निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५
वादळ वाऱ्य सुटलं गं – बॉटम ट्राल व सागरी अधिवास
कोचीन बंदरापासून काल संध्याकाळी बाहेर आलो होतो. साधारण सायंकाळी ५ वाजता बोट आम्ही किनाऱ्यावरून बाहेर काढली. मोठे जहाज
आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या मार्गिकेतून फिशरी सर्व्ह ऑफ इंडिया ची बोट ‘मत्स्य वर्षणी’
जीच्यावर आम्ही स्वार होतो ती सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आम्ही नांगर टाकून
स्थिर केली. साधारण केरळ राज्याची सीमा संपून कर्नाटक सुरू होतो आश्या किनारा लगत
असलेल्या ठिकाणाहून आम्हाला खोल समुद्रात २१२ सागरी मैल एवढं अंतर कापायच होतं.
सध्या बोट जिथे स्थिर उभी होती तिकडून उत्तर दिशेला १३०-१५० सागरी मैल एवढं अंतर
तत्पूर्वी किनार्यालगत पार करण अनिर्वाय होतं. मान्सून पाऊस आणि वारा आम्हाला
चांगलाच झोडपून काढत होता. १२ सागरी मैल प्रती तास वेगाने प्रवास करणारी आमची बोट
या वादळ वाऱ्यात हेलकावे खात ३-४ वा ६-७ एवढंच वेग गाठू शकत होती. ती तरी काय करेल
बापडी भारत सरकार च्या फिशरी सर्व्ह विभागात ४० वर्ष सेवा बाजावून ती अगदी थकून
गेली होती. एवढं मात्र खरं की वार्षिक पर्यवेक्षण आणि देखफाल सातत्याने होत
असल्यामुळे ती अगदी अनुभवाचे ऊन पाऊस पाहिलेल्या व्यक्ति सारखी चिवट आणि झुंजार
पद्धतीने परिस्थिति हाताळत होती.
वर्ष १९७९ मध्ये या बोटीची उभारणी ला सुरवात
झाली तिथपासून आजतागत तिने अनंत आव्हाने झेलली आणि यशस्वी पद्धतीने पार पाडली.
३६.५० मीटर लांब व ८.२ मीटर रुंद एवढा तिचा पसार आहे. सध्या बोटीवर २०-२१ मंडळी
आमच्या सह कार्यरत आहे. बॉटम ट्राल पद्धतीने यांत्रिक मासेमारी करणारी सगळी
यंत्रणा येथे अतिशय व्यवस्थित रीत्या कार्यरत आहे. मत्स्य संवर्धन आणि चिरंतन
मासेमारी या बाबत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अश्या पद्धतीने मासेमारी करणे
म्हणजे जंगलात जसे ससे आणि वाघ-सिंह एकाच वेळी पकडण्याचा प्रयत्न करणे असा होतो.
अश्या प्रयत्नात कित्येक अज्ञात आणि गरज नसलेले जीव आणि वनस्पति जाळ्यात पकडली
जाते. अवजड अश्या लोखंडी फळ्या समुद्र च्या पृष्ठभागावर आदळत आपटत मोठी मोठी जाळी
जे रस्त्यात येईल त्या सगळ्या सजीव-निर्जीव गोष्टीणा आपल्यात ओढून घेत पुढे सरकत
असते. कल्पना शक्ति चे अद्भुत सामर्थ्य निसर्गाने आपल्याला प्रदान केलं आहे.
जेव्हा मी आज तागत घेतलेलं शिक्षण स्मरणात आणतो आणि माझ्या नजरेआड ३०-४० मीटर खोल
समुद्रात काय चालू असेल याची कल्पना करतो तेव्हा मनाला टोचणी लागते. काही किलो वा
टन मिळणारे मासे आणि त्यातून होणारा आर्थिक फायदा लक्षात घेतला तर नुकसानचं अधिक
आहे यात. ‘Shifting of base
line’ ही संकल्पना मांडणारे प्रसिद्ध
जागतिक ख्यातीचे मात्यसकी शास्त्रज्ञ डॉ. डॅनियल पॉली यांच्या नुसार विचार केला तर
आपण या सागरी अधिवासात कधी ही भरून निघणार नाही अश्या गोष्टीकडे वाटचाल करत आहोत.
आता हे सगळं वाचून कोणी विचारल करेल मग जर हे
इतक वाईट असेल तर मग आपण हे का करतो? आपण ह्या पद्धतीची मासेमारी का बंद करत नाही?
