आनंदाचे शोध यात्री _२
आर्ची कार: एका समुद्री कासव संशोधकाचा जागतिक विचार प्रसार
आर्ची कार हे अमेरिकन दिग्गज समुद्रकासवा-तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. पण त्यांच्या विचारांचा प्रभाव केवळ अमेरिकेपुरताच मर्यादित नव्हता. विज्ञान आणि साहस यांचे मिश्रण असणाऱ्या त्यांच्या सशक्त लेखनाने जगभरातील वाचक मंडळीना भुरळ पाडली आहे ज्यामुळे त्यांची पुस्तके डझनभर भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. जी आज देखील बऱ्याच निसर्ग अभ्यासकाना प्रेरणा देतात.
एका अलीकडील संशोधन प्रकल्पात कार यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीची संपूर्ण कहाणी उलगडून समोर आली आहे, ज्यात त्यांच्या जगभरात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची ही पहिलीच यादी तयार झाली आहे.
आर्ची कार यांना फार मोठी देणगी होती ती म्हणजे लेखनाची. ते फक्त तथ्ये सांगत नसत. समुद्र किनारी दुपारच्या वेळी जर आपण गरम वाळू वर चालू लागलो तर जशी ती उबदार वाळू आपल्याळ स्पर्श करते किंवा रात्री सागर किनारी गस्त घालणाऱ्या कासव मित्राला मादी कासवाची पाऊलवाट (फ्लिपरवाट) ज्या पद्धतीने आनंदाचं दान देते अगदी त्या प्रमाणे कार यांचे लेखन आहे. जे वाचताना आपल्याला आपण ते वाचत नसून प्रत्यक्ष ते अनुभवतो अशी जाणीव होते. हा निव्वळ योगायोग नाही तर ते त्याच कौशल्य होतं; प्रत्यक्षात त्यांनी आधी इंग्रजीचा अभ्यास केला आणि नंतर जीवशास्त्राकडे वळले.
यामुळे त्यांची पुस्तके केवळ शास्त्रज्ञांपर्यंतच मर्यादित न राहता सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचू शकली. त्यांनी चार मोठी नैसर्गिक इतिहासाची पुस्तके लिहिली, जी कालांतराने क्लासिक मानली जाऊ लागली: हाय जंगल्स अँड लो, द विंडवर्ड रोड, उलेंडो आणि सो एक्सलेंट अ फिशे. या पुस्तकांद्वारे आणि त्यांनी 'टाइम-लाइफ'साठी लिहिलेल्या मालिकेद्वारे त्यांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचला.
द विंडवर्ड रोड: एक जागतिक प्रवासी. आर्ची कार यांच्या सर्व पुस्तकांपैकी सर्वात जास्त प्रवास केवळ द विंडवर्ड रोड या पुस्तकाने केला. या पुस्तकातील साहसे किमान तेरा भाषांमधील वाचकांसमोर गेली. एस्टोनियन भाषेत "Tuulepealne tee", स्वीडिश भाषेत "Vägen över vinden" आणि रोमानियन भाषेत "Aventurile unui naturalist in Marea Caraibilor" अशा विविध नावांनी हे पुस्तक उपलब्ध आहेत.
