सागर कथा - भाग २

 नारळी पौर्णिमा -  सागर पूजन ते  सागर  संवर्धन





आज सकाळपासून शुभेच्छाचा वर्षाव सुरु झाला. मी एक मासेमारी समाजातील व्यक्ती आहे म्हणून माझ्या परिचयातील मंडळी आर्जवून मला 'नारळी पौर्णिमा' च्या उत्सवा निमित्त शुभ संदेश पाठवत होते. यातील एक सवांद मात्र मला जरा व्यथित करून गेला. कारण समोरली व्यक्ती फोनवर म्हणाली कि "नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज तुमचा फार मोठा सण" मी उत्तरलो तुमचा? अहो हा सण केवळ माझा किंवा आमचा नव्हे तर या भूतळावर जगत असलेल्या समस्त मानवी सभ्यतेचा.  

  आपल्या येथे बहुसंख्य समाज धारणेत एक चुकीची विचार पद्धत फार प्रचुरतेने दिसून येते ती म्हणजे स्वतःला एका विशिष्ठ संकुचित विचार धारेत अडकून घेणे. समाजाला, देशालाच नव्हे तर ज्यांनी अखंड मानवी समाज रचनेला खूप काही अद्भुत असे विचार आणि प्रयोग दिले त्या 'विचारशील व्यक्ती ' ना आपण विशिष्ठ अश्या समाजासोबतच कायमचं बांधून टाकतो. त्याच बरोबरीने हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रीती, परंपरा आणि कार्यप्रणाली यांना एक तर आपण त्या त्या धर्म, जात, समाज घटक आणि विशिष्ठ प्रदेशात स्थिरावलेल्या समाजा पर्यत मर्यादित करतो. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होतो तर बुद्धी न वापरता विशिष्ठ गोष्टी  वर्षानुवर्षे करत राहणे त्याचा मूळ हेतू लक्षात न घेता. 

  या लेखाच्या पुढील गोष्टी समजून घेण्याअगोदर मी काही बाबी तुमच्या निदर्शनात आणू इच्छितो ज्या व्यक्तिगत रीत्या मी अनुभवल्या आहेत.  गेल्या एका वर्षाभरात महाराष्ट्रा पासून केरळ पर्यंत, समुद्री किनाऱ्यापासून ते अगदी जेथे पाण्याच्या खोली ३००० मीटर पेक्षा अधिक आहे अश्या दूर महासागरी अधिवासा पर्यंत समुद्र पाहणे, निरीक्षणे नोंदवणे आणि संशोधन सफरी यांच्या माध्यामातून त्याचा अभ्यास करणे या बाबीत माझा सहभाग राहिला. याच कालावधीत भारताच्या मुख्य सागरी किनारपट्टी लगत आणि अंदमान व लक्ष्यदिप बेट समूह मासेमारी करणाऱ्या नानाविधी मासेमारी बंधू-भगिनी याच्या मुलाखती घेणे, त्याच्या समस्या समजून घेणे त्याच्या कडे असलेल्या माहितीचा खजिना संकलित करणे ह्या बाबी मी पार पाडल्या. मासेमारी आणि समुद्र याच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या  ७००० पेक्षा अधिक व्यक्ती चा विचार ऐकल्यानंतर एक गोष्ट खात्रीशीर रीत्या पक्की समजली की शेती नंतर या कृषिप्रधान भारत देशात जर अशी कोणती गोष्ट आहे ज्यावर खूप मोठा समाज उदरनिर्वाह करतो तर ती म्हणजे मासेमारी आणि समुद्र.  

  आता पुन्हा समजून घेऊ या लेखाचा मुख्य गाभा. भारतीय संस्कृती मध्ये कित्येक अशा सणाची मालिका देशाच्या विविध भागात साजरी केली जाते. आज प्रत्येक उत्सवांमधील आनंद दायक कृती करण्यावर सगळ्याचा भार असतो परंतु त्या मागील अर्थ आणि त्याचा उगम याबाबत मात्र आपण फार उदासीन असतो. रेमन मॅगसेसे, टेम्पल्टन यांसारखे आंतराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार प्राप्त प्रयोगशील व्यक्तिमत्त्व आदरणीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या 'संस्कृती पूजन' या पुस्तकात. त्याचप्रमाणे 'श्यामची आई' या लाडक्या साहित्य कृतीचे जनक व महाराष्ट्राचे लाडके लेखक, कवी व विचारवंत आदरणीय साने गुरुजी यांच्या 'भारतीय संस्कृती' या पुस्तकाप्रमाणे उत्सव, प्रतीके यामागे फार मोठं विज्ञान आणि शिकवण आहे. उत्सवामागे दोन मुख्य उद्देश असतात यातील प्रथम गोष्ट म्हणजे 'प्रेयस' अर्थात जे आपल्या मनाला आवडेल, आनंद देईल असा प्रत्येक सण, उत्सवांमधला भाग. जर आपण नारळी पौर्णिमा या उत्सवा बद्दल विचार केला तर या उत्सवा मध्ये बनवली जाणारा नारळी पाक, ओल्या नारळाच्या करंज्या, या सणाचा औचित्य साधून करण्यात येणार नृत्य आणि मिरवणुका, नारळ फोडी चा खेळ या बाबी 'प्रेयस' या घटकामध्ये मोडतात. उत्सवामागे असलेली विशिष्ठ विचार धारा आणि तत्वज्ञान आणि विज्ञान म्हणजे 'श्रेयस' बाजू. नारळी पौर्णिमा या सणाच्या द्वारे जर समजून घ्याच म्हटलं तर समुद्रा प्रति व्यक्त केला जाणारा कृतज्ञता भाव, निसर्ग संवर्धन करण्यासाठी आणि मत्स्य बीज वाढवावं म्हणून साधलेला संयम ची परिपूर्णता झाली तो दिन या सगळ्या बाबी 'श्रेयस' सदरात मोडतात. 

