पुस्तके आणि गांधीजी

मला उमजलेले 'गांधीजी'


 काल संपूर्ण देशात गांधी जयंती निमित्त सुट्टी होती. बहुसंख्य सरकारी कार्यालये आणि काही प्रमाणात खाजगी क्षेत्रात देखील काम करणारी मंडळी घरी होती. दिवसभरात बऱ्याच मंडळी ने विविध माध्यमातून 'महात्मा गांधी' यांना स्मरून व्हाट्सअप व फेसबुक वर स्टेट्स ठेवले. काही असो एक संमिश्र भाव मी सोशल मीडियावर गांधी जयंती निमित्त अनुभवला. दिवस उतरणीला लागला आणि आणि अचानक लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, अहिंसा, इंग्रजा विरोधी लढा सोबतच नथूराम गोडसे आणि त्यांची बंदूक असे तुलना करणारे काही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागले. पोस्ट करणारे काही जण परिचित होते तर बहुसंख्य अज्ञात होते.

  विचार अभिव्यक्ती हि आपल्या संविधांनात दिलेली आपल्याला फार मोठी देणगी त्यामुळे आजकाल कोण काय बोलेल याचा काही नियम नाही. असो या लेखाच्या पहिल्या परिच्छेदात जे मी लिहलं त्याचे अर्थ काय असू शकतात हे सर्व सुजान भारतीयांना माहित आहेत. 

  २००५ मध्ये मी दहावी ची परीक्षा दिली आणि त्या सुट्टीच्या वेळी मी मामांच्या गावी न जाता टायपिंग च्या शिकवण्या केल्या. या दरम्यान सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा पर्यंत मी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रँथालय, मुंबई येथे माझा वेळ व्यतीत केला. स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानून मी अखंड वाचन करू लागलो. गांधी विचार धारा हि शाळेत इतिहासाच्या पुस्तकात वाचून मला न पटणारी किंबहुना मनाला आकर्षित न करणारी अशीच होती. जहाल आणि मवाळ विचार धारा ज्या पद्धतीने आम्हाला शिकवण्यात आली निदान त्यामळे वय वर्ष १६ मध्ये माझं मन जहाल मत विचार धारे कडे झुकू लागलं. या गोष्टी ला तडा तेव्हा गेला जेव्हा मी 'माझे सत्याचे प्रयोग' हि गांधीजी नी लिहिलेली आत्मकथा वाचली. राष्ट्रपिता, बापू,  महापुरुष, अहिंसा मूर्ती इत्यादी अनके बिरुदे ज्या व्यक्ती ला लावली गेली आहेत त्या व्यक्तिमत्वाला मी स्वतःहून पहिल्यांदा या पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेत होतो. उच्च ध्येय आणि सत्य, अहिंसा, सदाचार, ब्रह्मचार्य, संयम असे गुण ज्या व्यक्ती मध्ये आहेत हे मी जे शाळेत शिकलो होतो त्या गोष्टी या पुस्तकाच्या वाचनाने काहीशा हादरून गेल्या. 

  एखादी व्यक्ती सगळ्यांप्रमाणे जन्म घेते आणि जाते परंतु त्याच्या वक्तिमत्वाला किंवा जीवनपुष्पाला सुंगधं तेव्हा येतो जेव्हा माणूस निराश न होता ध्येयाचा पाठपुरावा करतो. लहान पणी सोनं चोरणे, आफ्रिकेत असताना मित्राच्या बरोबर वेश्या वस्तीत जाणे, मांस भक्षण करणे, स्वतःचे वडील विदारक स्थितीत असताना पत्नी सोबत शरीर सुख उपभोगणे अश्या साऱ्या गोष्टीची कबुली गांधीजी आपल्याला स्वतःहा या पुस्तकात देतात. कुरुक्षेत्रात गलीगात्र झालेला अर्जुन आणि त्यानंतर श्री कृष्ण च्या मुखकमळातून स्त्रवित झालेले 'गीतागान' ऐकून लढायला तत्पर झालेला गुडाकेश धनंजय पार्थ यामध्ये जितकी जबरदस्त बदल आपण पाहतो. तसेच गांधीजी च्या जीवनात आलेले टप्पे आपण या पुस्तकातून समजून घेऊ शकतो. मला गांधीजी पूर्ण अर्थाने समजले किंवा पटले असा याचा अर्थ होत नाही परंतु चुकांवर मात करून प्रगमनशील ध्येयवाद स्वीकारणारे गांधी मला प्रभावित करतात. आपल्या व्यक्तिमत्व आणि चरित्राने गांधीजीनी  करोडो जीवने प्रभावित केली आणि मोठ्या प्रमाणत व्यापक स्वरूपात अखंड भारतीय समाज देश लढ्यात सामील झाला. 

 लियो निकोलस टॉलस्टोय यांच्या 'शैशव' हि अनुवादित कादंबरी मी त्यानंतर वाचली कारण एकच कि 'टॉलस्टोय फार्म' या नावंच गारुड मला समजून घ्यायची इच्छा झाली. गडगन्ज संपत्ती असलेली व्यक्ती जेव्हा एका वेगळया वळणाने जाणारा रस्ता चोखाळते आणि जीवनात जाणीवपूर्वक कष्ट करते ते वाचून मला फार मस्त वाटलं. टॉलस्टोय समजून घेतला तेव्हा मला आणखी व्यापक स्वरूपात गांधीजी समजू लागले. 

 त्यानंतर नुकतीच हेन्री डेव्हिड थोरो यांची 'वॉल्डन' पुस्तिका माझ्या हाती लागली. पैसे कमावणे, सुख सोइ उपभोगणे, निसर्ग भान जपून जीवन जगणे या बाबी मला त्या पुस्तातून समजल्या. का गांधीजी नी निसर्ग पूरक जीवशैली अंगिकारली? का गांधीजी शरीर श्रमाला अधिक महत्व देतात ते या पुस्तकाने आणखी स्पष्ट झाले. गांधीजी समजून घेताना किंबहुन समजून घेण्याची ईच्छा असणाऱ्यांनी हि पुस्तके आर्जवून वाचली पाहिजे. 

  नुकताच मी सागरी सस्तन प्राणी च्या अभ्यास करण्यासाठी अंखड गुजरात ची सागरी सफर केली. एके दिवशी पोरबंदर चा किनारा माझ्या नजरेच्या टप्यात आला आणि अचानक मला मी वाचलेले आणि समजून घेतलेले गांधीजी आठवले. मी काही गांधी विचार धारा धरून चालणार व्यक्ती नाही नाही त्या विचार धारेचा विरोधक. परंतु ज्यांचे जीवनप्रवास मला मार्गदर्शक ठरतो असे एक व्यक्तिमत्व . शालेय जीवनापासून ते आजतागत मी वाचलेली आणि मला समजलेले गांधीजी मी आपल्या समोर व्यक्त केले 

   

लेखन 

एक सागरपुत्र

प्रदिप नामदेव चोगले 

मोबाईल _ ९०२९१४५१७७



टीप: - आपणांस हा लेख आवडल्यास आपली प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नोंदवावी . 


संदर्भ : - 

संदर्भ चित्र : - https://pbs.twimg.com/media/EEJxR_gWsAg81Ek.jpg

१. माझे सत्याचे प्रयोग; लेखन महात्मा गांधी, वरदा प्रकाशन 

२.  वॉल्डन, हेन्री डेव्हिड थोरो, अनुवाद मधुश्री पब्लिकेशन  






 



 



 




 




 





     

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Guardians of the Sea: How the Koli Community’s Wisdom Can Transform Marine Conservation

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ४