व्यक्ति आणि विचार समजून घेताना
'खलील जिब्रान' समजून घेताना
काही गोष्टी, काही वाक्य आणि काही विचार फारच सरळ असतात. हे विचार इतके सरळ आणि सोपे असतात कि बहुधा त्यातील सहजतात समजणे सहजतेने बऱ्याच वेळा जमत नाही. गेल्या एक दशका पासून 'खलील जीब्रान' हे नाव मी ऐकलं असेल. बऱ्याच भारतीय तत्वज्ञ आणि इतिहासकार वाचत असताना हे नाव आणि या बाबत संदर्भ येत होते. परंतु इतके सहज विचार आणि वाक्य या व्यक्ती च्या नावा सोबत वाचले आहेत कि त्यात काही विशेष आहे असं मला वाटलं नाही.
साधारण वर्षाहुन अधिक काल लोटला असेल मी या ह्या लेखकाचा दृष्टिकोन आणि विचार अभिव्यक्ती समजून घेण्यासाठी 'खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा' हे पुस्तक आणलं होतं. गंमत अशी एक छोटंसं पुस्तक कधी तरी वाचू म्हणून मी त्या सोबत जरा अंतर राखून ठेवलं होतं. परंतु गेल्या आठवड्यात जेव्हा मी बंगलोर-मुबंई हवाई प्रवास केला तेव्हा विमानतलावर काही तरी वाचायचं म्हूणन याची सुरवात केली. असं म्हटलं जात काही पदार्थ हे आवडतात किंवा प्रसिद्ध आहेत म्हणून पोटभर खाऊ नये तर त्याचा अदबीने आस्वाद घ्यावा. एक घास खाऊन चव जिभेवर अनुभव करून पुढील घास घ्यावा. कधी तरी अचानक आपण एकदम भयंकर एकाग्रता अनुभवतो आणि जगविसरून जातो तसंच काहीस झालं या वाचन करण्याच्या दरम्यान.
समुद्राच्या लाटा मी वाळूत उमटवलेल्या माझ्या पाऊलखुणा मी पुढे गेल्यावर लगेच पुसणार आहेत. पण त्या बापडी ला माहित नाही कि हा समुद्र किनारा आणि समुद्र सदैव तसाच राहणार आहे. फार सोपं वाक्य होतं पहिल्या पानावर पण काय सांगू आता सध्या जे काही चाललं आहे त्याला हे अगदी आपसूक लागू पडतं. धर्म, जात, स्त्री, पुरुष, प्रेम, उपासना, काम, प्रार्थना, देश, बुद्धी आणि भावना असं कोणता विषय नाही आहे ज्या बद्दल या लेखकाने लिहलं आहे. याच्या लघु कथा कधी पूर्ण होतात काही ओळीत, कधी काही कथा असता असंख्य पानात. थोडक्यात परंतु सहज, सतेज आणि आजच्या काळालाही साजेश्या अश्या . ६ जानेवारी १८८३ ला जन्म आणि १० एप्रिल १९३१ ला मृत्यू, फक्त ४८ वर्षाचं आयुष्य पण त्यात देखील आपल्या विचाराने काळाच्या पूढे असलेला अवलिया विचारवंत. तत्कालीन मंडळी ला याचे विचार एवढे प्रल्भय वाटले कि त्याना त्याच्या मायदेशातून हद्दपार करण्याची शिक्षा देण्यात आली.
आजून पर्यंत 189 पान असेल हे लेखिका स्मिता लिमये याचं अनुवादीत पुस्तकातील 33 पान मी वाचली आहेत. पुढे वाचन बाकी आहे, पण गंमत ही कि हे पुस्तक शहानपण शिकवणार आहे आणि जीवन घडवणार आहे. त्यामुळे मी तूर्तास तरी 'स्वतःला' आणि 'खलील जिब्रान' यांना समजून घेत आहे.
लेखन
प्रदिप नामदेव चोगले
०६ जुलै २०२४
संदर्भ ग्रंथ
- खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा, लेखक- खलील जिब्रान , अनुवाद - स्मिता लिमये, रिया पब्लिकेशन
Great
ReplyDeleteVery nicely penned.Keep it up.
ReplyDelete