  आता काही गोष्टी अश्या माझ्या मित्र मंडळी साठी जे मासेमारी आणि समुद्र याच्यावर पूर्णपणे विसंबून नाही आहेत वा ज्याचा या गोष्टीशी संबंध नाही परंतु अप्रत्क्षरीत्या जे या बाबी शी संलग्न आहेत. Ecosystem Services वा नॆसर्गिक परिसंस्थेमधून आपणांस मिळणाऱ्या सेवा अशी एक वैज्ञानिक संकल्पना आहे. उदाहरणार्थ आपणांस सार्यांना माहित आहे कि रान वने आपणांस प्राणवायू वा ऑक्सिजन देतात, तेथील झाडे पूर्वी आपण सरपण म्हणून वापरत होतो, नदी आपणांस पिण्यायोग्य पाणी मुबलक प्रमाणात देते या आणि अश्या कित्येक नॆसर्गिक घटक आपणांस बऱ्याच गोष्टी पुरवत असतात ज्याचा अंतर्भाव Ecosystem Services वा नॆसर्गिक परिसंस्थेतून मिळणाऱ्या सेवेत होतो. विशेषता समुद्र वा सागरी परिसंस्था आपणांस काय देते ते आता समजून घेऊ. संपूर्ण पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत महत्वाचे असणारे काही मूलभूत घटक ज्यात अंतर्भाव होतो कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉसफरस आणि सल्फर या मुलद्रवाचा. समुद्र हि अशी जागा आहे जेथे  पाऊस पडण्यासाठी लागणाऱ्या जलचक्रा बरोबर या मूलभूत घटकाची चक्रे खंड न पडता चालू असतात. सारमिंटो आणि इतर संशोधक १९९५ लिखित शोधनिबंध , बॅरिंनर आणि इतर संशोधक १९८३ प्रकाशित शोधनिबंध या अनुसार कार्बन निमिर्ती चक्रामध्ये महासागर आणि समुद यांची भूमिका सविस्तर रित्या समजावली आहे.  साधारण १०,००० लोकसंख्या असलेल्या मानवी समूह दिवसाला ५ लक्ष लिटर सांडपाणी निर्माण करतो ज्यावर जर आपण प्रक्रिया केली तर सुमारे ४.२ दशलक्ष डॉलर एवढा खर्च अपेक्षित आहे(डॉलर १९९६; शोध निबंध ).आपण कुठे हि रहा बहुधा आपण निर्माण केलेलं सांडपाणी ओढे, नाले, नदी असा प्रवास करत समुद्र आणि महासागरा पर्यंत नक्कीच येऊन पोहचतात. या सागरी अधिवासात मुबलक पप्रमाणात विचरण करणारे प्लवक जीव  (Plankton) या सांडपाण्यात असणार्या घटकावर नॆसर्गिक रित्या प्रक्रिया करून आपणांस प्राणवायू चा पुरवठा करतात.  आज आपण मोठ्या प्रमाणात खनिज तेल, पेट्रोल आणि डिझेल वर आधारित यंत्र वापरतो या सगळ्या मधून निर्माण होणारे हायड्रोकार्बन चे विघटन मोठ्या प्रमाणत समुद्रात आढळणारे सूक्ष्मजीव करतात (कॅरिंगला आणि हॅटरकॅम्प १९८९; शोधनिबंध). औद्यगिक करणात निर्माण होणारे डीडीटी, पी. सी. बी , डायॉक्सिन आणि जड मूलद्रवे उदाहरणार्थ शिसे, पारा इत्यादी प्रदूषके याचे नॆसर्गिक रित्या शोषण(Sequestration) समुद्र, खाड्या आणि महासागरे करतात ज्यामुळे आपल्या भोवतालचं वातावरण आज देखील जगण्यास पूरक आहे (क्रॉस आणि सुंदा १९७८; शोधनिबंध). त्याच बरोबर काही आपणांस माहित असलेल्या बाबी म्हणजे समुद्र आपणांस मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देतो; जवळपास आपण घेत घेत असलेला चार पैकी तीन श्वास घेण्यासाठी लागणार ऑक्ससीजन आपणांस समुद्र देतो मग आपण या जगात कुठे हि राहत असाल तरी. समुद्री माल वाहतूक हि जगातील सगळ्यात व्यापक प्रमाणांत वस्तू आणि सेवा वितरित करणारी गोष्ट आहे जी आपणांस समुद्र आहे म्हणून मिळते. पर्यटन, मासेमारी, नॆसर्गिक वायू, खनिज तेल, मिनरल्स जीवन चवदार करणारे मीठ अश्या मूलभूत सेवा देखील आपणांस समुद्र देत असतो. म्हणून माझ्या या मासेमारी न करणाऱ्या मंडळी ला विनंती आणि आमंत्रण आहे कि या आपण देखील 'नारळी पौर्णिमा' उत्सहाने साजरी करू. या सणाच्या निमित्ताने आपण या दर्या राजाला कृतज्ञता पूर्वक वदंन करू. 