मनोरंजक गोष्ट अशी, की यापैकी अनेक भाषांतले भाषांतर, विशेषत: माजी सोव्हिएत युनियन आणि त्याच्या मित्र राष्ट्रांमध्ये, आंतरराष्ट्रीय कॉपीराइट नियमांचे पालन न करता प्रकाशित झाले. याचा अर्थ असा की बऱ्याच वर्षांपासून, कार यांना या रशियन, लिथुआनियन आणि लात्वियन आवृत्त्यांसाठी मोबदला मिळाला नसावा. तरीसुद्धा, त्यांच्या मुलाने पुष्टी केली, की आर्ची या काही प्रकाशकांशी संपर्कात होते, ज्यावरून असे दिसते, की त्यांचे काम सामायिक केले जात आहे याची त्यांना कल्पना होती. आंतरराष्ट्रीय आवृत्त्या बऱ्याचदा मूळ आवृत्तीपेक्षा खूप वेगळ्या दिसत. त्या बहुतेकदा साध्या पेपरबॅक स्वरूपात होत्या, कधीकधी अमेरिकन आवृत्त्यांमधील छायाचित्रे आणि चित्रांशिवाय. लिथुआनियन आवृत्तीच्या मुखपृष्ठावर तर समुद्रकासवाऐवजी एक 'जमिनीवरील कासव' (टॉरटॉइज) चे चित्र होते. मला कार याच्या या पुस्तकाची तोंडओळख CMFRI, Kochi च्या लायब्ररी मध्ये झाली. ज्यामुळे २०१९ पासून आजतागत कोकणातील कासव संवर्धन आणि संशोधन कार्यात मला विशेष रस राहिला.
एक गूढ पुस्तिका: चिनी भाषांतर- एका विचित्र गोष्टीमध्ये, संशोधकांना चिनी भाषेत लहान, ६४-पानी शैक्षणिक पुस्तिका सापडली, जिचे लेखक आर्ची कार म्हणून नमूद केले होते. त्याचे शीर्षक "Fauna and Flora" किंवा "Fauna and Plant Communities" असे भाषांतरित केले जाऊ शकते. प्राणी आणि वनस्पतींचे वर्गीकरण कसे करावे यावर ही एक साधी मार्गदर्शिका होती, जी १९६६ आणि १९७१ मध्ये तैवानमध्ये छापली गेली होती. हे कसे घडले? या गोष्टीचा मागोवा १९५६ पर्यंत जातो. 'द ग्रोलियर सोसायटी' नावाच्या एका प्रकाशकाने कार यांना मुलांच्या ज्ञानकोशासाठी तीन लेख लिहिण्याची विनंती केली. त्यांनी संमती दर्शविली, कामासाठी पैसे घेतले आणि सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते यावर लिहिले. एका लेखाचा अमेरिकन ज्ञानकोशात समावेश करण्यात आला, तर इतर दोन लेख गायब झाले होते — फक्त इतकेच, की ते वर्षांनंतर या चिनी पुस्तिकेच्या मजकूराचे रूप धारण करून पुन्हा दिसू लागले. कार यांचे मूळ हस्तलिखित तैपेईमधील एका प्रकाशकाकडे कसे पोहोचले हे रहस्यच बनून राहिले आहे, परंतु त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या लेखनाचा एक अनोखा, कमी ओळखला जाणारा भाग चिनी भाषांतरात उपलब्ध झाला.
टाइम-लाइफ मालिका: एक आंतरराष्ट्रीय यश. प्रसिद्ध टाइम-लाइफ पुस्तक मालिकेसाठी केलेल्या कामामुळे कार यांना सर्वात मोठे जागतिक मंच मिळाले. त्यांनी तीन खंड लिहिले: द रेप्टाइल्स (सरपटणारे प्राणी), द लँड अँड वाइल्डलाइफ ऑफ आफ्रिका (आफ्रिकेची जमीन आणि वन्यजीव), आण द एव्हरग्लेड्स. ही पुस्तके जगातील अनेक देश आणि भाषांमध्ये प्रकाशित झाली. फक्त द रेप्टाइल्स हे एकच पुस्तक चिनी, डॅनिश, डच, फिन्निश, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, कोरियन, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश अशा अनेक भाषांमध्ये प्रकाशित झाले. ह्या टाइम-लाइफ आवृत्त्या बहुतेकदा अमेरिकन आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर काही वर्षांनी प्रकाशित केल्या जात आणि टाइम-लाइफच्या आंतरराष्ट्रीय कार्यालयांद्वारे त्याचे व्यवस्थापन केले जाई. मजकूर आणि छायाचित्रे बहुतेकदा सारखीच असत, जरी काहीवेळा शीर्षके स्थानिक पातळीवर अर्थपूर्ण वाटावीत म्हणून बदलली जात. उदाहरणार्थ, द एव्हरग्लेड्स ची डच आवृत्ती फ्लोरिडा'स मार्शेस (फ्लोरिडाचे दलदलीचे प्रदेश) अशी होती.
एक शाश्वत वारसा: हे संशोधन दर्शवते, की आर्ची कार यांचा प्रभाव खरोखर जागतिक होता. इंटरनेटच्या युगापूर्वीच त्यांची पुस्तके सांस्कृतिक आणि राजकीय सीमा ओलांडून गेली. त्यांनी विद्यार्थी, निसर्गतज्ज्ञ आणि सामान्य वाचकांना नैसर्गिक इतिहासाच्या आश्चर्यांशी, साहसाच्या थ्रिलशी आणि संवर्धनाची तातडीची गरज ओळखून दिली. ते केवळ एक स्थानिक नायक किंवा प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ नव्हते. त्यांच्या शब्दांच्या सामर्थ्यामुळे, जे जगभरात भाषांतरित करून सामायिक केले गेले, आर्ची कार आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धनासाठी एक मार्गदर्शक आवाज बनले, आणि आपल्या ग्रहावरील मौल्यवान प्राणी आणि वन्य प्रदेशांची काळजी घेण्यासाठी अनेक पिढ्यांना प्रेरित केले.
मी हा लेख डोड, सी. के. ज्युनियर यांच्या २०२२ या वर्षात प्रकाशित झालेल्या मूळ लेखावरून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे येथे लिहिण्याचा कारण देखील फार महत्वाचा आहे. कारण आपल्या संपूर्ण किनारी प्रदेशात पालघर च्या ‘झाई’ पासून सिंधुदुर्ग च्या ‘रेड्डी’ पर्यन्त समुद्री कूर्माच्या पाच प्रजातिची नोंद झाली आहे. पण दुर्देव हे आहे की या बद्दल स्थानिक बोली भाषेत आपल्या बद्दल बरीच कमी माहिती उपलब्ध आहे. जीवशात्रातील बऱ्याच गोष्टी या मुळात इंग्रजी मध्ये देखील अत्यंत क्लीष्ट शब्दात असतात, त्यातील काही बऱ्याच बाबी ह्या समजण्यास अवघड असतात त्यामुळे जे काही कुतूहलाचे प्रश्न आपल्याला पडत असतील त्या बद्दल माहिती रंजक स्वरूपात सगळ्यांना समजली पाहिजे तरच कासव संर्वधन चिरंतन राहील. हा छोटा दोन लेखाचा प्रयत्न आपल्याला समुद्री कासवांबद्दल आणि त्यांना आपलं जीवन समर्पित करणाऱ्या आर्ची कार याना समजून घेण्यासाठी. याच लेखाचा पुढील भागात आपण ओळख करून घेऊन 'सतीश भास्कर' याच्या संशोधन कार्याचा ज्यांची ओळख ''father of Indian sea turtle research" असं म्हटलं जातं.
--क्रमश
लेखन -
प्रदीप नामदेव चोगले
मो: - ९०२९१४५१७७
pradipnc93@gmail.com
टीप: - आपणांस हा लेख कसा वाटलं हे खाली आपल्या प्रतिक्रिया देऊन नक्कीच कळवा
संदर्भ : -
- Handbook of turtles by Archie Carr
- The windward road by Archie Carr
- The man who saved sea turtles Archie Carr and the origins of conservation biology by Frederick Rowe Davis
- Dodd, C. K. Jr. 2022. The International Editions of Archie Carr’s Books. Bibliotheca Herpetologica 16(7):82–89.
- The Windward Road (1956)
- Ulendo (1964)
- So Excellent a Fishe (1967)
- High Jungles and Low (1953)
- The Reptiles (Time-Life series, 1963)
- The Land and Wildlife of Africa (Time-Life series, 1964)

Comments
Post a Comment