्छिमार समाज याच्या संस्कृती मध्ये आपल्याला तुलनात्मक फरक दिसून येतो. या विचार धारेतील फरका अनुरूप ह्या मच्छिमार समाजातील मंडळी मासेमारी करताना त्यांच्या मासेमारी जाळ्यात काय अडकतय आणि समुद्रात कोणते जीव दिसतात या बाबत त्याच्या परस्पर नात्यात कधी संघर्ष दिसून येतो तर कधी सहजता. 

  संपूर्ण महाराष्ट्राचा सागर किनाररी जवळपास २५ मासेमारी क्षेत्र आणि प्रमुख १७३ मासे उतरवणी केंद्रे आहेत ज्या वर जवळपास ४५६ मच्छिमार समाजाची गावे आहेत ज्यात ८१००० पेक्षा अधिक मच्छिमार कुटूंब आपलं जीवन जगत आहेत. महाराष्ट्रा पुरतं बोलायचं तर आपल्या इकडे मासे म्हणून जे काही आहे अश्या ४१५ मत्स्य प्रजाती, २७ जातीच्या कोळंबी, ५४ जातीचे खेकडे, ४ जातीचे शेवंड आणि माकूळ व ज्या बद्दल आपल्याला माहित नसेल अश्या बऱ्याच जातीचे शँख, शिंपले आणि इतर सागरी जीव आहेत जे मासेमारी करताना जाणीवपूर्वक किंवा चुकून पकडले जातात. 

  आता मुद्दा आहे कि अशी मासेमारी करताना मच्छिमार बांधवांची सागरी जीवांबद्दल काय भूमिका आहे. वर उल्लेख केलेल्या बहुसंख्य मच्छिमार समाजातील मंडळी हि 'समुद्री कासव' जर कधी आपल्या जाळ्यात अडकलं तर बऱ्याच वेळा त्याला जाळ्यातून मुक्त करतात याच्या मागे कधीच संघर्ष नसतो तर तो असतो सहसंबध कारण यात हे कासव भगवान विष्णू चं रूप समजलं जात. बऱ्याच वेळा असं कासव जेव्हा जखमी अवस्थेत अडकत तेव्हा त्याला बोटीवर असलेल्या हळद किंवा चंदन लावून समुद्रात सोडलं जात. नारळ आणि अगरबत्ती वाहून त्याची सुटका केली जाते. रत्नागिरी मध्ये मला व्यक्तिगत रीत्या जेव्हा काही गाबीत समाजातील मंडळीची मुलाखत घेणायची संधी मिळाली तेव्हा हि मंडळी समुद्री कासव याना अपशकुन मानतात अशी माहिती मिळाली. म्हणूनच हि मंडळी कासव समुद्रात दिसले कि त्या पासून आपली बोट दूर करतात किंवा जर ते जाळ्यात अडकलं तर त्याला लगेच समुद्रात सोडून देतात. या मागे विचार असतो कि हे कासव सोबत असणे किंवा आपल्या मुले मृत होणे हे अशुभ आहे अशी धारणा. यात विशेष गोम म्हणजे ह्या मंडळी 'लेदर बॅक ' समुद्री कासव प्रजाती बद्दल विशेष अंतर राखून असतात. 

 गादा, गादा रेडा , मामा  म्हणून हि मच्छिमार मंडळी आपल्या सागरी क्षेत्रात राहणाऱ्या इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन बद्दल विशेष उत्सुक असतात. बऱ्याच वेळा हे डॉल्फिन मासेमारी करताना मासेमारी करणाऱ्या बोटी च्या अवती भवती विचरण करत असतात. कधी ते ट्रॉलर मधील मासे खातात तर कधी शोर साइन पद्धतीने मासे पकडण्याच्या जाळी ओढताना बाहेर पडणारे मासे हळूच मटकवतात. पण सुदैवाने महाराष्ट्रात आज देखत डॉल्फिनची शिकार मच्छिमार मंडळी ने केली अशी नोंद नाही आहे. हे मच्छिमार आणि डॉल्फिन यातील सहज सबंध दर्शवतात. दुर्देवाने कधी हे डॉल्फिन जाळ्यात अडकले तर हि मंडळी त्याची सुटका करण्याचा प्रयत्त्न आर्जवून करतात. आता वैज्ञानिक मंडळी देखील अश्या परिस्थितीत मच्छिमारांच नुकसान होऊ नये म्हणून अकाउस्टीक पिंजर, रंगीत जाळी किंवा टर्टल एक्सक्युडर डिवाइस वापरण्याचे मार्ग अवलंबत आहेत. भारतामध्ये सिटेशियन म्हणजेच डॉल्फिन आणि व्हेल यांचे मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकून मृत्युमुखी पडणे ही एक चिंताजनक बाब आहे. युसुफ आणि इतर संशोधक टीम याने २००९ प्रकशित केलेल्या  सर्वेक्षणाच्या कालावधीत, चेन्नई (तामिळनाडू) येथे १९, काकिनाडा (आंध्र प्रदेश) येथे ७ आणि मंगळुरू (कर्नाटका) येथे १८ सिटेशियन अनवधानाने जाळ्यांमध्ये अडकून मृत झाल्याची नोंद झाली आहे. याच शोध निबंध अनुसार भारतात संपूर्ण भारतात ९०००-१०००० सिटेशियन  गिल नेट मध्ये अडकून मृत पावत असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

