नाविण्यपूर्णतेचा ध्यास ‘ चिरंतन महासागर ‘ जपण्यासाठी विकासाच्या वाटेवर चालत असताना मानवी समाज नेहमी खूप मोठ्या जलस्त्रोता काठी स्थिरवलेला दिसून येतो. मग कधी ही मानवी सभ्यता मोठ्या नदी किनारी विकसित होते तर कधी मोठी शहरे ही समुद्र किनारी विस्तारलेली दिसतात. ठिकाण नदी असो ओढा असो की खाडी वा समुद्र किनारा ‘पाणी’ ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे ज्या भोवती आपले वाड-वडील, आपण आणि आपली येणारी पिढी वास्तव्य करणार आहे. मानवी शरीर असो की इतर कोणी सजीव पेशी साधारण ६०-८०% ही पाण्याने व्याप्त असते; प्रमाणात पेशी आणि प्रजाती प्रकारानुसार फरक दिसून येतो परंतु ‘पाणी’ हा घटक खूपच महत्वपूर्ण हे काही कोणाला नाकारता येणार नाही. शाळेत प्रवेश केल्यावर तिसरी किंवा चौथी ला आपण एक महत्वपूर्ण गोष्ट विज्ञान आणि भूगोलाचा अभ्यास करताना शिकतो ती म्हणजे ‘जलचक्र’ अर्थात जमिनीवर असलेल्या पाण्याची उष्णतेने वाफ होते ही वाफ थंड झाली की त्याचे ढग बनवतात, ढग थंड होऊन जेव्हा जड होतात तेव्हा पाऊस पडतो. शाळेत शिकत असताना आपण एक इयत्ता पास होतो आणि पुढच्या वर्गात सरकत असतो. जलचक्र...