मला उमजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विश्व


 


  मी तेव्हा कुलाबा महानगर पालिकेच्या मराठी माध्यमाच्या तिसऱ्या इयत्तेत होतो जेव्हा सर्वांत पहिल्यांदा गौतम बुद्ध यांच्या विचार आणि कार्याची ओळख मला झाली. निमित्त होतं भाषणाच्या स्पर्धेत तिसरा आलो म्हणून मला बक्षीस म्हणून भेट दिलेलं पुस्तक. प्रसिध्द लेखिका लीला जॉर्ज यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे ते अनुवादन होत ज्याचं शीर्षक होतं 'गौतम बुद्ध'. सोपी भाषा आणि आकर्षक रंग, चित्रे आणि पाली भाषेतली अवतरणे यांमुळे मला ते पुस्तक फार भावलं. आतापर्यंत जवळपास ५० हुन अधिक वेळेत मी त्या पुस्तकाची पारायणे केली. तेव्हा माझं वय साधारण ८-९ इतकं असेल परंतु तेव्हा देखील त्या विचारांची माझ्या मनोपटलावर पडलेली छाप आज देखील कायम आहे.

  अकरावी ला असताना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रँथालयात मी पहिल्यांदा प्रवेश केला.  विज्ञान शाखेतील विदयार्थी म्हणून नियोजित शैक्षणिक पाठ्य पुस्तकांपेक्षा मला या ग्रँथालयातील पुस्तके अधिक जवळची वाटू लागली होती. तेथेच पहिल्यांदा मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्य विश्वाचा परिचय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेख आणि भाषणे याचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले सहा खंड मी तेव्हा पहिल्यांदा वाचले. या राजकीय आणि सामाजिक विषयांना स्पर्श करणाऱ्या विचार-धारा समजून घेतल्या नंतर जे पुस्तक मला आवडलं ते म्हणजे 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' हे होय. यातील काही बाबी मला विलक्षण भावल्या तर काही आज देखील वैचारिक पातळीवर नाही पटत. सामाजिक जातीयता, वर्ग संघर्ष, सर्वसमावेशक आचारसंहिता या बाबी मला तर्क बुद्धीने नक्कीच पटल्या आणि मनापासून आवडल्या. परन्तु या मध्ये व्यक्त केलेली मूर्ती पूजेची अवहेलना आणि वैदिक विचारधारेशी असलेली मत भिन्नता मला कधीच पटली नाही. किंबहुना 'मुर्ती पूजा हे एक शास्त्र आहे' असे संस्कार ज्या माझ्या मनावर झाले होते त्या 'हिंदू' वा 'वैदिक' मनोभूमिकेमुळे या बाबी स्वीकार करायला मन-बुद्धी मध्ये जणू संघर्ष निर्माण झाला. असो तेव्हा मी साधारण १६-१७ या वयाला पोहचलो होतो आणि त्या वेळी हे सगळं वाचून मला मानसिक रित्या उत्तम मनुष्य कोण? हे थोडंस उमजू लागलं होतं.

  'ज्ञान हे दुधारी तलवारी सारखं असते' आणि हे ज्ञान संपादन करण्यासाठी आणि आणि समाज उपयोगी कार्यासाठी उपयोगात आणण्यासाठी 'शील' आवश्यक आहे हे ज्यांनी मला सगळ्यात पहिल्यांदा  समजावलं ते लोकनेते म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच होत. मराठी शाळेत पुस्तकात काही पानं 'विचार-धन' म्हणून मध्येच यायची त्या मध्ये मी डॉ. आंबेडकरांना मध्येच कधी तरी भेटत असे. टिकली एवढं जॅम आणि एक छोटा पावाचा तुकडा एवढ्याच गोष्टी खाऊन त्यांनी केलेली ज्ञानसंपादनाची यात्रा म्हणजे माझ्यासाठी मला अजून फार शिकायचं आहे या मागची प्रेरणा ठरतं असे.

  पुनर्जन्म आणि इतर बाबी या गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहेमीच अधोरेखित नाही केल्या. परन्तु जेव्हा दुर्गा भागवत लिखित 'सिद्धार्थ जातक' कथेचे सात खंड मी वाचले तेव्हा मात्र बुद्धत्व म्हणजे काय? आणि त्या मागे असलेले अनेक जन्माचे प्रयत्न याची मला ओळख झाली. आज मी वयाची तीसहुन अधिक वर्ष पार केली आहेत आणि समाजात आणि राजकीय क्षेत्रात चालू असलेली धार्मिक मतमतांतरे पाहून प्रचंड चीड आणि हसू येतं. धार्मिकतेचा चुकीची बीजे पेरणारी मंडळी आणि त्यांना बळी पडणारे त्यांचे अंध-अनुयायी यांनी जर काही वेळ या विचारधारा समजून घेण्यासाठी थोडं वाचन केलं तर हा संघर्ष फार वेगाने वितळून जाईल यात मला काहीच शंका नाही.

