निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ३

 




निसर्ग निरीक्षण आणि कुतूहल

 माझ्या समस्त अक्षरज्ञान असलेल्या दोस्तानो

   खूप दिवस मनात एक गोष्ट घर करून होती जी मला व्यक्त करावीशी वाटत होती. ही गोष्ट आहे ‘निसर्ग निरीक्षण’ आणि ‘जिज्ञासा’ या बाबत. साधारण आज दहा दिवस झाले असतील मी कर्नाटकची सागरी सफर करून पुन्हा रोजच्या ठिकाणी ‘सागरी सस्तन प्राणी प्रयोगशाळा’ केंद्रीय सागरी मत्सकी संशोधन संस्था, केरळ येथे रुजू झालो आहे. पंधरा दिवस दर्या राज्याचे अथांग वैभव पाहून मी पुरता मंत्रमुग्ध झालो आहे. शाळा-महाविद्यालये आणि शेवटी मुंबई स्थित विज्ञान संशोधन संस्था येथील वास्तव्यात मी जे काही वाचलो, शिकलो आणि ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि जे या पंधरवड्यात पहिले ते एका बाजूला. वि. वा. शिरवाडकर लिखित ‘कोलंबस चे गर्वगीत’ ही कवीत सतत माझ्या मनात पिंगा घालत होती परंतु त्यात ही ‘नाविकाणा ना कुठली भीती’ ही ओळ खास.

  समुद्राच्या लाटांवर हिंदोले खात वर खाली होणारी आमची बोट सतत पोटात जे आहे नाही त्या सगळ्या बाबी समुद्र मंथानात जसे हलाहल विष बाहेर पडते तसे हालहाल करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या वेडीला हे ज्ञात होते की आज तिच्या वर स्वार असलेला हा कोळ्यांचा पुत्र आहे. मी देखील माझ्या पूर्वजांना स्मरून बोटीच्या नाळीवर स्थिर उभा होतो. एका खांद्यावर १००-४०० मिमी ची मोठीशी कॅमेरा लेन्स आणि दुसऱ्या बाजूला दुर्बिण या दोघीना संभाळत आपली नजर पाण्याच्या पृष्ठभागावर रोखून होतो. सकाळी २२ डिग्री पासून तापमान हळूहळू वाढत ३२-३४ डिग्री पर्यंत दुपारी पोहचत असे. काही झाले तरी ध्येय स्पष्ट होते नजरेत जे पडेल त्या समस्त सागरी पक्षी, समुद्री कासवे व विशेषता सागरी सस्तन प्राणी याची नोंद करणे. आपल्या स्वभाव विशेष सवई आणि लकबी यांना अनुसरून हे जीव दृष्टिगोचर होत होते. जवळपास अर्धशतक भरेल एवढे सागरी प्राणी पाहण्याचा हा योग उत्तम रित्या साधून आला. सोबतच या दुडुदुडू नाचणाऱ्या लाटांवर कित्येक समुद्री पक्षी, सगरी वनस्पति आणि उन्हाच्या प्रकाशात सप्तरंगी दिसणारी फ्लाइंग फिश ही विशेष निरीक्षणे होत.

  आता हे सगळ छान आणि गोड गोष्टी होत्या परंतु जे गोष्ट मनात सळून गेली ती आता विषद करतो. गेल्या पाच वर्षाहून अधिक काळ लोटला असेल या निसर्ग अभ्यासक म्हणून क्षेत्रात पण एक गोष्ट आहे ती म्हणजे आजकाल बहुसंख्य संशोधक मंडळी, मित्र आणि अभ्यासक यांना शोध निबंध लिहण्याची फार घाई असते. आता हे ही खरं आहे की या शोध निबंधांची संख्या आणि गुणात्मकता आपली वैज्ञानिक प्रतिभा विशद करत असते. पण प्रश्न असा आहे की या सगळ्या बाबीचा सगळ्यात उत्तम उपयोग काय? मी जे आता काही लिहीत आहे ते बहुधा तज्ञ मंडळीना रूचणार नाही पण माझी या बाबत एक वेगळी विचारधारा आहे. माणूस म्हणून जगताना आपल्या इंद्रिय, बुद्धी आणि मन यांना जो काही अनुभव मिळतो तो समृद्धतेने स्वीकार करणे आणि त्याचा आस्वाद इतरांपर्यंत पोहचवणे हेच खरं तर संशोधक मंडळी किंबहुना समस्त सुज्ञ मनुष्य प्राण्यांच कर्तव्य असले पाहिजे. शोध निबंध हे अत्यंत गहन अशी निसर्ग रहस्य आपल्या समोर प्रकट करत असतात परंतु त्याची भाषा ही सर्वसामान्य जनमानसात मात्र क्वचितच उतरत असते.

   आज आपल्या देशात एक फार मोठे संकट उभे राहिले आहे ते म्हणजे सुशिक्षित बेरोजगारी. या प्रश्नाच्या मुळाशी आपण जर गेलो तर एकच गोष्ट मला उमजते ती ही की चुकीच्या ध्येयाल अनुसरून शिक्षण घेणे. बहुसंख्य तरुण मंडळी आणि त्याच्या पालकांना वाटते की शिकलो वा उच्च डिग्री घेतली की नोकरी मिळते. परंतु खरं तर शिक्षण आपली अभिरुचि जागृत करत असते. ज्या विद्या शाखेत ज्ञाण अर्जित करांवस आवडते तेथे प्रवेश घेणे ते शिकणे परंतु जेव्हा खऱ्या अर्थाने उपयोजित शिक्षण क्षेत्रातून डिग्री घेऊन आपण बाहेर पडतो तेव्हा मात्र मिळवेळे ज्ञान वापरुन जीवन जगण्याची धारा समृद्ध करणे हे आपल ध्येय असायला हवे. शिकून जर आपल्यात उत्तम निरक्षण शक्ति निर्मित होत नसेल तर नक्कीच समजावे की काही तरी गडबड झाली आहे. निळाशार समुद्र, मऊ वाळू, सूर्यास्त आणि सूर्यउदय यावेळी असलेले रंगछटा, किलबिल करत गाणारे पक्षी, डोंगर माळरांनावर फुलेलं फुल, झाडाच्या अडोशातून येणारी उन्हाची तिरिप हे सगळं पाहुण जर आपल्या मनात कुतूहल जागृत होत असेल तर समजाव की आपण योग्य पद्धतीने शिक्षण घेतलं आहे. सोप्या शब्दात बोलायचं म्हटलं तर असं बोलू शकतो की आपण जे काही अनुभव गोळा करत असतो मग ते कसे का असो त्या प्रत्येक अनुभवाला उघड माथ्याने हसऱ्या चेहऱ्याने व तेजोमय डोळ्याने स्वीकारता आलं पाहिजे व त्यामधून मिळालेले ज्ञाण कण वाटता आले पाहिजे. व्यक्ति, वस्तु, जीव आणि जगदीश काही असो जर आपली सूक्ष्म निरीक्षण करण्याची तयारी असेल तर जिज्ञासा आपली कवाडे मोकळे करून आनंदाचा पेठारा आपल्यासाठी मोकळी करते.  

  शेवटी या लेखाचा समारोप करताना एवढेच संगेल की आपली निरीक्षण शक्ति आणि जिज्ञासा आपण राखून ठेवली तरच आपल्याला प्रत्येक क्षेत्रात सुसंधी दिसून येईल.

 

लेखन

-  एक सागरपुत्र

प्रदिप नामदेव चोगले

मोबाईल – ९०२९१४५१७७

pradipnc93@gmail.com

 

 

 

टीप: - समुद्री सफर करत असताना निसर्ग जसा माझ्याशी बोलला त्यातून जे मला उमजले ते मी आपल्या समोर मंडण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास आपली प्रतिक्रिया खाली कमेन्ट मध्ये नोंदवा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५