  गुजरात मधील वलसाड येथील व्हेल चं मंदिर आहे जेथे व्हेल हे देव म्हणून पुजली जाते. त्याच बरोबर महारष्ट्रात देखील व्हेल वा सोप्या शब्दात 'देवमासा' मत्स्य अवतार म्हणुन पुजला जातो. मच्छिमार मंडळी जेव्हा कधी असं देवमासे समुद्रात दिसतात तेव्हा आवर्जून नारळ आणि अगरबत्ती दाखवून आपली समुद्रा बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. याच प्रेयस स्वरूप म्हणूच आपल्या कडे 'नारळी पौर्णिमा' उत्सव साजरा केला जातो. जो समुद्री जीव , मासेमारी आणि समुद या बद्दल कृतज्ञता याचं प्रतीक आहे. 

  जेव्हा मासेमारी केवळ नफा आणि उपभोग या तत्त्वांवर आधारित असते, तेव्हा जाळ्यांमध्ये अडकलेले दृश्य अत्यंत भयावह ठरते — विशेषतः समुद्री सस्तन प्राण्यांसाठी. सिटेशियन म्हणजेच डॉल्फिन आणि व्हेलसारख्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकून मृत्युमुखी पडतात, त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. जगभरात ट्यूनाच्या गिलनेट मासेमारीमुळे दरवर्षी सुमारे १ लाख सिटेशियन मृत्युमुखी पडतात, तर १९५० ते २०१८ या काळात एकूण ४.१ दशलक्ष सिटेशियन मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतामधून दरवर्षी १०,००० हून अधिक सिटेशियन मृत्युमुखी पडत असल्याचा अंदाज आहे. पूर्व उष्णकटिबंधीय पॅसिफिक भागातील पर्स सीन मासेमारीमुळे हजारो डॉल्फिन्स मारले गेले होते. ही समस्या हाताळण्यासाठी प्रजातींची असुरक्षितता ओळखून, माहिती संकलनात सुधारणा करणे आणि प्रतिबंधात्मक उपाय अंमलात आणणे अत्यावश्यक आहे.

  या उलट मासेमारी जेव्हा उपासना आणि पूजा भाव धरून केली जाते तेव्हा मासेमारी बोट हे देवाचं तरंगणार मंदिर ठरते.  टेम्पल्टन आणि  रॅमॉन मॅगसेसे पुरस्कार विजेते भारतीय तत्वज्ञानी पाडुरंग शास्त्री आठवले यांनी मच्छिमार समाजाला याच तत्वावर 'मत्स्यगन्धा' हा प्रयोग दिला आहे. ज्या माध्यमातून हि मच्छिमार मंडळी मासेमारी करताना मासेमारी, सागर पूजन आणि समुद्र संवर्धन हि त्रयी संतुलित केली जाते. 

मासेमारी समाजातील समुद्रा सोबतच असलेलं सकारत्मक नातं समजून घ्यायचं असेल तर या मंडळी काही सामाजिक पैलू समजून घ्यावे लागतील. यात रायगड जिल्हात काही भागात गौरी गणपती ला चिंबोरी/खेकडे याचं प्रसाद स्वरूप देवाला अर्पण करणं  हे विशेष आहे. त्याच बरोबर मुंबई लगत असलेल्या 'खान्देरी' बेटावर असलेलं वेताळ देवाचं मंदिर आणि तिकडे मच्छिमार मंडळी देवाला जाळ्यात कधी चुकून मृत अवस्थेत अडकलेलं सॉ फिश ची डोकं देवाला अर्पण करतात. 

  या लेखाच्या शेवटी नक्की असं सांगू शकतो कि भारतातील इतर राज्याशी तुलना करता महाराष्ट्रातील मच्छिमार, मासेमारी आणि सागरी जीव यातील संबध हा सहज किंवा सहकारत्मक संघर्षाचा आहे.  


लेखक

- प्रदिप नामदेव चोगले 

दिनांक ०१ जून २०२५ 

नागणवाडी (कोल्हापूर) 


 सन्दर्भ: - 

  • Lakra, W. S., Ramkumar, S., & Gopalakrishnan, A. (2021). Marine fisheries and biodiversity management in Maharashtra: Status, challenges and opportunities. Indian Journal of Animal Sciences, 91(2), 91-95.
  • Yousuf, K. S. S. M., Anoop, A. K., Anoop, B., Afsal, V. V., Vivekanandan, E., Kumarran, R. P., ... & Jayasankar, P. (2009). Observations on incidental catch of cetaceans in three landing centres along the Indian coast. Marine Biodiversity Records, 2, e64.
  • Sutaria, D. (2018). Baleen whale reports from the eastern Arabian Sea based on interview surveys and stranding reports–update from India. Paper SC/67b/CMP15 presented to the IWC Scientific Committee.
  • Lewison, R. L., Crowder, L. B., Read, A. J., & Freeman, S. A. (2004). Understanding impacts of fisheries bycatch on marine megafauna. Trends in ecology & evolution, 19(11), 598-604.
  • https://www.instagram.com/p/CTCM11sq18M/
  • Sanskriti Pujan (Marathi) Sat Vichar Darshan  (Publication)







 







 


 



      




Comments

Popular posts from this blog

कल्पक चित्रपट आणि संवर्धनाचे धडे