  ज्या शाळेत डॉ. बाबासाहेब शिकले आणि ज्या महाविद्यालयात त्यांनी आपलं मुबंई मध्ये शिक्षण काही वेळ पूर्ण केलं त्या 'एल्फिन्स्टन विद्यालय,मुबंई' आणि 'एल्फिन्स्टन महाविद्यालय ,मुबंई' या दोन्ही संस्थेत मी देखील माझं इयत्ता आठवी ते दहावी आणि अकरावी ते बीएसी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं हा माझ्या जीवनातील एक महत्वपूर्ण योगायोग आहे असं मला वाटतं. बाबासाहेबांनी समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी आणि एक उत्तम मनुष्य होण्यासाठी केलेला ज्ञानयज्ञ सगळ्यांना प्रेरणादायी आहे.

  बाबासाहेबांनी जातीयता केंद्रस्थानी ठरवून केलेली शिक्षण-नोकरी साठी उभी केलेली आरक्षण व्यवस्था मला कधी फार चुकीची तर कधी मला ती फार दुरदृष्टिकोन ठेऊन एका महामानवाने केलेली उत्तम उपाययोजना आहे असं दिसून येतं. मी काही गोष्टी स्वतः माझ्या जीवनात अनुभवल्या आहेत त्या आधारे मला असं वाटतं. वर्ष २०१६ होतं जेव्हा मी पुण्यात एक वर्ष नेट परीक्षेसाठी तिकडे जवळपास एक वर्ष राहिलो. मी आणि माझ्या मित्रांनी त्या वेळी दिवसाला जवळपास १२-१४ तास अभ्यास केला अखंडित रित्या. दिवस हळू-हळू सरकू लागले आणि एके दिवशी परीक्षेचा दिवस उजाडला. त्या वेळी मला 'खुल्या प्रवर्गातून' ४३.४२% पडले दुर्देवाने त्या वर्षी या प्रवर्गातून उत्तीर्ण होण्याची किमान मर्यादा आणखी दोन टक्के जास्त होती. मी त्या वेळी त्या आपात्र ठरलो. वेळ आणि जवळपास लाखभर रुपये मी या दरम्यान त्या वेळी खर्च केले. माझ्या आई चे दागिने त्या वेळी तारण म्हणून या दरम्यान पैसेची तजबिब करण्यासाठी वापरले. फार वाईट वाटलं. परन्तु तेव्हा फार राग आणि वाईट वाटलं जेव्हा माझ्या सोबती मधले काही विदयार्थी ३२-३४% मिळवून देखील पात्र ठरले. कारण त्यांनी आधार घेलता होता जातीय आरक्षणाचा. ज्या वेळी माझं कुटूंब चा मासिक उत्त्पन्न होतं १४००० हजार आणि माझ्या जातीय आरक्षण चा लाभ घेणाऱ्या सोबत्याचा परिवाराचा मासिक उत्पन्न लाखात होते. आम्ही वैज्ञानिक होऊन संशोधनात देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी ही पात्रता परीक्षा होती दुर्देवाने यात जिज्ञासा, मेहेनत आणि बुद्धिमता यांची जागा जातीय आरक्षण यांनी घेतली होती. त्या वेळेत मला या बाबत प्रचंड राग आणि उद्वेग होता परन्तु मी प्रयत्न करून पून्हा अभ्यास करून परीक्षा द्यावी या व्यतिरिक्त माझ्या कडे आणखी कोणता इतर पर्याय उपलब्ध नव्हता.

  अगदी याउलट जेव्हा मी २०२०-२०२२ या वर्षात भारतीय किनार पट्टीच्या भागात सागरी सस्तन प्राणी संबधी सर्व्हे केले तेव्हा मात्र आज देखील समाजात जातीयता किती प्रखरतेने मूळ धरून आहे यांची ओळख झाली. आज देखील अशी कित्येक गावे आहेत आपल्या राज्यात जेथे समाजातील उच्च वर्णीय घटक समाजातील इतर कष्टकरी वर्गाला दुय्यम भावनेने वागवतो. अशी कित्येक गावे आपल्या राज्यात मी पहिली आहेत जेथे  आज देखील गावकरी बहुमताने गावच्या मुख्य हद्दीत कोणी रहायचं याचे निकष माणसाची जात पाहून ठरवले जातात. एक चांगल्या निष्णात डॉक्टर तो इतर जातीत जन्माला आला म्हणून त्याचं क्लीनिक आणि घर गावकुसाबाहेर करणारी शिक्षित अडाणी मंडळी मी पहिली आहेत. हे जेव्हा पाहिलं तेव्हा मात्र माझे डोळे भरून आले आणि उमजल की बाबासाहेबांनी जर ही आरक्षण व्यवस्था उभी नसती केली तर मी आणि माझे इतर कष्टकरी मंडळी जवळपास मुख्य प्रवहात कधीच जोडली घेली नसती.

  आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी दिनी ज्या विद्वान, कृतीपूर्ण शिक्षण आणि समाजनेते असलेल्या भारतरत्न महामानवास माझी ही विचार पुष्पांजली.

लेखन:-

प्रदिप नामदेव चोगले

०६/१२/२०२२

कल्याण-मुबंई प्रवास


टीप:- सदर लेख हा मी माझ्या बुद्धीने उमजले बाबासाहेब समजून घेण्यासाठी केलेला एक छोटा प्रयत्न आहे. यात काही दोष असतील तर ते माझे आहेत पण ज्या विचारांनी आपणांस शिक्षण आणि समाज उपयोगी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होईल तर त्याच यश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन चरित्राचे आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कल्पक चित्रपट आणि संवर्धनाचे धडे