  आता काही बाबी माझ्या मासेमारी समाज मंडळी साठी. दोस्तहो निसर्ग वेगाने बदलत आहे आणि या बदलाचे आपण साक्षीदार आहोत. वाढणारे जागतिक तापमान, लोकसंख्या, औद्यगिकरण, शहरीकरण व प्रदूषण या साऱ्या बाबी आपली मासेमारी देखील बदलवत आहे. फार पूर्वी खाडीत झोळ्यात मावणार नाही एवढा मावरा आपल्या पूर्वजांनी पकडला परंतु आता अगदी ४०-५० वाव काय आणि ट्रॉलर चा जाळं काय काही तरी गडबड होत आहे. आपल्या पदरी खर्च जास्त आणि मासेमारी मधून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. यात भर म्हणजे राजकीय दबाव आणि काळाची गरज म्हणून मोठं मोठे प्रकल्प, औद्यगिक वसाहती आपले कोळीवाडे आणि गाव वस्त्या चिरडून टाकण्याचं प्रयत्न करत आहे. आपल्या वस्त्या आणि गावे यांना झोपड्पट्टीच्या आणि गलिच्छ वस्तीत समावेश करण्याचा प्रयत्न होत आहे. 

 मित्रहो या साठी आपल्या गरज आहे एकजुटीने उभे राहून समाज बळ आपल्या पाठीशी उभा करायची. समुद्र आणि मासेमारी हि जरी आपली शान, मान आणि ओळख असली तरी समुद्र आणि सागरी परिसंस्था यातून मिळणाऱ्या सेवा या फक्त मासेमारी समाजापर्यंत मर्यादित नाही तर जगातील प्रत्येक व्यक्ती या ना त्या पद्धतीने समुद्राशी संलग्न आहे. 'नारळी पौर्णिमा' हा सण व्यापक प्रमाणत समजून उमजून साजरा करू म्हणजे एक व्यापक समाजबळ आपल्या सोबत असेल. शेवटी एकच वाक्य बोलावसं वाटते ते म्हणजे 'मुंबई ह्या कोळ्यांची  नाय कोणाच्या बापाची' हे जरी खरं असलं तरी सागरा प्रति कृतज्ञता हा भाव ज्यांच्या अंगी आहे अश्या सगळ्या मंडळी नि नारळी पौर्णिमा समजून घ्यावी आणि साजरी करावी .  


लेखन 

- एक सागरपुत्र 

प्रदिप नामदेव चोगले 

मोबाईल : - ९०२९१४५१७७

pradipnc93@gmail.com


 टीप: - सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. 


संदर्भ  सूची: - 

१. आठवले, पांडुरंग शास्त्री; संस्कृती पूजन, सद्विचार दर्शन ट्रस्ट प्रकाशन मुबंई, २००४

२. साने गुरुजी; भारतीय संस्कृती, कॉंटिनेंटल प्रकाशन; २०१५

३.    Sarmiento, J.L., R. Murnane, and C.leQuere. 1995. Air-sea CO2 transfer and the carbon budget of the North Atlantic. Phil. Trans. R. Soc. Lond. B. 348:211-219

 ४. Daily, G. C. (2013). Nature’s services: societal dependence on natural ecosystems (1997) (pp. 454-464). Yale University Press.


 


 


   




    



 


   


     


              



    



 



       




   

    


   


    


      



 


 

    


       



         


     

Comments

  1. खूप छान आणि माहितीपूर्ण लेख!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५