भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ५
अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल : संकटातील एक अद्भुत प्रजाती
टूथड व्हेल आणि बलिन व्हेल या दोन गटातून हम्पबॅक व्हेल (Megaptera novaeangliae) ही बलिन व्हेल या प्रकारात मोडते. बलिन व्हेल या अश्या व्हेल आहेत ज्याना तोंडात दात असण्याच्या जागी आपण केस विंचरायल जसा कंगवा वपरतो त्या प्रमाणे जाळीदार पडदे असतात ज्याने ते आपलं अन्न म्हणजे कोळंबी सदृश जीव क्रिल, छोटे मासे व प्लवक गाळून खातात. दिवसाला हा अजस्त्र जीव साधारणपणे जवळपास 1300 किलो ग्राम पर्यन्त अन्न खातो. भारतीय रस्त्यावर दिसणाऱ्या ‘मारुती स्विफ्ट’ या कार च्या वजना इतक भरेल एवढं अन्न ही व्हेल खाते असं आपणे तुलेनेण म्हणून शकतो. ह्या व्हेल मध्ये मादी व्हेल ही नरापेक्षा जवळपास १-१.५ मीटर अधिक लांब असते. यांची लांबी सर्वसाधारणपणे ११-१७ मीटर लांब असते. भारतीय रेल्वे च्या नॉन-एसी डब्याची आदर्श लांबी १२.५ मीटर इतकी असते. जर तुम्ही या सोबत कल्पना केली तर याच्या आकाराची भव्यता तुम्हाला लक्षात येईल. गमंत म्हणजे हम्पबॅक व्हेल पेक्षा देखील आकारणे, वजनाने आणि लांबी ने अधिक भरतील असे सागरी सस्तन जीव ज्यात इतर व्हेल वा मासा नसलेले ‘देवमासे’ आहेत जसे की ब्लु व्हेल इत्यादि. जगभरात यांची संख्या साधारण ६०,००० हजार ते ९०,००० इतकी असेल असं संशोधक मंडळी चा अंदाज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जगभरात ही व्हेल विचरण करत असते म्हणून ती IUCN यादीत ही प्रजाती Least Concern म्हणजे मुबलक प्रमाणात आहेत असं सूचित केल गेल आहे. आता याच हम्पबॅक व्हेलची अरबी समुद्रात आढळणाऱ्या विशिष्ठ प्रदेशनिष्ठ लोकसंख्या जाती आहे ज्यास आपण ‘अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल’ असं म्हणूया. आपल्या महाराष्ट्र मधील समुद्र किनाऱ्य लगत ही व्हेल दिसून येते हे आपल्या साठी खूप विशेष आहे. आता या लेखाच्या पुढील भागात आपण याच ‘अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल’ बद्दल विशेष जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.
अरबी समुद्रात आढळणाऱ्या हम्पबॅक व्हेल ह्या जगातील फक्त चार पैकी एक हम्पबॅक व्हेल ची विशिष्ठ प्रदेशनिष्ठ लोकसंख्या जाती मधील एक आहे, जिला अमेरिकेच्या संशोधित "एंडेंजर्ड स्पीशीज ॲक्ट" (लुप्तप्राय प्रजाती कायदा) अंतर्गत अजूनही संकटग्रस्त मानले जाते. ही प्रजाती केवळ अरबी समुद्र आणि त्याच्या आसपासच्या भागात आढळते, परंतु मासेमारी , समुद्री प्रदूषण आणि हवामान बदलामुळे ती गंभीररित्या धोक्यात आहे. २००९ मध्ये सुरू झालेल्या आणि सप्टेंबर २०१६ मध्ये पूर्ण झालेल्या एका सखोल अभ्यासानंतर, अमेरिकेच्या "नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन" (NOAA) ने "एंडेंजर्ड स्पीशीज ॲक्ट" (ESA) अंतर्गत जगभरातील हम्पबॅक व्हेलच्या स्थितीत बदल केला. या नवीन सूचीमध्ये, अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल ही जगातील फक्त चार व्हेल समुदायांपैकी एक म्हणून ओळखली गेली आहे, जी ऐतिहासिक व्हेलिंग (व्हेलच्या शिकारीमुळे) नंतरही योग्य संतुलित लोकसंख्ये पर्यन्त पोहचली नाही आहे.
१९६६ मध्ये इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशनने हंपबॅक व्हेलच्या व्यापारी वृत्तीने केल्या जाणाऱ्या शिकारीवर बंदी घातल्यानंतर, जगभरातील या प्रजातीची कही क्षेत्रातील लोकसंख्या वाढत आहे हे विविध वैज्ञानिक मंडळीने सिद्ध केले आहे. जसे की स्टीविक, पी. टी. आणि इतर संशोधक चमू ने वर्ष २००३ मध्ये प्रकाशित केलेल्या शोधनिबंधा अनुसार उत्तर अटलांटिक मधील हम्पबॅक व्हेल च्या लोकसंख्ये मध्ये झालेली वाढ.
जेव्हा वैज्ञानिक प्राण्यांच्या संवर्धनाबाबत निर्णय घेतात, तेव्हा ते केवळ संपूर्ण प्रजातीवरच लक्ष केंद्रित करत नाहीत तर त्याच्या "विशिष्ट लोकसंख्या विभागां" (DPS) वरही लक्ष ठेवतात. ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. मराठीत सोप्या भाषेत सांगायचे तर, DPS म्हणजे एखाद्या प्रजातीच्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या वेगळ्या समूहाला दिलेली संज्ञा. या समूहाची आनुवंशिकता, वागणूक किंवा नैसर्गिक वास्तव्य इतर समूहांपेक्षा वेगळे असते. उदाहरणार्थ: अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल ही पूर्व अॅस्ट्रोलिया मधील हम्पबॅक व्हेल पेक्षा वेगळी आहे. प्रत्येक DPS ला संवर्धन यादीत स्वतंत्र प्रजातीप्रमाणेच महत्त्व दिले जाते. ही पद्धत वैज्ञानिकांना अधिक सूक्ष्मपणे संवर्धनाचे नियोजन करण्यास मदत करते. आता हे का महत्त्वाचे आहे? तर काही व्हेल समूह संख्येने वाढत असताना, इतर काही जसे की अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल अजूनही धोक्यात आहेत. DPS संकल्पनेमुळे आपण प्रत्येक समूहाची परिस्थिती वेगळ्यापणे समजून घेऊ शकतो आणि त्यानुसार संवर्धन उपाययोजना राबवू शकतो.
अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल्सचा समुदाय (DPS) इतर व्हेल्सपेक्षा वेगळा आहे, कारण ती स्थलांतर करत नाहीत. या व्हेल्स त्याच भौगोलिक क्षेत्रात जन्म देतात, अन्न शोधतात आणि वाढतात - हे क्षेत्र तुलनेने मर्यादित असल्याने त्यांना विशिष्ट धोके दडले आहेत. त्यांना असलेले मोठे गंभीर धोके म्हणजे ऊर्जा संशोधन (तेल व गॅसच्या शोधासाठी होणारे समुद्री उत्खनन), मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकणे/ बायकॅच (त्यामुळे व्हेल्सच्या लोकसंख्येतील घट किंवा वाढीचा दर गंभीररित्या कमी होऊ शकतो). त्यांना असलेले आणखी काही छोटे-मध्यम धोके म्हणजे आजार, जहाजांशी होणारे टक्कर आणि हवामान बदल (समुद्राचे तापमान व पाण्याची गुणवत्ता बदलणे) इत्यादि.
जगभरातील हम्पबॅक व्हेल्सचा सर्व लोकसंख्यांमध्ये, अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल्सचा समुदाय सर्वात लहान, सर्वात वेगळा आणि सर्वात जास्त धोक्यात आहे. ही व्हेल्स त्यांच्या अनोख्या आनुवंशिक रचनेमुळे आणि वागण्याच्या स्वभावामुळे इतर समुदायांपेक्षा वेगळी आहेत. ह्या व्हेल्सचे नैसर्गिक आधीवास पश्चिमेला येमेन आणि ओमानच्या किनाऱ्यांपासून ते पूर्वेला इराण, पाकिस्तान आणि भारताच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेले आहेत. हे मर्यादित भौगोलिक क्षेत्र त्यांच्या अस्तित्वाला आणखी धोका निर्माण करते. ही समुदाय अजूनही गंभीर विलुप्ततेच्या धोक्यात आहे आणि जर तातडीने कठोर संवर्धन प्रयत्न केले नाहीत, तर भविष्यात या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
आपल्या देशात या व्हेल बद्दल भूतकाळात , वर्तमान स्थितित कोणत संशोधन कार्य चालू आहे याच आढावा आपण या लेखाच्या पुढील भागात सविस्तर पणे पाहू या.
लेखन
प्रदिप नामदेव चोगले
मोबाईल: - 9029145177
pradipnc93@gamil.com
दि 13/04/2025
वेळास , महाराष्ट्र
टीप: - आपली प्रतिक्रिया खाली कमेन्ट मध्ये नक्की नोंदवा. हा लेख आणि माझा प्रयत्न आवडल्यास आपण याची लिंक आपल्या मित्र-परिवार सोबत वितरित करा.
अधिक माहितीसाठी संदर्भ: -
- Stevick, P. T., Allen, J., Clapham, P. J., Friday, N., Katona, S. K., Larsen, F., ... & Hammond, P. S. (2003). North Atlantic humpback whale abundance and rate of increase four decades after protection from whaling. Marine Ecology Progress Series, 258, 263-273.
Comments
Post a Comment