तर दोस्तहो गेल्या १० वर्षात मला माझ्या मासेमारी समाजाकडून मिळाले अनुभव व त्या
जोडीला या विषयाचा अभ्यास आणि संशोधन मोहिमा यात मी घेतलेला प्रामाणिक सहभाग या
आधारावर मला याची काही कारणे मिळाली आहेत. एक तर शासकीय पातळीवर म्हणा किंवा एका
मासेमारी करणाऱ्या बोट मालकाच्या पातळीवर म्हणा बोट बांधणे, ती बोट चालू स्थितीत
ठेवणे या साठी खूप काही गोष्टी आणि पैसे पणाला लावले असतात. बॉटम ट्रॉल पद्धतीची मासेमारी कीती व्यापक आहे ह्याच अंदाज जर आपल्याला घ्यायचा असेल तर २०१९ मध्ये प्रकाशित CMFRI चा वर्षीक अहवाल यासाठी मदत करू शकतो. निव्वळ महाराष्ट्रात होणाऱ्या मासेमारी पैकी ५५% मासेमारी याच पद्धतीने होते. बोंबिल, मांदेली, सुरमई यांसारखे समुद्रात वरच्या थरात विचरण करणारे मासे २५% याच पद्धतीने पकडले जातात. तर समुद्र तलाशी असणारे मासे जळपास ७७% याच पद्धतीने पकडले जातात. निसर्ग संवर्धन आणि
नियमावली या आधारावर अश्या गोष्टी तडकाफडकी बंद करणे काही योग्य नाही आणि त्या व्यवहार्य ही नसतात. जुनी गोष्ट वाईट म्हणून तिला लगेच सोडून देणे काही योग्य नाही
तिला काही तरी पर्याय देणे तेवढेच गरजेचे असते. कारण बहुसंख्य वेळा कित्येक कुटुंब
आपल्या रोजच्या रोजिरोटी साठी यावर अवलंबून असतात.
एवढी मेहनत करून आम्ही काल काय मिळवल तर साधारण
५००-६०० किलो मासे. ज्यात बाजारात चढया भावाने किंमत मिळेल अश्या काही कोळंबी आणि खेकडे
याचं समावेश होता परंतु ज्याच्या बाजारात काही उपयोग नाही अश्या मत्स्य प्रजातीचा देखील
समावेश आहे. समुद्री पृष्ठभाग हा अत्यंत सुपीक असा सागरी अधिवास असतो ज्यावर नानाविधी
सागरी वनस्पति आणि प्राणी आपले निवासस्थान बनवतात. खोल समुद्रात आढळणारे मृदुकाय प्राणी,
प्रवाळ जीव वसाहती, स्पॉज सारखे संवेदशील जीव अश्या भागी उभे असतात. शेत जमिनीतून पिकणाऱ्या
धान्य बाबत नफा कमीवण्यासाठी शेतातील सुपीक मातीचा एक एक थर दर वर्षी कमी करत जाणे
या सारखा मूर्खपणा आपण समुद्रात करत असतो. शेती आणि मासेमारी या मधला महत्वाचा एक फरक
येथे असतो तो म्हणजे एका समुद्राच्या पोटात असणाऱ्या जमिनीवर असंख्य वेळा असंख्य लोक
हल्ले करत असतात.
वर्षभर किनाऱ्यापासून अंतर ठेऊन असणारे काही सागरी पक्षी मात्र या वेळी मला विपुलतेने दिसून आले. ते का इतक्या विपुलतेने दिसून येतात, त्यांची वर्तणूक वगैरे बाबी मात्र मी सध्या काही सांगू शकत नाही. शस्त्रीय पद्धतीने जमा केलेली माहिती तीच विश्लेषण या बाबी पार पाडल्यनतरं आपण ती गोम समजु शकतो. पाठीवर कुबड असलेले भारतीय सागरी डॉल्फिन मात्र या दरम्यान अधूनमधून आपलं अस्तित्व दाखवून देत होते. २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधपत्रिकेतील निबंधा अनुरूप गेल्या ५० वर्षात जगभरातील मासेमारी ही १९.३ दशलक्ष टन ते आज १५४ दशलक्ष टन इतकी व्यापक प्रमाणात वाढली आहे. वाढत्या मासेमारी सोबत आणखी एक गोष्ट वाढली ती म्हणजे मासेमारी करताना जाळ्यात अडकणारे सागरी सस्तन प्राणी, पक्षी आणि सागरी कासवे हे होत. दुर्देवाने दिवसाच्या शेवटी एक प्रोढ डॉल्फिन आम्हाला समुद्रात मृत अवस्थेत दिसला.
- क्रमश
लेखन
- प्रदिप नामदेव चोगले
मो: - ९०२९१४५१७७
दिनांक: - १९-०७-२०२१
टीप: - आपणास हा लेख कसा वाटला
हे खाली कमेन्ट मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून कळवा. आपल्या कडे ही काही आशी समुद्री
सस्तन प्राणी, पक्षी वा इतर नोंदी, आठवणी असतील तर आपण माझ्याशी संपर्क करू शकता. माहिती
आणि अनुभव यांची शिदोरी एकमेकाना वाटून आपण आपले सागरी किनारे, सागरी अधिवास तसेच चिरतंत
मासेमारी कडे एक यशस्वी पाऊल टाकू शकतो.
संदर्भ: -
·
Lewison, R. L., Crowder, L.
B., Wallace, B. P., Moore, J. E., Cox, T., Zydelis, R., ... & Bjorkland, R.
(2014). Global patterns of marine mammals, seabird, and sea turtle bycatch
reveal taxa-specific and cumulative megafauna hotspots. Proceedings of the
National Academy of Sciences, 111(14), 5271-5276.
·
Pauly, Daniel (1995)’ Anecdotes
and the shifting baseline syndrome of fisheries; Trends in Ecology and Evolution,
10 (10):430
• CMFRI, K. (2019). CMFRI annual report 2019.
Comments
Post a Comment